कॉलेजची मित्रमंडळी बऱ्याच दिवसांनी एकत्र आली होती. बहुतेक जण नोकरी करणारे होते. बऱ्याच दिवसांनी भेट झाली होती. त्यामुळे निवांत गप्पा सुरु होत्या. तरीही मध्ये-मध्ये काहीजण व्हॉटस् ऍप पाहत होते. बराच वेळ हा प्रकार चालला होता. त्यावर नाराजी व्यक्त करत एकाने झापायला सुरुवात केली. "आयला, आमी काय इथं मुडदे हायत का? जे आहेत त्यांच्यापेक्षा जे नाहीत त्यांच्याशीच गप्पा. काय राव? बंद करा की ते...‘, अशा शब्दांत नव्या विषयालाच सुरुवात झाली. "या फोनमुळं ना लय ताप झालाय राव!‘, आणखी एकाने सुरात सूर मिसळला. तो बोलू लागला, "परवा मला मेसेज आला काय तर "नोकरीमें मजा मारने के तरीके‘ कुणाला एवडा टाइम असल राव. सुचवायचं, टाईप करायचं आणि पाठवायचं?‘ त्यावर मार्केटिंगमध्ये काम करणारा एक मित्र म्हणाला, "व्हॉटस् ऍप‘वर हे असले मेसेजेस म्हणजे धंदा हैं भौ धंदा... हे असले मेसेज कोणीतरी प्रमोशनसाठी वापरतात आणि पुढे कॉपी-पेस्ट करत आपल्यापर्यंत पोचतोत ते‘, त्याच्याशी मात्र फार जणांनी सहमती दर्शविली नाही. "छोड ना यार, गप्पा मारू‘, मगाशी फोनला टच करण्यात गुंग असणाऱ्यानेच शहाणपणाचा सल्ला दिला. "काही म्हणा राव पण या व्हॉटस् ऍपमुळे टाईमपास होतो.‘ एकाने तक्रारीच्या सुरात सांगितले. तर त्यावर दुसऱ्याने तत्त्वज्ञान सांगायला सुरुवात केली, "माणसाचा स्वत:च्या मनावर ताबा नाही. त्याला एखादी गोष्ट मिळाली की ती ओरबाडून तिचा चोथा करायची सवयच असते. त्यामुळे एकवेळ अशी येते की ती गोष्टच नकोशी होते. मग ते व्हॉटस् ऍप असो नाहीतर काहीही...‘ त्यानंतर बराच वेळ या विषयावर खलबते झाली. अगदी टोकाची मतं समोर आली. अर्थात जे बोलत होते ते सगळे रोजच "व्हॉटस् ऍप‘चा वापर करत होते. "खाजगी चॅटिंगसाठी हे फार सोपे आणि फास्ट मेसेंजर ऍप आहे‘, असा विचार एकाने मांडला. तर त्यावर "अरे, भौ तुला माहितेय का खाजगी-बिजगी काहीही नसतं. तू व्हॉटस्ऍपवर ज्या गप्पा मारतो त्यावर कंपन्यांचं लक्ष असतं. तुझ्या गप्पांच्या विषयानुसारच तुझ्या फेसबुकवर जाहिराती दिसतात‘, पुन्हा मार्केटिंगवाल्याने ज्ञानदान केले. "अरे ते कसं शक्य आहे.?‘ एकाने आश्चर्य व्यक्त केलं. "टेक्नॉलॉजी है. टेक्नॉलॉजी यहॉं कुछ भी असंभव नही है।‘ मार्केटिंगवाला चांगलाच पेटला होता.
एवढा वेळ शांत असलेल्या एका मित्राने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मौन सोडत म्हटले, "तुम्ही कोणत्याही गोष्टीला नावं ठेवू नका रे. त्यात बी पॉझिटिव्ह काय आहे तेवढं बघा.‘ पुढचे काही क्षण शांतता पसरली. "त्यात काय बे बी पॉझिटिव्ह. तू काय करतो सांग की? म्हणे बी पॉझिटिव्ह...‘, एकाने तीव्र शब्दांत टीकास्त्र सोडले. "आता हे बघा. आम्ही काही चांगल्या गोष्टी आमच्या व्हॉटस् ऍप वरून करतो. सगळ्यात पहिली की शक्यतो "अनवॉन्टेड‘ वाटणारे मेसेजेस फॉरवर्ड करत नाहीत किंवा रिसीव्ह झाले तर तिथंच पाठवणाऱ्याला कडक सुनावतो. ग्रुपवर शक्यतो पॉझिटिव्ह चर्चा ठेवतो. गरज नसताना फालतू मेसेज फॉरवर्ड करतच नाही. कोणी चुकून केलाच तर मात्र त्याला गय नाही. त्याला त्याच्या चुकीची शिक्षा म्हणून दोन दिवस ग्रुपच्या बाहेरचा रस्ता दाखवतो. "पुन्हा अशी चूक करणार नाही‘ अशा अटीवर दोन दिवसांनी ग्रुपमध्ये घेतो. अर्थात कसलेही विनोद आम्ही सहन करतो. पण ते ही ठराविक मर्यादेपर्यंतच. उगाच एखाद्या पॉलिटिकल पार्टीला किंवा व्यक्तीला किंवा कोणाच्या भावना दुखावतील अशा मेसेजेस अजिबात थारा नाही.‘ सगळेजण जरा जास्तच मौन सोडलेल्या त्या मित्राला शांतपणे ऐकत होते.
तो पुढे बोलू लागला, "ग्रुपमध्ये महिन्याला किंवा जेव्हा जमेल तेव्हा सर्वांच्या सोयीने एखाद्या विषयाच्या एक्स्पर्टला ग्रुपमध्ये इनव्हाईट करतो. काही तासांसाठी किंवा फार-फार तर दिवसभरासाठी. त्याच्याशी वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारतो. त्या त्या फिल्डची माहिती घेतो. प्रश्न विचारतो. आणि गप्पा झाल्या की ठरल्यावेळी आनंदाने निरोपही देतो. असंच आमच्या एका ग्रुपमधल्या मित्राला दुसऱ्या ग्रुपमध्ये एक दिवसासाठी ऍड करतो. सर्वांच्या ओळखी करून देतो आणि निरोप देतो. त्यातून ओळखी निर्माण होतात. खरंखुरं "सोशल नेटवर्किंग‘ घडतं. शिवाय एखाद्या गरवंताला आर्थिक किंवा अन्य काही मदत हवी असल्यास माहितीची शहानिशा करून त्याबाबतचा संदेशही अनेक ग्रुपवर पाठवतो.‘ एवढं बोलून तो थांबला.
"तसं अवघड आहे. एवढा खटाटोप करणं. पण अशक्य मात्र नाही‘, असं म्हणत सर्वांनीच या पॉझिटिव्ह विचारांना पॉझिटिव्ह प्रतिसाद दिला.
(Courtesy: eSakal.com)





0 comments:
Post a Comment