11/27/2014

सुरुवात स्वत:पासून....

दुसरा दिवस उजाडला. रखमा आणि बाईसाहेब. रेडिओ सुरू झालेला. बाईसाहेबांचे भाषण सुरू झाले,  "समाजातील सर्वप्रकारचे भेद दूर झाले पाहिजेत. जात, पात, धर्म, पंथ, संप्रदाय कोणतेही भेद ठेवायला नकोत. आता आपण पुरोगामी महाराष्ट्रात जगत आहोत. आपणच आता क्रांती करण्याची वेळ आली आहे. आपण स्वत:पासून याची सुरुवात करायला हवी. आपल्या मुला-मुलींचे विवाह जमवताना या भेदांना थारा द्यायला नको. फक्त माणूस हा धर्म आणि स्त्री आणि पुरूष ही जात....'' 

दारावरची बेल वाजली. रखमाने दार उघडले. 

दारात कडक पांढरे कपडे परिधान केलेले काही नेत्यासारखे दिसणारे कार्यकर्ते होते.
कार्यकर्त्यांना अदबीनं विचारलं, ""बाईसाहेब आहेत का घरात?''
रखमानंही तेवढ्याच अदबीनं उत्तर दिलं, ""व्हय, या, या!''

***

बाईसाहेब बैठकीतच बसल्या होत्या. घर तसं मोठ्ठं होतं. घर कसलं बंगलाच होता तो. बाईंनी भाषणं करून करून कमावलेला. पण घरात रखमा, बाई आणि एक कुत्रं यांच्याशिवाय कोणीही नव्हतं. चार-पाच नोकर होते पण ते मुक्कामी नव्हते. 


बाईंची एक मुलगा देशाबाहेर नोकरी करत होता. त्यांची भेट फक्त वर्षातून एकदाच होत होती. तीही काही अगदी बोटावर मोजण्याएवढ्या शब्दांनी. त्याला काही कमी नव्हतं. बाईंचंही बरं चाललं होतं. देण्या-घेण्याचा प्रश्‍नच नव्हता. ना पैसा, ना प्रेम! शिवाय बाईंचा दुसरा मुलगा बाईंच्या बरोबरविरूद्ध होता. खराखुरा समाजसेवक. विद्यार्थी होता पण समाजाबद्दल तळमळ होती. त्यामुळेच त्यानं समाजकार्यात पदव्युत्तर पदवी मिळविली होती.

***
 
प्रवेशाची प्रतिक्षा खोली ओलांडल्यावर बाईंचे दर्शन घडले. बाईंनीही बसल्याजागीच स्वागत केले आणि "बसा' असा आदेश फर्मावला. प्रथेप्रमाणे रखमा पाहुण्यांसाठी लिंबूशरबत आणण्यासाठी गेली.
सर्वांनी नमस्कार-चमत्कार केले. 


एक कार्यकर्ता बोलू लागला, "बाईसाहेब गेल्यावेळी वर्धापनदिनानिमित्त आपण जबरदस्त बोलला होता. त्यामुळे यंदाही आपणच यावं अशी आमची विनंती आहे.'' 


बाईसाहेब आनंददायी स्वरात म्हणाल्या, ""आपल्याला ठाऊक असलेलं लोकांना सांगण्यात काय हरकत आहे. कधी आणि कुठं सांगा!'' 


कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. कारण बाई येणार म्हटलं की कार्यक्रम हाऊसफुल्ल. बाई काहीतरी वेगळं बोलणार म्हणून मिडियावालेपण येणार. संस्थेच्या वर्धापनदिन उत्साहातच होणार.

कार्यकर्त्याने तारीख वगैरे औपचारिकता पूर्ण केली. बाई म्हणाल्या, ""बाकी मानधनाचं पूर्वीप्रमाणेच. काय आहे मी ते स्वत:कडे घेत नाही. संस्थेला दान करते! तेवढंच समाजकार्य''
कार्यकर्ते मनातल्या मनात बाईंच्या थोरपणाचे कौतुक करू लागले. तेवढ्यात रखमा लिंबूशरबत घेऊन आली.
बाईंच्या उत्साहाला चेव फुटला, ""आता हेच पहा ना, ही रखमा आमच्याकडे गेल्या 10 वर्षांपासून काम करतेय. पण तिला आम्ही कधी परकी मानलेच नाही.''

कार्यकर्ते अधिक खूष झाले आणि शरबत पिऊन पुढील तयारीसाठी बाहेर पडले.
***
बाईंच्या मनात विचारांची चक्रे सुरू झाली. कोणत्या विषयावर बोलावं, बाईंनी 2-4 पुस्तके चाळली आणि त्यांना विषय सुचला. पुढील 2-3 दिवसांत त्यांनी तो लिहूनही काढला. कार्यक्रमाला अद्याप 8-10 दिवस बाकी होते. त्यामुळे बाईंनी पुरेशी तयारी केली.
***
कार्यक्रमाचा दिवस उजाडला. बरोबर कार्यक्रमाच्या अर्धा तास आधी गाडी बाईंच्या दारात एक चकाचक नवी कोरी गाडी उभी राहिली. बाई कार्यक्रमाच्या स्थळी रवाना झाल्या. कार्यक्रम सुरू झाला. बाईंचं भाषणही जोरदार झालं. लोकांनी टाळ्यांच्या कडकडटात दाद दिली. कार्यक्रम संपला. बाई घरी आल्या. रखमाने लिंबूशरबत दिले. बाई मानधनाची रक्कम मोजू लागल्या आणि त्यांनी रक्कम पर्समध्ये व्यवस्थित ठेऊन दिली. उद्या त्यांना काहीतरी खरेदी करायचं होतं. कारण त्याही या समाजातील एक घटक होत्या. त्यांनी मानधन स्वत:लाच दान केलं होतं.

