2/27/2015

स्पर्श : 'मालक आमी हायेत, लढा, लढा...'

त्यानं काळ्या आईला साष्टांग दंडवत घातला. "माय तुले पाणी पाजू शकलो नाय म्या! माफी कर माय, माफी कर...‘ गेल्या अनेक दिवसांपासून तो तिला असाच अश्रूंचा अभिषेक घालत होता. पण तो पुरेसा नव्हता. आभाळातील गोळा त्याच्या घरी जात होता. पुन्हा उगवण्यासाठी. हा पण त्याच्याच घरी जाणार होता. पण पुन्हा कधीच उगवणार नव्हता. आता वेळ दवडण्यात अर्थ नव्हता. धावत धावत तो रानाजवळच्या घरात आला. घर कसलं जाड कापडानं आभाळ झाकलेलं उघडी जमीनच होती. आभाळातून पाणी येत नव्हत. त्यामुळे याच्या पोटात अन्न नव्हतं, खिशात दमडी नव्हती, होती-नव्हती जगण्याची उमेदही मावळली होती. पण अद्यापही काळजातलं प्रेम संपलेलं नव्हत.

घराच्या समोर अखेरची दौलत सर्जा-राजा बसलेले होते. शेतात राबणाऱ्या जनावरांच्या पाठीवरून त्यानं प्रेमानं हात फिरवला. त्यांचीही माफी मागितली. आता त्याला सर्वांच्या उपकाराची परतफेड माफीनं अन्‌ प्रेमानं करायची होती. मुकी जनावरे जणू काही सांगत होती, ‘मालक आमी हायेत, लढा, लढा...‘ तो आत आला. घरात चार जीव याची वाट पाहत होते. पोटातली भूक घेऊन सगळेच जण आशाळभूतपणानं त्याला अधाशासारखं येऊन बिलगले. त्यांना भाकर हवी होती, पण याच्याकडे प्रेमाशिवाय द्यायला काहीच नव्हतं. त्यानं पोट भरणारं नव्हतं. "काम जाल काव जी?‘ तिनं रूक्षपणानं पण तेवढ्याच नम्रतेने विचारलं. त्यानं काहीच उत्तर दिलं नाही. "उद्या बगू‘ म्हणून तो पडला, अन्‌ इतर जणांनीही डोळे मिटले. भुकेल्या पोटाने सगळेच जीव कसे-बसे निद्रिस्त झाले. कायमचेच झोपण्याच्या इराद्याने काही वेळाने तो हळूच उठला. झोपलेल्या अवस्थेतील पत्नीचे पाय धरून माफी मागितली, "किती जन्माचं पाप घेऊन जनमलीस गं? माझ्यासारखा दादला तुझ्या पदरी पडला. आता पुढे कधीच तुला तरास होणार नाय. किती भोगलसं माझ्यासाठी. उघड्या पडलेल्या संसारापरमाणं उघडं शरीर जगाला दिसू नये म्हणून झाकण्यापुरतीच कापड हायत तुझ्याकडं. पर धीर सोडू नगं, दोन पोराला लई शिकव. लई मोट्टं कर. अन्‌ माणूस मेला की कर्ज फिटतं म्हणून सांग जगाला, अन्‌ इतनं लई लांब जा...‘ असे म्हणत त्यानं दोन पोरांवरून त्यानं प्रेमानं हात फिरवला. अन्‌ उघड्या आकाशात आला.

समोरच्या एका जनावराची वेसन काढली. त्याचा फास केला. समोरच्याच झाडाला लटकवला. आतून एक तुटका-फुटका रिकामा डबा आणला. त्यो पालथा घालून त्याच्यावर उभा राहिला. शेवटचा विचार करू लागला, काळ्या आईला इकावं म्हटलं तर त्याचा कायबी उपेग होणार नाय. कारण त्यातनं कर्जाच्या पैशाचं थकलेलं व्याज बी फिटायचं नाय. गेली 4- 5 वर्ष कशीबशी काढली. आता एक क्षणही घालवणं शक्‍य नाय. रिकाम्या डब्यावरून त्यानं हे जग सोडून जाण्यासाठी फासात गळा अडकवला. त्याच्या म्हणण्याप्रमाणे तो फास त्याला या साऱ्या व्यापातून मुक्त करणार होता. आता त्याला या मुक्ततेपासून कोणीही मुक्त करू शकणार नव्हतं. समोर बसलेली दोन जनावरं तरीही हाक देत होती, ‘मालक आमी हायेत, लढा, लढा...‘

(Courtesy: esakal.com) 

Related Posts:

  • स्पर्श : ERROR    कितीही केलं तरी प्रोगाममधील एरर निघत नव्हती. त्यामुळे तो त्रागा करत चहा प्यायला बाहेर पडला. कंपनीच्या कॅंटीनपेक्षा विरंगुळा म्हणून तो बाहेरच्या टपरीवर चहा प्यायला आला. टपरीवरचा पोऱ्या कष्टांन चहा तयार करत ह… Read More
  • स्पर्श : 'खोटं कधी बोलू नये,चोरी कधी करू नये' "खोटं कधी बोलू नये. चोरी कधी करू नये....‘ बोलता बोलता त्यानं आपल्या लहानग्या मुलीच्या डोळ्याकडं पाहिलं. ते मिटले होते. हा ही शांत झाला. स्वत:च्या मुलीवर अन्‌ तिच्या आईवर याचं फार फार प्रेम करत होता. मुलीवर चांगले संस्कारह… Read More
  • स्पर्श : उत्तर आकाशातील लाल गोळा खाली जात होता. तर याच्या पोटात भुकेचा गोळा उगवत होता. संपूर्ण दिवस दोन कटिंगवर काढत तो खूप धावला होता. रविवारी रस्त्यावर गर्दी असल्याने त्याने विकायला आणलेली खेळण्यातील "विमाने' सिग्नलवर थांबूनच चांगली … Read More
  • स्पर्श : स्मार्ट पोराचा 'स्मार्ट फोन' त्याला आज सुटीच होती. आई काही कामानिमित्त बाहेर गेली होती. वृद्धापकाळ आणि आजारामुळे त्रस्त वडिल घरातील बेडरूममध्ये आराम करत होते. तर स्मार्ट मुलगा बाहेरच्या खोलीत स्मार्ट फोनला प्रेमळ स्पर्श करत होता. व्हॉटस्‌ऍप, फेसबुक… Read More
  • स्पर्श : 'मालक आमी हायेत, लढा, लढा...' त्यानं काळ्या आईला साष्टांग दंडवत घातला. "माय तुले पाणी पाजू शकलो नाय म्या! माफी कर माय, माफी कर...‘ गेल्या अनेक दिवसांपासून तो तिला असाच अश्रूंचा अभिषेक घालत होता. पण तो पुरेसा नव्हता. आभाळातील गोळा त्याच्या घरी जात होत… Read More

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...