12/06/2013

‘गुण’ देणारी शाळा

साधारण 1989 चा जून महिना. बाहेर चिंब पाऊस. पाठीवर पाटी पेन्सिलचं दप्तर. डाव्या हाताचं बोटं आईच्या मुठीत. रडवेला चेहरा अन् आईनं धरलेल्या छत्रीच्या छायेत पावासापासून कसा-बसा बचाव करत मी ‘राजस्थानी विद्यालया’च्या ‘बालवाडीत’ प्रवेश केला. आई दूर जात होती, पाऊस जोर धरत होता, अन् शाळेच्या ‘बाई’ वर्गात ओढत होत्या. पांढरा खडू, काळा फळा, निरागस चेहरे, छडी घेतलेल्या बाई, जेवणाचा डब्बा, पाटी, पेन्सिल, दप्तर, दगडांच्या भिंती अन् लाकडाचे बाक म्हणजे वर्ग. अन् असे अनेक वर्ग म्हणजे ‘शाळा’ तेव्हा समजली, 1989 मध्ये.

पुढे पुढे अभ्यास, खेळ, वर्गमित्र, शिक्षक, सर, गृहपाठ या सगळ्या संकल्पना प्रत्यक्ष अनुभवू लागलो. सुदैवाने वडिलांची सरकारी नोकरी असूनसुद्धा माझ्या दहावीपर्यंत त्यांची ‘बदली’ झाली नाही अन् माझी शाळा कायम राहिली, माध्यमिकपर्यंत. त्यावेळी शाळा आणि घर यांतील अंतर साधारण 4-5 किमी होतं, आज ते कितीतरी मैल आहे; उद्या कदाचित एका विश्वाएवढं असेल तरीसुद्धा ‘माझी शाळा’ माझ्याजवळच असेल अगदी माझ्या मनात, अन् हृदयातसुद्धा.

बालवाडी, नंतर पहिली, दुसरी, तिसरी करीत करीत मी विप्रनगरच्या ‘द्वारकादास मंत्री राजस्थानी विद्यालय, बीड’मध्ये कधी प्रवेश केला हे माझे मलाच काय कदाचित शाळेलासुद्धा समजले नाही. एवढे ऋणानुबंध त्या शाळेच्या शिक्षकांसमवेत, भिंतींशी निर्माण झाले होते. तेव्हा इयत्ता आठवीनंतर आमची शाळा विप्रनगरच्या भव्य इमारतीत भरायची. एव्हाना घरातील साखरेच्या डब्यापर्यंत हात पोचेल एवढी उंची प्राप्त केली होती, मात्र शाळेत जाण्या-येण्याची, मैदानात खेळण्याची, पळण्याची, पडण्याची उठून पुन्हा पळण्यातील आनंदाची उंची केव्हाच गाठली होती. ती उंची पुन्हा या जन्मात गाठू शकणार नाही.  ज्या दिवशी ‘शाळेवर लेख लिहा’ असा शाळेतून निरोप आला; त्यादिवसापासून आजतागायत मी शाळेच्या जुन्या आठवणीत अगदी रमून गेलो होतो. शाळेची इमारत, तिथला शिक्षकवृंद, कर्मचारीवृंद, जन्मदिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी शाळेला भेट दिलेल्या महापुरुषांच्या प्रतिमा, शाळेच्या भिंतीवर असलेली गुणवंतांची नामावली केवळ बोलकीच नव्हती तर सतत प्रेरणादायी अन् काहीतरी करण्याची जिद्द निर्माण करणारी होती. शाळेतील सर्व शिक्षकांना मी हवा तेव्हा हवा तो प्रश्न विचारायचो. अगदी ‘लोकसभेतील शून्य प्रहर म्हणजे काय’ पासून ‘माणूस मानवनिर्मित आहे की निसर्गनिर्मित’ इथंपर्यंत. पण सांगताना आनंद होतो आहे की दरवेळी माझ्या प्रत्येक प्रश्नाचे माझे समाधान होईपर्यंत सर उत्तर देत होते. अगदी कधीकधी नंतर निवांत वेळ देऊनसुद्धा. विद्यार्थ्यांनं केवळ पास होऊन गुणवत्ता प्राप्त करण्यापेक्षा हे कितीतरी अधिक मौल्यवान होतं.
शाळेेचे ग्रंथालय, क्रीडामैदान आजही जसेच्या तसे आठवते. ते दिवसच विलक्षण होते. घरची परिस्थिती बेताची. मात्र आई-दादांनी तसे कधी भासू दिले नाही. सोबत ‘शाळा‘ होतीच. माझी ‘राजस्थानी शाळा’ म्हणजे एक विश्व होतं. आजही कुठं 1-2 मिनिटंही उशिर झाला की, शिक्षकांनी शाळेत उशिरा पोचल्यावर मारलेले हातावरचे वळ आठवतात, अन् तेच वेळेवर पोचण्याचं ‘बळ’ देतात.

