11/28/2013

आकाशाचं उडण्याचं निमंत्रण स्वीकारा!

तांबडं फुटतं, कोंबडं आरवतं, अंधार संपतो अन् प्रकाशणारा सूर्य उगवतो. शेतकरी रानाकडं जातो, विद्यार्थी ज्ञानाकडं जातो, व्यापारी धनाकडं जातो, अन् माणूस जगण्याकडं जातो. मित्रहो, हे असं युगान्युगांपासून चालत आलेलं जग युगान्युगांपर्यंत चालू राहणार आहे. हे सगळं चालू असतानाच इथं जगणार्‍या प्रत्येक माणसानं  स्वत:च्या विकासाचं, आत्मवैभवाचं स्वप्न बघण्यास काय हरकत आहे?

चला स्वप्नं पाहुयात अन् ती सत्यात आणण्याचा प्रयत्न करूयात. अर्थात् त्यात वास्तवता असायला हवीच. पण आपल्या खिशात फुटकी कवडी नाही अन् हा माणूस स्वप्नं बघायला सांगतो, असं समजत असाल तर आपण निरर्थक जगत आहोत असंच समजा. स्वप्नं बाजारात विकत मिळत नाहीत त्यामुळं खिशात पैसे असण्याची गरजच नाही. गरज आहे केवळ प्रबळ इच्छाशक्तीची अन् दुर्दम्य आत्मविश्वासाची!

संत तुकाराम महाराजांनी ‘सकाळासी येथे आहे अधिकारी, भेदाभेद भ्रम अमंगळ’ असे म्हटले आहे. प्रदेशाचा भेदाभेद करणं केव्हाही अमंगळच. मात्र, आपल्या जन्मभूमीचा अभिमान असणं हे मांगल्याचं लक्षण आहे. तरीसुद्धा माझा मराठवाडा म्हटलं की दुष्काळग्रस्त भाग, राजकीय-सामाजिक-आर्थिक-शैक्षणिक उदासिनता, उद्योग-धंद्यांनी फिरविलेली पाठ, ऊस तोडणारा कामगार वर्ग, गुणवत्ता नसलेला विद्यार्थी अशी ओळख कशी आणि का निर्माण झाली कळत नाही? सकारात्मक दृष्टी ठेऊन विचार करा.

निसर्गानं फिरविलेली पाठ हा काय तिथं राहणार्‍या लोकांचा दोष आहे? ‘पाणी’ नाही. त्यामुळे विकासाला गती नाही. गतीशिवाय विकास नाही. या न संपणार्‍या चक्राच्या विचारात मराठवाड्यातला ‘माणूस’ अडकत राहतो.  जरा, सुक्ष्म निरीक्षणं केलं तर असं दिसून येईल की अलिकडे परिस्थिती, व्यवस्था अन् काही प्रमाणात निसर्गातही बदल झालेला आहे. आता मनाला अन् मानसिकतेला बदलणं आवश्यक आहे. चला तर आपली मानसिकता बदलूयात!

आता तुम्ही म्हणाल की स्वप्नं बघायचं ठरवलं तर, रोज उठून स्वप्नं काय बघायचं? तेच ते अन् तेच ते! भल्या सकाळी तुम्ही उठायच्या आधी तुमची ‘माय’ रानात जायच्या तयारीत असते. रात्री उरकायला कितीही उशीर झाला तरी घरासाठी धडपडत असते. एका सकाळी लवकर उठून त्या ‘माय’ला थांबवून तिच्या डोळ्यात बारकाईनं बघा, तुमची स्वप्नं तुम्हाला तिथं दिसतील. तिनं आयुष्यभर खाल्लेला खस्ता, तुम्हाला सांभाळण्यासाठी घेतलेले कष्ट तिच्या दोन डोळ्यात दिसतील. तिथंच तुमचं स्वप्नं तुम्हाला दिसेल. ते इथं लिहिण्याची गरज नाही. दिवसभर कष्ट करून रात्री घरी आलेल्या तुमच्या बापाच्या जवळ घडीभर बसा. त्याच्या डोळ्यांत बघा, तुमच्या मागण्या पूर्ण करता करता, घर चालवण्यासाठी त्यानं डोळ्यांतच अडवलेले वेदनेचे अश्रू तिथं तुम्हाला स्पष्ट दिसतील. त्याच अश्रूंत तुमची स्वप्नं तुम्हाला भेटण्याची धडपड करत असतील.

त्या स्वप्नांना हेरा, आत्मभान जागृत करा, मी काहीतरी करू शकतो हे स्वत:ला हजार वेळा सांगा. शेवटच्या श्‍वासापर्यंत खूप शिकण्याची, भव्य-दिव्य कर्तृत्त्व गाजवून मोठ्ठं होण्याची जिद्द बाळगा! एवढी जिद्द बाळगलीत तर तुम्ही अर्धं युद्ध जिंकल्यातच जमा आहे. शाळेतल्या अन् कॉलेजातल्या शिक्षणापेक्षा आयुष्याच्या शाळेत अधिक शिकायला मिळतं, त्या शाळेत भरती व्हा, पैशांशिवाय! एकदा वैचारिक बैठक पक्की झाली की जिंकणं म्हणजे औपचारिकता ठरते.

लढण्यासाठी तुम्ही एकदा सिद्ध झालात की पुढे सारी सृष्टी तुम्हाला मदत करेल, तीच तुम्हाला कवेत घेईल, या दिशा तुम्हाला रस्ता दाखवतील, आकाश तुम्हाला उडण्याचं आमंत्रण देईल. मग पुण्या-मुंबईची भीती उरणार नाही. पैसे नसल्याची चिंता उरणार नाही. तुमचं पाऊल कोठेही थबकणार नाही. ती पावलं कधीच थकणार नाहीत. त्या पावलांमध्ये हत्तीचं बळ येईल.  मात्र कधीतरी मायची, बापाची आठवण येईल. पण हे सारं तुम्ही त्यांच्यासाठीच करीत आहात हे आठवल्यावर ती आठवण सुद्धा तुम्हाला लढायला बळ देईल.

प्रत्येकाची स्वप्नं वेगळी असतील. कोणी शिकून सवरून मोठा अधिकारी बनण्याची स्वप्नं बाळगत असेल, कोणी पायलट होऊन आपल्या गावावरून विमान उडवण्याचं स्वप्नं पाहत असेल, कोणी चित्रपटाचा हिरो बनण्याचं स्वप्न बाळगत असेल. कोणी नेता होऊन आपल्या गावाला सुधारण्याचं स्वप्नं पाहत असेल. स्वप्नं कोणतंही बघायला हरकत नाही, मात्र ‘त्या’ स्वप्नांवर जिवापेक्षाही अधिक प्रेम करण्याची क्षमता हवी. त्यासाठी प्रामाणिक आणि जीवापाड प्रयत्नांची पराकाष्ठा करा. कोणत्याही परिस्थितीत नितीमूल्य, संस्कार, प्रयत्न यांची साथ कधीही सोडू नका.

कल्पना करा एके दिवशी तुमच्या गावाकडं तांबडं फुटल, कोंबडं आरवल, अंधार संपेल अन् प्रकाशणारा सूर्य उगवेल. शेतकरी रानाकडं जाईल, विद्यार्थी ज्ञानाकडं जाईल. व्यापारी धनाकडं जाईल, अन् माणूस जगण्याकडं जाईल. तेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नापर्यंत पोचला असाल. 

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...