2/05/2015

स्पर्श : आठवण

"बाबा, तुम्हाला किती वेळा सांगितलं या जुन्या पेट्या घराची शोभा घालवतात. त्या फेकून द्या बरं आताच्या आता. या घरात येण्यापूर्वीच मी म्हणालो होतो ना.' त्यानं स्वत:च्या वडिलांना आदेश दिला.

आणि थरथरत त्या बापाच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, "ठीक आहे, ठीक आहे.'

"तुम्हाला काय उचलणार त्या पेट्या. मीच देतो फेकून बाहेर.' असे म्हणून तो पेट्या घेण्यासाठी जाऊ लागला.

तेवढ्यात घरात नव्यानेच रूजू झालेला कामवाला समोर आला आणि त्यानं मालकाला म्हटले, "मालक राहू द्या मी त्या पेट्या माझ्या खोलीत ठेवतो. तेवढंच कामाला येतील.'

अन्‌ थोडा वेळात त्या पेट्या त्या कामवाल्याच्या 10 बाय 10 च्या खोलीत येऊन धडकल्या. मागोमाग दुर्भागी बापही पोचला.

अन्‌ त्या कामवाल्याला विनंती करू लागला, "माझ्यावर उपकार कराल, मी जिवंत असेपर्यंत तरी या पेट्या फेकू नका.'

तो कामवाला ओशाळला. म्हणाला, "मालक, त्यासाठीच मी त्या हिथं आणल्यात. मला वाटलचं त्यात तुमचं काहीतरी महत्वाचं सामान असेल.'

तेवढ्यात त्या बापाच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या, "पोरा तुला काय सांगू. जिथं या पेट्या होत्या तिथून त्याला काहीच त्रास नव्हता. तरीही माझ्या आठवणी ठेवण्यासाठी माझ्याच घरात जागा नाही.'

कामवाला म्हणाला, "पण त्यात हाय तरी काय मनायचं?'

बाप उत्तरला, "माझं लग्न ठरल्यावर "तिला' मी दररोज एक प्रेमपत्र लिहायचो. तीदेखील उत्तर लिहायची. त्या सर्वांची मी फ्रेम करून एकत्र ठेवलीय. आज ती नाही. पण या पेट्या आहेत. मुलाला बोलायला वेळ नाही पण 
हि पत्रे माझ्याशी बोलत असतात. ही पत्रे म्हणजे तिची आठवण अन्‌ माझ्या जगण्याची शक्ती आहेत. माझं भाग्यच की या पेट्याप्रमाणे त्यानं अजून तरी मला घराबाहेर काढलं नाही.'

कामवाल्याच्या डोळ्यातून पाणी बाहेर कधी आलं ते समजलंच नाही...  मात्र कामवाल्याने  जे  समजून घेतले होते. ते त्याला कामावर ठेवणा-याला  कधीच समजणार नव्हते.

1 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...