इयत्ता 6 वीत असताना मराठीच्या  बाईंनी ‘मी पाहिलेला गणेशोत्सव’ या विषयावर निबंध लिहायला सांगितला होता. तेव्हा माझ्या निबंधाचं केलेलं कौतुक फार मोलाचं वाटतं. असंच इयत्ता आठवीत असताना मराठीच्या सरांनी ‘मी फुलपाखरू बोलतोय’ या विषयावर लिहिलेल्या निबंधाचं केलेलं कौतुक आज मला जगातील कोठल्याही पुरस्कारापेक्षा अधिक मौल्यवान वाटतं, अन् त्यामुळेच मला ‘लिहिण्याची’ प्रेरणा मिळते.

कोणत्याही परिस्थितीत वेळ पाळावी, मुक्या प्राण्यांना अन् झाडांना इजा पोचवू नये, मोठ्यांना आदरानं बोलावं, खूप शिकावं, मोठं व्हावं पण आई-वडिलांना कधी विसरू नये. या संस्कारगोष्टी राजस्थानी शाळेनचं मला दिल्या असं मी नेहमी कौतुकानं सांगत असतो. शाळेत साजरे होणारे गणेशोत्सव, रक्षाबंधन, गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ, त्यांच्या आई-बाबांना दिलेले निमंत्रण या गोष्टी दरवर्षी मला खूप आवडायच्या अन् आपल्याही आई-बाबांना शाळेनं बोलवावं असं वाटायचं. दुर्दैवानं इयत्ता दहावीत तेवढी गुणवत्ता मी प्राप्त करू शकलो नाही, मात्र त्याहीपेक्षा अधिक ‘गुण’ शाळेनं दिल्याचं आठवलं की अक्षरश: मला दाटून येतं. इयत्ता दहावीचा अभ्यासक्रम जवळजवळ संपला होता. त्या दिवशी शाळेचा शेवटचा दिवस होता. वर्गशिक्षक परीक्षेबद्दल निरनिराळ्या सूचना देत होते. मात्र, मी माझ्या मनात स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करीत होता. शाळा संपून जगात वावरण्याच्या स्वातंत्र्याचा. शाळेची घंटा वाजली, अन् आम्ही स्वतंत्र झालो. अगदी स्वतंत्र... आता छडी मारणारं कोणी नव्हतं... गृहपाठ झाला का विचारणारं कोणी नव्हतं... पण नंतर हळूहळू लक्षात आलं आपण ‘शाळा’ या विश्वात एवढे स्वतंत्र होतो की उगाच आपण जगाच्या शाळेत उतरलो अन् ‘पारतंत्र्यात’ गेलो. उगाच शाळा संपली... ती शाळा आता कधीच भरणार नाही...

(माझ्या शाळेच्या विशेषांकाकरिता  लिहिलेला लेख )

Related Posts:

  • तुमचा आवाज जगाला बदलू शकतो - ओबामा आजपासून बरोबर 6 वर्षे अन्‌ 6 दिवसांपूर्वी जगाच्या इतिहासाला मोठी कलाटणी मिळाली. विकासाच्या, नेतृत्वाच्या अन्‌ कर्तृत्वाच्या क्षेत्रात जगावर अधिराज्य गाजविण्याची इच्छा बाळगून असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदी बराक हुसेन ओबा… Read More
  • स्पर्श : तिचे यश तिची दहावीची परीक्षा पार पडली. आज तिचा दहावीचा निकाल समजणार होता. तरीही निकाल पाहण्यास जाताना तिला भीती वाटत होती. निकालावरून घरात कोणी काही बोलणारं नव्हतं. तिच्या घरात आई, बाबा आणि तिला एक लहान भाऊ होता. कुटुंब छोटं हो… Read More
  • 'आपलं ध्येय काय?' मोठ्या कष्टानं त्याचा बाप वैभव उभारण्याचा प्रयत्न करत होता. छोटे-मोठे नोकऱ्या, व्यवसाय पडेल ते काम करून बापाने पैसा जमविला. अलिकडेच शहराच्या जवळ जागाही खरेदी केली. आता त्यावर घर बांधण्याचं काम सुरु होतं. पत्नी आणि दोन मुल… Read More
  • स्पर्श : सामर्थ्य रस्त्याच्या कडेला फुटपाथवर त्यांचा उघडा संसार ताडपत्रीचं वेष्टन देऊन बंद केला होता. बाहेर भुरभुर पाऊस पडत होता आणि हिच्या पोटात भुकेचा. हिच्या पोटचा एक गोळा जीवाच्या आकांतानं भिजत भिजत सुगंध देणारे गजरे विकत होता, तर दुसर… Read More
  • स्पर्श : आठवण "बाबा, तुम्हाला किती वेळा सांगितलं या जुन्या पेट्या घराची शोभा घालवतात. त्या फेकून द्या बरं आताच्या आता. या घरात येण्यापूर्वीच मी म्हणालो होतो ना.' त्यानं स्वत:च्या वडिलांना आदेश दिला. आणि थरथरत त्या बापाच्या तोंडातून … Read More

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...