11/22/2013

प्रेम करा प्रेम...



प्रेम हा शब्द उच्चारला की आपल्या डोळ्यांसमोर केवळ प्रियकर अन्‌ प्रेयसी यांचे चित्र समोर उभे राहते. ते तर प्रेम आहेत; पण त्याशिवायदेखील अगणित जागी, साऱ्या चराचरामध्ये प्रेम आहे. प्रेम करणं म्हणजे केवळ देह भोगणं नव्हे तर प्रेम करणं ही विलक्षण अन्‌ अद्‌भूत अनुभूती आहे. ती फक्त अनुभवावी भोगाच्या पलिकडे जाऊन. जेथे दृष्टी टाकावी तेथे प्रेम आहे. अर्थात्‌ दृष्टी टाकण्यासाठी डोळे नाही तर नजर आवश्यक असते. प्रेमाची नजर... 

प्रेम कोणावर करावे? जन्म देणाऱ्या आईवर, घर आवरणाऱ्या ताईवर, संस्कार शिकवणाऱ्या आजीवर, गोष्टी सांगणाऱ्या आजोबांवर, कष्ट करणाऱ्या बापावर, "लढ' म्हणणाऱ्या मित्रांवर, भावावर, मावशीवर, मामावर, माणसामाणसांवर, पशु, पक्ष्यांवर प्रेम करता येतं, करायला हवं.

प्रेम जिवंत माणसावर तर करतातच, पण चैतन्यदायी निर्जिवावरसुद्धा करायला हवं. अंकुराला चैतन्य प्रदान करणाऱ्या काळ्याकुट्ट मातीवर प्रेम करायला हवं. प्राणवायूने अवघ्या मनुष्यजातीला जिवंत ठेवणाऱ्या झाडा-झुडपांवर वेलींवर प्रेम करायला हवं. पायदळी तुडवल्यावरदेखील आपल्या सुगंधाचा धर्म न सोडणाऱ्या फुलाफुलांवर प्रेम करायला हवं. शितलता देऊन शांत करणाऱ्या चंद्र-चांदण्यावर, उडण्याचं निमंत्रण देणाऱ्या निळ्याभोर नभावर, प्रकाशात नेणाऱ्या नभांगणातील सूर्यावर, साऱ्यांचे वजन पेलणाऱ्या पृथ्वीवर, पंखांमध्ये बळ आणून गगनभरारी शिकविणाऱ्या पक्षांवर साऱ्या साऱ्यांवर प्रेम करायला हवं. इतिहासाची साक्ष देणाऱ्या किल्ल्यावर, पराक्रमाचा इतिहास सांगणाऱ्या वीरांवर, दोन टोकांना जोडणाऱ्या सेतूंवर, घराची ऊब देणाऱ्या निर्जिव भिंतींवर, शिस्त शिकविणाऱ्या घड्याळाच्या टिकटिकवर, कोसळतानाही आपलं सौंदर्य तसूभरही ढळू न देणाऱ्या पाण्यावर, धरणीला अन्‌ आकाशला जोडणाण्या आभास निर्माण करणाऱ्या क्षितीजावर, इंद्रधनूच्या सप्तरंगावर, शांतपणे वाहणाऱ्या जलौघावर, उसळणाऱ्या लाटांवर, जीवनसत्त्व देणाऱ्या फळांवर अशी अगणित अगदी सारीच स्थळे आहेत ज्यावर प्रेम करायला हवं.

आपल्या आत राहून आपली दु:खं समजावून घेऊन; शेवटी हवं तेव्हा आपलं दु:ख घेऊन जाणाऱ्या स्वत:च्या अश्रूंवरदेखील प्रेम करायला हवं. कष्ट केल्याची पावती देणाऱ्या आपल्या स्वत:च्या घामावरदेखील प्रेम करायला हवं. अन्‌ घाम का गाळायचा हे सांगणाऱ्या आपल्या आतल्या इवल्याश्या हृदयावरदेखील प्रेम करायला हवं. स्वत:च्या प्रयत्नांवर, स्वत:च्या यशावर, स्वत:च्या प्रगतीवर, स्वत:च्या स्वत:वर अर्थात प्रेमाची सुरुवात स्वत:पासून करायला हवी. स्वत:वर प्रेम करायला हवं.

एकदा का डोळ्यांना नजर प्राप्त करून दिलीत की सारीकडे प्रेम दिसू लागेल. निरामय, निस्सीम, निरागस प्रेम. मग बघा सारी सृष्टी, अवघं विश्र्व, सारी माणसंदेखिल तुमच्यावर प्रेम करत आहेत, याची अनुभूती घेता येईल. चला, त्या विलक्षण अनुभूतीच्या दिशेनं जाऊयात, "प्रेम करूयात प्रेम' साऱ्यांवर...

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...