***

दुसऱ्या दिवशी सकाळीच कार्यकर्ते बाईंच्या दारात हजर. बाईसाहेब योगायोगाने बाहेरच्याच खोली होत्या. त्यांना पाहून कार्यकर्त्याला रहावलच नाही. ""बाईसाहेब काय जबरदस्त भाषण केलत. सगळे एकदम खूष. मिडियावाले तर जाम इंप्रेस! आमच्या संस्थेतील ऍडमिशन पण वाढली....'' सोबतच्या कार्यकर्त्यानं त्याचं भान सुटायच्या आत त्याला धक्का दिला.
बाई, शांत, धीरगंभीर. त्यानंतर पुन्हा एका कार्यकर्त्यानं कालच्या कार्यक्रमाची पेपरची कात्रणं बाईंना देऊ केली. तसेच उद्या सकाळी 9 वाजता आपले भाषण रेडिओवरून प्रसारित होणार असल्याचंही सांगून टाकलं.
***
इतका वेळ दाबून ठेवलेला आनंद बाईंनी व्यक्त करायला सुरूवात केली. कात्रणं नजरेखालून घातली आणि त्यांना आपण खरच मोठे झाल्याचा भास झाला. आता दुसऱ्या दिवशीची त्या वाट पाहू लागल्या. दरम्यान समाजातील "प्रतिष्ठितांचे' कालच्या कार्यक्रमाच्या प्रतिक्रिया देणारे अनेक दूरध्वनी दिवसभर खणखणत होते. बाईंच्या आनंदाला उधाण आलं होतं. त्यातच त्यांनी रखमालाही कालचं भाषण ऐकायला बोलावलं. विशेष म्हणजे आपण एकत्र ऐकूयात असच सांगितलं.
***
दुसरा दिवस उजाडला. रखमा आणि बाईसाहेब. रेडिओ सुरू झालेला. बाईसाहेबांचे भाषण सुरू झाले, 
"समाजातील सर्वप्रकारचे भेद दूर झाले पाहिजेत. जात, पात, धर्म, पंथ, संप्रदाय कोणतेही भेद ठेवायला नकोत. आता आपण पुरोगामी महाराष्ट्रात जगत आहोत. आपणच आता क्रांती करण्याची वेळ आली आहे. आपण स्वत:पासून याची सुरुवात करायला हवी. आपल्या मुला-मुलींचे विवाह जमवताना या भेदांना थारा द्यायला नको. फक्त माणूस हा धर्म आणि स्त्री आणि पुरूष ही जात....'' पुढे 10-12 मिनिटे भाषण चाललं. 

रखमा मोहित झाली. तिच्या उत्साहाला उधाण आलं.
ती बाईंना म्हणाली, ""बाई एक विचारू?'' बाई प्रचंड आनंदात,
"विचार संकोच करू नको.'' रखमाने मनातल्या मनात 2-3 वेळा विचार केला.
तिची मुलगी तीही वयात आलेली. बाईंचा भारतातील मुलगा तोही वयात आलेला. बाईंच्या इकडं तिकडं दौऱ्यावर त्यामुळे दोघं लहानपणी एकत्रच खेळत होते. आतासुद्धा ते...

"अगं विचार ना!'' बाईंनी तिला प्रेरणा दिली. "

"बाई, सुरुवात आपण स्वत:पासून करायला पायजेल ना'' बाई हो म्हणाल्या.
"मग, आपणच माझी मुलगी पदरात घेऊन सुरुवात करा ना तुमच्या मुलासाठी!''
बाईंचा आनंद झटकन उतरला अन्‌ त्याची जागा प्रचंड संतापाने आणि रागाने घेतली.
"अगं तुझी लायकी काय तू बोलतीस काय? तुझी हिंमतच कशी झाली असं बोलायची? लाज वाटली नाही का तुला? मला म्हणतेस सुरुवात जगापासून करायची. जा आत्ताच्या आत्ता चालती हो येथून. पुन्हा तुझं काळ तोंड दाखवू नकोस.'' 


रखमा थरथर कापू लागली. रडत-रडत अन्‌ धावत-धावत ती पार्किंगमधील तिच्या खोलीत शिरली आणि मुक्काम हलवण्यासाठी तयारी करू लागली. जाताना म्हणू लागली ""सुरुवात स्वत:पासून नसते करायची?'' 


***

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...