1/04/2014

संवाद हृदयाशी...

नव्या वर्षाचे जोरदार स्वागत झाले असेल. थर्टी फर्स्टचा हँग ओव्हर उतरला असेल. एव्हाना कदाचित तुम्हीसुखस्वप्नांच्या दिशेनं तुम्ही कूच केली असेल.  ती कूच अशीच पुढच्या 31 डिसेंबरपर्यंत सुरू ठेवा. दरम्यानच्या काळात तुमच्या आतला हृदयाचा आवाज ऐकत रहा, त्याच्याशी संवाद साधत रहा. स्वत:च्या अंत:करणाशी तादात्म्य पावण्याचं सामर्थ्य तुमच्या ठायी निर्माण झालं की समजा तुमचं जीवन कृतार्थ झालं...
एकाग्र होऊन आपल्या हृदयाच्या आवाजाकडे लक्ष द्या

मी: हृदया, हृदया, ऐकतोस का?

हृदय: तुझा आवाज मी सतत ऐकत असतो. तूच माझा आवाज कधी ऐकत नाहीस.

मी: तुला बोलता येतं?

हृदय: म्हणूनच तर आपण संवाद साधत आहोत ना!

मी: पण तुझ्यापेक्षा आम्ही आमच्या डोक्याशीच संवाद साधतो, मग तो तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे का?

हृदय: प्रत्येकजण आपापल्या जागी श्रेष्ठ आहे. त्यामुळे कोणाची कोणाशीच तुलना होणार नाही.

मी: मग सारे आपल्या डोक्याचं ऐकतात, तुझा आवाज सारेजण का ऐकत नाहीत?

हृदय: मी जे सांगतो ते बहुतेकवेळा कटू आणि अवघड वाटतं. पण तेच सदासर्वदा निर्मळ अन् पवित्र असतं.

मी: याचा अर्थ तू पवित्र आहेस.

हृदय: पवित्र अपवित्राचा प्रश्‍न नाही. तुला योग्य मार्ग दाखविण्याची माझी जबाबदारी मी प्रामाणिकपणाने पार पाडतो.

मी: मग डोकंही ती पार पाडतच ना...

हृदय: पण प्रत्येकवेळी विवेकाचा मार्ग मीच तुला दाखवून देतो.

मी: मग डोकं अविवेकी असतं का?

हृदय: अजिबात नाही. ते ही त्याचं काम करत राहतं. तू ज्या ज्या वेळी जे जे त्याला दिलेलं आहेस; ते ते तो 
साठवून ठेवून त्याप्रमाणे तुला मार्ग दाखवतो. त्याचं काम साठवून ठेवणं, प्रक्रिया करणं एवढं आहे.

मी: तुझ्याकडे ती क्षमता नाही का?

हृदय: ती नसती तर तू जगूच शकला नसतास. प्रेम, कारूण्य, ममत्त्व या संकल्पना जन्माला आल्याच नसत्या.

मी: तुला व्यवहारापेक्षा भावना अधिक महत्त्वाच्या वाटतात का?

हृदय: व्यवहार अन् भावना यांचा भ्रम नको. व्यवहार हा तुम्ही माणसांनी डोक्याच्या सहाय्यानं तयार केलेली संकल्पना आहे. भावना मला मिळालेलं जन्मजात वरदान आहे. तरीदेखिल प्रत्येक वेळी मी भावना आणि व्यवहार यांचा सुवर्णमध्य साधणारा, अन् नैतिकतेचं अधिष्ठान असलेला सल्ला तुला देत असतो.

मी: म्हणजे तुलाही व्यवहार मान्यच!
हृदय: तसं असतं तर तू ऐकत नसतानाही मरेपर्यंत मी तुला सल्ला दिलाच नसता. अन् मी थांबलो, की तुला कोणी मृत घोषित केलं नसतं!

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...