6/08/2015

स्पर्श : 'दहावीचा निकाल!'

बापाच्या मागं मोठ्ठं कर्ज होतं. एका पोरीच्या लग्नासाठी घेतलेलं. आता एक मुलगा अन्‌ बायको एवढाच त्याचं कुटुंब होतं. ऊस तोडत तोडत तो हळूहळू कर्ज फेडत होता. पण अनेक वर्षे झाले तरी कर्ज फिटत नव्हते. तुटपुंजे उत्पन्न, फिरता संसार यामुळे पोराला शाळेत पाठविता येत नव्हतं. नाही म्हणायला वारसानं मिळालेलं एक छोटसं घर होतं. पण तिथं तो फारसा नव्हताच. पोटाची खळगी आणि कर्जाचा हप्ता फेडण्यासाठी कधी पडेल ते काम, पडेल तिथं जायचं. कधी ऊस तोडायचा, कधी दगड फोडायचे अन्‌ कधी लोकांना चालण्यासाठी रस्ते निर्माण करायचे. स्वत:साठी रस्ता मात्र कधीच तयार करू शकत नव्हता. पैसे येत होते. पण नियोजन करता येत नव्हते.

एक पोरा मात्र कधीच ऊस तोडायला आला नाही. आला तरी दूरवरून सगळं बघत बसायचा. त्याला शाळेत जायचं होतं. अन्‌ बाप शिकवू शकत नव्हता. ऊस तोडणीचा मोसम आला होता. आता ऊस तोडायचे कामही मिळाले होते. काम देणाऱ्यानं ट्रॅक्‍टरही दिला होता. तसेच सोबत गावातील इतर काही मंडळींनाही घेऊन येण्यास सांगितले होते. यानं सगळी तयारी केली. सगळेजण तयारीनिशी कामाला निघाले. बापानं पोऱ्याला आवाज दिला, "पोऱ्या चल. बैस टॅक्‍टरात. तेवडच पैकं मिळतील जास्तीचे‘ बापानं पोराला आदेश दिला. मात्र पोर जागचा हलला नाही. काही वेळातच किशोरवयातला तो पोऱ्या "मला नाय तोडायचा ऊस. मला साळंला जायचयं‘ असं म्हणत रडू लागला.

पोराला आपल्याशिवाय पर्याय नाय. अन्‌ परत पुन्हा आपल्याकडं येईल या विचाराने बाप पुढे निघाला. मायचा जीव खालीवर होऊ लागला. बापानं दोन-चार वेळा हाका मारल्या. पण पोऱ्या जागचा हलला नाही. आता मात्र, बापाला राग आला. तो ट्रॅक्‍टरातून खाली उतरला. अन्‌ त्याच्या दिशेने धावू लागला. पोरा दूरवरून हे पाहत होता. कोणताही विचार न करता तो दूर धावत गेला. पुढे जाण्यासाठी मागे वळून न बघताही पोरा पुढे धावू लागला. "पोरगं हातचं गेलं‘ म्हणत बापानंही सोडून दिलं.

इकडं हा तालुक्‍याच्या ठिकाणी आला. 2-4 दिवस तो भेदरला. पण पुन्हा जिद्दीनं उभं राहिला. दिवसभरात पडेल ते काम करू लागला. रात्री मिळेल तिथे पडू लागला. हळूहळू त्याला जगातील अनेक गोष्टी समजू लागल्या. अशातच वर्षही गेलं. दरम्यान त्यानं शाळेत जायचं स्वप्नही पूर्ण केलं. बापाचं कर्ज किती, व्याज किती, त्यानं दिले किती याचाही त्यानं हिशेब मांडला. बघता बघता आणखी काही वर्षेही सरली. त्यानं मागे वळून पाहिलचं नाही. काम आणि शिकण्याचं स्वप्न यातच तो रमून गेला. शिकता शिकता तो दहावीतही पोचला. परीक्षाही दिली. आता आज त्याच्या दहावीचा निकाल होता. निकाल पाहण्यासाठी तो कुठल्यातरी इंटरनेट कॅफेत आला आणि काही वेळातच हर्षोल्हासाने धावतच बाहेर पडला... त्यानंतर शाळेत भेटण्यासाठी गेला. तो त्याच्या शाळेत पहिला आला होता. त्यामुळे त्याला कुठलीतरी शिष्यवृत्तीही मिळाली होती. आता त्याला आई-बापाची फार आठवण आली. तो तातडीने गावाच्या दिशेने निघाला. बापाच्या कर्जदाराला तो हिशोब मांडून दाखविणार होता. कर्जदाराला जाब विचारणार होता. आणि पुढे खूप शिकून मोठ्ठं होणार होता...

(Courtesy: www.esakal.com)

Related Posts:

  • '...मला माणूस बघायचा आहे!' शाळेतील कार्यक्रम काही वेळातच सुरू होणार होता. कार्यक्रमाची संपूर्ण तयारी झाली होती. विद्यार्थी रांगेत बसले होते. काही विद्यार्थ्यांचे पालक, शाळेतील सर्व शिक्षक आणि कर्मचारीवृंदही उपस्थित होते. काही वेळाने वक्ते आणि प्र… Read More
  • भ्रमात राहु नका (बोधकथा) गौतम बुद्ध काही शिष्यांना उपदेश करत होते. "आपण जे समजतो तेच सत्य आहे, असे कधीही समजू नका. कदाचित सत्य काही तरी वेगळेच असू शकते. सतत डोळे उघडे ठेवा. जाणीवा जागृत ठेवा.' असा उपदेश बुद्धांनी केला. त्यावर काही शिष्यांना अधिक… Read More
  • क्षमायाचना (बुद्धकथा) एका गावात एक मोठा व्यापारी होता. त्याला चार मुले होती. त्याची चारही मुले दररोज बुद्धांसमोर तीन-चार तास बसत होती. व्यापाऱ्याला प्रश्‍न पडला. मुले बुद्धांसमोर बसण्यापेक्षा दुकानात बसली तर जास्त नफा होईल, व्यापाऱ्… Read More
  • कष्टाचे फळ (बोधकथा) एका संयुक्‍त कुटुंबात अनेक जण एकत्र राहात होते. घरात आजोबा, आजी सर्वांत ज्येष्ठ होते. त्यांना पाच मुले होती आणि दहा नातवंडे होती. आजी-आजोबा आता खूप वृद्ध झाले होते. तरीही ते निरोगी होते. त्यांनी मुलांना आणि नातवंडांवर चांग… Read More
  • प्रिय लेकरांनो (मराठी भाषेचे विद्यार्थ्यांना पत्र)... प्रिय विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, ओळखलतं का मला? मी तुमची मायमराठी, मराठी भाषा, तुमची मातृभाषा. माझ्यामुळेच दररोज तुम्ही परस्परांशी संवाद साधू शकता. आज माझा अर्थात मराठीचा राजभाषा दिन. म्हणूनच तर यानिमित्ताने मी तुमच्या… Read More

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...