5/03/2015

मनातला भूकंप

तो पुन्हा एकदा दारू पिऊन आला. बायकोला शिव्या देऊ लागला. जेवायला मागू लागला. बायकोने काहीही न बोलता त्याला जेवू घातले. जेवतानाही तो ओरडत होताच. कसेबसे जेवण संपवून तो पुन्हा बडबड करू लागला. त्या गोंधळाने त्यांची छोटीशी झोपडीही थरथरू लागली. त्याची बायको मोलमजूरी करायची. दोन पोरींसह त्यालाही पोसायची. तो ड्रायव्हर होता. कधीतरी कामावर जायचा. एरवी दारूत बुडायचा. दारूसाठी पैसाही बायकोकडेच मागायचा. दिले नाही तर मारायचा. बायको पोरींसाठी पै पै साठवायचा प्रयत्न करायची.

जेवण झाल्यावरही त्याची बडबड सुरूच होती. मध्यरात्र उलटून बराच अवधी झाला होता. गोंधळामुळे झोपडीत कोणीच झोपू शकले नाही. अनेक दिवसांपासून बायको शांत होती, सहन करत होती. आता तो तिला मारहाण करू लागला. ती शांत राहण्याची आर्जवं करू लागली. हळूहळू तिच्या सहनशीलतेचा अंत होऊ लागला. ती पुन्हा पुन्हा त्याला शांत करू लागली. तो तिला मारतच राहिला. तिचे स्वत:वरील नियंत्रणच सुटले. त्याच्या तावडीतून सुटून ती थेट झोपडीच्या बाहेर आली. बाहेर धुण्यासाठीचा मोठा दगड पडलेला होता. रागाच्या आवेशात तिने तो उचलला. पुन्हा झोपडीत आली. त्याला धक्का देऊन खाली पाडत तिने त्याच्या डोक्‍यातच दगड घातला. क्षणार्धात त्याचा आवाज बंद झाला. होत्याचे नव्हते झाले. झोपडीत निरव शांतता पसरली. रक्ताचे पाट झोपडीभर वाहू लागले. पण हिच्या मनात अशांतता पेटली.

पहाट उजाडायला आणखी काही अवधीच बाकी होता. तिच्यासह दोन पोरी सैरभैर झाल्या. त्यांना काय करावं कळेचना. काही क्षणात झोपडीही हलू लागली. हिचाही तोल गेला. मुलीही पाळण्यात बसल्याप्रमाणे हलल्या. भीती, अस्वस्थता आणि दु:खाच्या जगातून सावरत काही वेळाने ती झोपडीबाहेर आली. बाहेर सगळीकडे हा:हाकार माजलेला. "भूकंप भूकंप‘ म्हणून लोक पळत होते. मनातील चलबिचलीमुळे हिला भास झाल्यासारखे वाटले. पण बाहेर सगळीकडेच धावाधाव होती. सगळे मदतीसाठी याचना करत होते. शेजारच्या मोठ्या इमारतीला तडे गेले होते. हिने आतून आपल्या दोन्ही पोरीला बाहेर काढले. इकडे तिकडे धावू लागली. जवळच्याच झोपडीतील माणूस "भूकंप भूकंप‘ म्हणत हिच्या झोपडीकडे धावला. त्याने झोपडीतलं दृष्य पाहिलं. तो धावत पुन्हा तिला शोधू लागला. दरम्यान दिवस वर आला होता. तेवढ्यात शेजारच्या माणसाला ती सापडली. रडून रडून डोळे पार खोल गेलेले. केस विस्कटलेले. एव्हाना बचावपथकही घटनास्थळी पोचले होते. शेजारचा माणूस तिला सांगू लागला, "तुझा दादला मेला भूकंपात. लई वाईट वाटलं. जे झालं ते झालं. तू जा, अन्‌ त्या सायबाला सांग. नाव नोंदव. भूकंपात मेल्याची नुस्कानभरपाई देत्यात. किमान लाखभर तरी मिळतील!‘

तिच्या काळजात धस्सं झालं! काय केलं अन्‌ काय झालं... तिच्या मनात मोठा भूकंप झाला... नाव नोंदवावे की नाही हे मात्र काही केल्या तिला समजेना...

(Courtesy: esakal.com)

1 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...