1/23/2014

योजनांची विकासगंगा - पुस्तक परीचय

पुस्तक परीचय

योजनांची विकासगंगा
गजेंद्र बडे 
सार्थसंकेत प्रकाशन
पृष्ठे: 480 मूल्य: 500 रुपये

समाजातील सर्व स्तराचा विकास साधण्यासाठी शासनाच्या विविध विभागांमध्ये वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. विशेषत: ग्रामविकासाच्या बाबतीत कल्याणकारी योजना राबविणे आणि त्यांची सुयोग्य अंमलबजावणी करणे याचा शासनस्तरावर अधिक प्रयत्न केला जातो. अशा ग्रामीण विकासाच्या बाबतीतील विविध 400 पेक्षा अधिक योजनांचे एकत्रित संकलन ‘योजनांची विकासगंगा’ या पुस्तकात करण्यात आले आहे.

माध्यम क्षेत्रात कार्यरत असलेले आणि शासनाच्या कृषिमित्र पुरस्काराने गौरविण्यात आलेले गजेंद्र बडे यांनी या माहितीपूर्ण पुस्तकाचे संपादन-लेखन केले आहे. शासकीय योजनांच्या माहितीचे सलग पावणे दोन वर्षे एका दैनिकात लेखकाने सदर लिहिले होते. त्या लेखांसह अन्य काही योजनांची माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. लेखक हे सातत्याने दुष्काळाचा सामना करणार्‍या बीडसारख्या जिल्ह्यातील असल्याने ग्रामीण भागाकरिता शासकीय योजनांची आवश्यकता त्यांना पूर्वीपासून महत्त्वाची वाटत होती. पुढे पत्रकारितेत कारकीर्द घडवताना या विषयाला त्यांनी पुन्हा अधोरेखित केले. त्यातून ‘योजनांची विकासगंगा’ हे पुस्तक साकारले आहे.

या पुस्तकात राज्य व केंद्र शासन, जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा बँक इत्यादी शासनाच्या पातळीवरील योजनांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, विभागनिहाय योजनांचे वर्गीकरण करण्याऐवजी लेखकाने विषयनिहाय योजनांचे गट करून त्यासंदर्भातील योजनांचा एकत्रित समावेश केला आहे. त्यामुळे वाचकांना हवी असलेली योजना शोधणे अधिक सोयीचे झाले आहे. कृषी, पणन, ङ्गलोत्पादन, पशुसंवर्धन, ग्रामोद्योग व मत्स्यसंवर्धन, शिक्षण, आरोग्य, कामगार व समाजकल्याण, क्रीडा, युवक कल्याण व स्वयंरोजगार, महिला विकास, बालकल्याण, आदिवासी विकास, अपंग व अल्पसंख्यांक, महसूल व वन, टपाल खाते, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, ग्रामीण विकासाच्या योजना (जिल्हा परिषद), माजी सैनिक कल्याण इत्यादी विषयांचा त्यामध्ये समावेश आहे.

प्रत्येक योजनेची मांडणी एका पानात अगदी नेमक्या शब्दात आणि प्रस्तावना, योजनेचे निकष (पात्रता), आवश्यक कागदपत्रे, अर्ज करण्याकरिताची माहिती या नमुन्यात केल्याने अधिक सुटसुटीतपणा आला आहे. पुस्तकाच्या शेवटी शासनाच्या महत्त्वाच्या संकेतस्थळांचे पत्ते, सविस्तर पत्ता आणि दूरध्वनी क्रमांकासह कृषी संशोधन विषयक महत्त्वाच्या संस्थांची यादी इत्यादी पूरक माहिती समाविष्ट केल्याने वाचकांना संदर्भग्रंथ म्हणूनही या पुस्तकाचा उपयोग होऊ शकतो.

समर्पक मुखपृष्ठ, पुरेसा मोठा टाईप (ङ्गॉंट) आणि आवश्यक त्याठिकाणी रेखाचित्रांचा वापर केल्याने पुस्तक अधिक आकर्षक झाले आहे. या पुस्तकातील योजनांच्या अंमल-बजावणी तसेच कार्यप्रणालीविषयी सविस्तर माहिती शासनस्तरावरून घेण्यात यावी; असे प्रकाशकाने सुरुवातीलाच प्रामाणिकपणाने सूचित केले आहे.
लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी, लघुद्योजक, व्यावसायिक आदी वर्गाकडून पुस्तकाला विशेष प्रतिसाद मिळत असून, लवकरच पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित होत आहे.  शासनाच्या इतर योजनांचे स्वतंत्र पुस्तक (पुस्तके) लिहिण्याचे लेखकाने अक्षरकार्य हाती घ्यावे, अशी वाचकांकडून होत असलेली अपेक्षा या पुस्तकाचे यश अधोरेखित करते.

देशातील एक नागरिक म्हणून आणि शासकीय योजनांचे स्वरूप समजावून घेण्यासाठी हे पुस्तक नक्कीच उपयोगी ठरेल असा विश्‍वास वाटतो.

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...