3/03/2015

स्पर्श : देवाचा नवस

"प्लिज देवा, मला, नोकरी मिळू दे. पहिल्या पगारातील 5 टक्के वाटा तुला अर्पण करेल. प्लिज देवा!‘ त्यानं देवापुढे हात जोडून देवापुढं प्रार्थना करत देवाशी व्यवहारही ठरवून टाकला. फक्त त्याचं नाव "नवस‘ असं ठेवलं. मुलाखत चांगली झाली होती. तसा तो हुशारही होता. पण घरची परिस्थिती हलाखीची होती. कॉलेज संपून महिनाही उलटला नव्हता. निकालाची वाट पाहण्यापेक्षा त्याला चांगली नोकरी शोधणं जास्त गरजेचं होतं. कॉलेजच्या कोणत्यातरी योजनेद्वारे तो नोकरी करतच शिकला होता. मात्र कॉलेज संपल्यानं नोकरी संपली. शिक्षण संपलं. आता पूर्णवेळ नोकरीतच तो पूर्ण आयुष्य घालणार होता. खिसा रिकामाच असल्याने दररोज एका एका मित्राच्या खोलीवर राहून कसेबसे दिवस काढत होता. यातच बाप अजूनही घरखर्चासाठी काही मागत नाही, यामुळं समाधान मानत होता.

काही दिवसांनी त्याला हवी असलेली अन्‌ देवाकडे मागितलेली नोकरी त्याला मिळाली. त्याच्या आनंदाला आकाश कमी पडले. नोकरीमुळे याचा आत्मविश्‍वासही उंचावला होता. ठरल्याप्रमाणे तो नोकरीला रूजूही झाला. पहिल्या पगाराच्या भरवशावर अनेकांना आश्वासनं देत कसा बसा महिनाही भरला. पहिल्या पगाराचा दिवसही उजाडला. ठरल्याप्रमाणं पगारही मिळाला. सगळ्यात पहिल्यांदा त्यानं देवाचा नवस पूर्ण करण्याचं ठरवलं. कामाचा दिवस असल्यानं आज देवळात फार गर्दी नव्हती. पहिल्या पगारातील ठरलेली रक्कम घेऊन तो देवाला नमस्कार करून दानपेटीजवळ आला. दानपेटी खिडकीजवळ होती. सहजच त्याची नजर खिडकीतून बाहेर गेली.

दुर्धर आजारानं कुरूप झालेला एक मनुष्य दोन्ही हातांनी मंदिरातील भक्तांना मदतीची याचना करत होता. देवळातील माणसं देवाकडं पाहत होती. अन्‌ देवळाबाहेरील याचक माणसांकडं पाहत होता. देवळातील देवासह सर्वांनाच याचकाचे हात दिसत होते. पण कोणाचेही पाय याचकाकडे वळत नव्हते. अर्थात याचकाचा अन्‌ देवळातील लोकांचा तो नित्यक्रमच होता. दानपेटीजवळ पैसे हातात घेऊन उभ्या असलेल्या यानं एकदा देवाकडं पाहिलं. एकदा याचकाकडं पाहिलं. देव निश्‍चल होता. याचक चलबिचल करत होता. देव काहीच मागत नव्हता. याचक काहीतरी मागत होता. पण देवाला खूपकाही मिळत होते. याचकाला फार काही मिळत नव्हते. याने देवाला नमस्कार केला. खिडकीबाहेरील याचकाजवळ गेला. याचकाच्या हातात पैसे ठेवले. याचकाच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. त्याच आनंदाचे याच्याही चेहऱ्यावर प्रतिबिंब उमटले. तशाच अवस्थेत सांगता न येणारं समाधान घेऊन तो देवळाबाहेर पडला. पण त्याला ‘नवस‘ फिटला का नाही हे मात्र काही केल्या समजत नव्हतं.
(Courtesy: esakal.com)

Related Posts:

  • स्पर्श : स्मार्ट पोराचा 'स्मार्ट फोन' त्याला आज सुटीच होती. आई काही कामानिमित्त बाहेर गेली होती. वृद्धापकाळ आणि आजारामुळे त्रस्त वडिल घरातील बेडरूममध्ये आराम करत होते. तर स्मार्ट मुलगा बाहेरच्या खोलीत स्मार्ट फोनला प्रेमळ स्पर्श करत होता. व्हॉटस्‌ऍप, फेसबुक… Read More
  • आनंदाश्रू (बोधकथा) अंजनीपूर नावाचे एक गाव होते. त्या गावात एक हुशार मुलगी राहत होती. ती अभ्यासात खूप हुशार होती. गाणंही छान म्हणायची. शाळेतील सगळ्या उपक्रमांत ती उत्साहाने सहभाग घ्यायची आणि हो, दररोज आई-बाबांचे आशीर्वाद घेऊन शाळेत जायची.… Read More
  • 'तो' नसल्याची खंत... त्यानं थोरलीला संसार थाटून दिला. कमीत कमी खर्चात कसंबसं लग्न पार पाडलं. माणसं चांगली शिकली सवरलेली होती. समजून घेणारी होती. तरीही लग्नात मुलाकडील मंडळींनी किरकोळ कुरबुरी चालू होत्याच. जगाची रित म्हणून त्याला काही वाटलं … Read More
  • स्पर्श : 'खोटं कधी बोलू नये,चोरी कधी करू नये' "खोटं कधी बोलू नये. चोरी कधी करू नये....‘ बोलता बोलता त्यानं आपल्या लहानग्या मुलीच्या डोळ्याकडं पाहिलं. ते मिटले होते. हा ही शांत झाला. स्वत:च्या मुलीवर अन्‌ तिच्या आईवर याचं फार फार प्रेम करत होता. मुलीवर चांगले संस्कारह… Read More
  • स्पर्श : 'मालक आमी हायेत, लढा, लढा...' त्यानं काळ्या आईला साष्टांग दंडवत घातला. "माय तुले पाणी पाजू शकलो नाय म्या! माफी कर माय, माफी कर...‘ गेल्या अनेक दिवसांपासून तो तिला असाच अश्रूंचा अभिषेक घालत होता. पण तो पुरेसा नव्हता. आभाळातील गोळा त्याच्या घरी जात होत… Read More

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...