11/26/2013

प्रेम कधीच "भंग' होत नाही!

प्रेम करणं खरचं एक विलक्षण अनुभूती आहे. ती एवढी विलक्षण आहे की आपलं प्रेम कोणी स्वीकारलं अथवा नाकरलं तरीसुद्धा आपल्या हृदयात प्रेमाची उत्पत्ती होत राहते. मात्र, भोगण्याच्या सुप्त इच्छेलाच जर का प्रेमासारख्या विशुद्ध अन्‌ पवित्र भावनेचे नाव दिले तर मात्र आपणांस प्रेमाचा खरा अर्थच कळला नाही. खरेखुरे प्रेम हे फुलांप्रमाणे असते. त्याच्यावर प्रेम करणाऱ्याला तर ते गंध देतेच, मात्र पायदळी तुडविणाऱ्यांना देखील तोच अन्‌ तेवढाच गंध देते. प्रेम करायचं असेल तर फुलांप्रमाणे करायला हवं. पायदळी तुडविल्यावरदेखील प्रेम करणारं.

आपण कोणावर तरी प्रेम करतो किंवा तसं आपल्याला वाटतं. त्यावेळी आपल्या मनात नेमक्या भावना काय असतात? त्या व्यक्तीवर आयुष्यभराकरिता स्वामित्व हक्क गाजविणं? त्या व्यक्तीचा देह भोगणं? तसं असेल तर प्रेमाच्या परिभाषेत प्रेमानेच आपलं प्रेम तपासून बघा. कारण या साऱ्या भावनांच्या पलिकडेच खरं प्रेम सुरू होतं.   त्या प्रेमाला वास्तवाचं भान असतं. नैतिकतेचं अधिष्ठान असतं. संवाद, सहवास, स्पर्शाची अपरिहार्यता त्यात नसते. आपण काळ्या-पांढऱ्या कातड्यावर किंवा एखाद्या अवयवावर प्रेम करतो का? आसक्ती, वासना अन्‌ भोग यापासून खरं "प्रेम' कैक मैल दूर असतं!

"प्रेमभंग' ही संकल्पना का व कशी रूढ झालेली आहे समजत नाही. कारण प्रेम हे अभंग आहे. प्रेम हे विशाल आहे. तेथे सर्वांना प्रवेश आहे. ते कधीच भंग पावत नाही. प्रेम युगानयुगांपासून चालत आलेलं आहे. नश्र्वर अन्‌ क्षणार्धात नष्ट होऊ शकणाऱ्या गोष्टी भंग पावतात... भंग पावतात त्या भोगण्याच्या, वासनेच्या क्रूर इच्छा... भंग पावते ती स्वार्थी वृत्ती... एकवेळ देहसुद्धा भंग पावतो. नष्ट होतो. मात्र "प्रेम' कधीच नष्ट होत नाही. अर्थात भंग होणारं प्रेम हे प्रेमच नसतं!

इतरांवर प्रेम करण्याचं सामर्थ्य तुमच्यात असणं हे सुद्धा मोठेपणाचं लक्षण आहे. प्रेम नाकारणं अथवा स्वीकारणं हे या जगातील सोपस्कर आहेत. प्रेमाचं जगच वेगळं असतं. "प्रेमभंग' झाला म्हणून प्रेम(?) मिळविण्यासाठी वाट्टेल त्या मार्गांचा अवलंब करणं म्हणजे केवळ वैचारिक क्षुद्रतेचं अन्‌ प्रेमाच्या अनुपस्थितीचं लक्षण आहे. प्रेम कधीही ओरबाडून घेता येत नसतं. ते हळूवारपणानं मिळत असतं. स्वत:च्या हृदयात प्रेमाची उत्पत्ती होणं अन्‌ त्यामुळे अवघ्या देहाला एक वेगळीच अनुभूती प्राप्त होणं म्हणजे खरं प्रेम असतं. ती अनुभूती भंग कशी पावेल?

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...