1/25/2015

तुमचा आवाज जगाला बदलू शकतो - ओबामा

आजपासून बरोबर 6 वर्षे अन्‌ 6 दिवसांपूर्वी जगाच्या इतिहासाला मोठी कलाटणी मिळाली. विकासाच्या, नेतृत्वाच्या अन्‌ कर्तृत्वाच्या क्षेत्रात जगावर अधिराज्य गाजविण्याची इच्छा बाळगून असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदी बराक हुसेन ओबामा नावाचा अवघ्या 47 वर्षांचा तरूण विराजमान झाला. केनिया या वडिलांच्या मूळ देशाला त्यादिवशी राष्ट्रीय शासकीय सुटी जाहीर करण्यात आली. मुलाच्या अद्वितीय कर्तृत्वामुळे आनंदीत झालेल्या वडिलांच्या मूळ देशाने राष्ट्रीय सुटी जाहीर करण्याची ही जगाच्या इतिहासातील दुर्मिळ अशी पहिलीच घटना असावी.


सावळा रंग, चेहऱ्यावर तेज, प्रचंड आत्मविश्‍वास असलेला तरुण ज्यावेळी राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाला त्यावेळी भीतीलाच भीती बसली. आकाशाला उंची दिसली. कर्तृत्वाला कर्तृत्वाची भेट घडली. आत्मविश्‍वासामध्येच आत्मविश्‍वास जागृत झाला. पाकिस्तानमधील दहतशवाद्यांचा खातमा करण्यासाठी पाकिस्तानच्या कोणत्याही परवानगीची आम्हाला गरज नसल्याची स्पष्ट आणि कठोर भूमिका त्यांनी मांडली. जगाला शांतता अन्‌ सुव्यवस्थेपासून दूर ठेवणाऱ्या तालिबान आणि अल कायदा या अतिरेकी संघटनांना अपकृत्यांपासून रोखायचे असेल तर पाकिस्तानच्या सहकार्याशिवाय ते शक्‍य नाही, असे जाहीर वक्तव्य त्यांनी केले. राजकारण्यांप्रमाणे ते फक्त वक्तव्य करून थांबले नाहीत तर अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर अवघ्या 833 दिवसांनंतर म्हणजेच 2 मे 2011 रोजी ज्याच्यापासून जगाला मोठा धोका आहे अशा ओसामा बिन लादेन या दहशतवाद्याचा पाकिस्तानातील इस्लामाबादमधील अब्बोटाबाद येथे त्याच्या घरात घुसून खात्मा केला. विशेष म्हणजे या घटनेबाबत पाकिस्तानलाही फार उशिरा समजले. अन्‌ जगाला अमेरिकेचा अन्‌ पर्यायाने ओबामांच्या धैर्याचा साक्षात्कार झाला.


त्यांची आई अमेरिकेतील, वडिल केनियाचे, शिक्षण इंडोनेशियातील जकार्तामध्ये. पालक आजी-आजोबा. कोलंबिया विद्यापीठातील राजकारणशास्त्रातील पदवी. हार्वर्डमधून उच्च पदवी. तर 1996 साली राजकारणात येऊन अवघ्या 12 वर्षानंतर जगातील सर्वात मोठ्या देशाचा राष्ट्राध्यक्ष. त्यामुळेच अमेरिकेच्या 44 व्या राष्ट्राध्यक्ष असलेल्या ओबामा यांचे अध्यक्षपद 2008 नंतर 2012 सालीही कायम राहिले. पहिल्या आफ्रिकन वंशाच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला ओबामांना जागतिक शांततावाढीसाठी व अण्वस्त्र प्रसार रोखण्यासाठी केलेल्या योगदानामुळे 2009 साली नोबेल शांतता पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे.


सार्वजनिक जीवनात सक्रिय राहिलेल्या ओबामांचे वैयिक्तक आयुष्यही तेवढेच अर्थपूर्ण आहे. आपल्यापेक्षा तीन वर्षांनी लहान असलेल्या मिशेल रॉबिन्सन या 1989 साली शिकागोमध्ये ओबामांना प्रथम भेटल्या. पुढे भेटीचे रुपांतर प्रेमात अन्‌ प्रेमबंधाचे 1992 साली विवाहबंधनात रुपांतरन झाले. एकेकाळी वैवाहिक आयुष्यात अगदी निर्वाणीच्या निर्णयापर्यंत पोचलेले ओबामा आणि मिशेल आजही एकत्र असून त्यांना मलिया ही 10 वर्षांची तर नताशा ही 7 वर्षांची कन्यारत्ने आहेत. तरुणपणी मद्य तसेच अंमली पदार्थांचे सेवन केलेल्या ओबामा यांनी वेळीच सावरत दुर्गुणांपासून स्वत:ला अन्‌ पुढे देशाला दूर ठेवण्याचा मनस्वी अन्‌ यशस्वी प्रयत्न केला आहे. एखाद्या श्रीमंत, सौंदर्यवान अन्‌ कर्तृत्ववान मुलीला अनेक स्थळे यावीत, अनेक मैत्रीचे प्रस्ताव यावेत त्याप्रमाणेच अमेरिकेलाही मैत्रीसाठी जगभरातून प्रचंड मागणी असून त्यामागे जागतिक राजकारणाची झालर आहे. ओबामांचे कर्तृत्व आभाळापेक्षा नक्कीच उंच आहे. यापुढे उंचीचे मोजमाप आभाळामध्ये नव्हे तर ओबामांच्या कर्तृत्वाने करण्यात आले तर नवल वाटणार नाही. त्यामुळेच ते म्हणतात, "तुमचा आवाज जगाला बदलू शकतो'.


ओबामांची अमेरिका स्वत:च्या वेगळेपण जपत विविध देशांच्या मैत्रीप्रस्तावांचा विविध दृष्टिकोनातून बारीक-सारीक, सखोल अन्‌ तेवढाच अर्थपूर्ण विचार करत असते. मग ते कोणतेही देश असोत. अशाही परिस्थितीत "आई' म्हणून संबोधण्यात येणाऱ्या भारताशी संबंध प्रस्थापित करण्यात अमेरिकेला प्रचंड उत्सुकता, स्वारस्य अन्‌ आनंद वाटावा यापेक्षा "भारतीय' असल्याचा दुसरा अभिमान असूच शकत नाही.

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...