Jan 30, 2016

आई, मला पंख आहेत, पण...!

आई, मला पंख आहेत, पण...! 

एक मोठं झाड होतं. त्यावर अनेक पक्षी राहत होते. तिथं खूप सारे खोपे होते. एका खोप्यामध्ये तीन पक्षी होते. आई-बाबा आणि त्यांचे पिल्लू. दोघांचे आपल्या पिल्लावर खूप प्रेम होते. पिल्लू अगदी छोटेसे होते. चोचीतून आई-बाबा त्याला भरवत होते. दिवस जात होते. पिल्लू वाढत होते. खोप्यामध्येच खेळत होते. "तुला पंख आहेत. तू उडू शकतो. बागडू शकतो‘, पिल्लाला सांगण्यात आलं. शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकायचं नाही. सहजपणे मिळालेले अन्न घ्यायचं नाही. कष्टाने शोधूनच पोट भरायचं. असं सगळं आई-बाबा शिकवत होते. आता पिल्लाला उडण्याचे वेध लागले. निळसर आकाश त्याला खुणावत होतं. 


काही दिवसांनी आई-बाबांनी सांगितल्याप्रमाणे पिल्लानं एक दोन वेळा आकाशात झेप घेतली. सुरुवातीला त्याचा तोल गेला. पण प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर शेवटी त्यानं झेप घेतलीच. उंच आकाशात. तो उडत राहिला. त्याला स्वत:चेही भान राहिले नाही. खूप दूरपर्यंत पोचला. मात्र, काही वेळातच नाजूक पंखातील त्राण संपले. भूक लागली. तेवढ्यात त्याला काहीतरी खायला दिसले. त्याने कोणताही विचार न करता थेट झेप घेतली. तिथं त्याला भरपूर खायला मिळालं. खाल्ल्यानंतर थकल्यानं पिल्लू तिथचं निजलं. काही वेळाने त्याने डोळे उघडले. आजूबाजूला केवळ लोखंडाची जाळी होती. बाहेर आकाश दिसत होतं. पण बाहेर जाण्याचा रस्ता बंद होता. त्यानं जाळीवर खूप धडक दिली. इवल्याश्‍या पंखातून रक्त आलं. तो पिंजरा होता. स्वातंत्र्य संपलं होतं. पारतंत्र्य सुरु झालं होतं. पिंजऱ्यात आणखी काही पिल्लं होती. ती ही अशीच पिंजऱ्यात अडकली होती. पण त्यांना आता सवय झाली होती. पिंजरा हेच त्यांचं विश्‍व होतं. शेवटी बाहेर उडून कष्ट करून पोट भरण्यापेक्षा इथं फुकटच त्यांचं पोट भरत होतं. त्यातच ते आनंद मानत होते. पिल्लाला हे पटलं नाही. तो आणखी त्रस्त झाला. पण आता पर्याय नव्हता. दार बंद होतं. आत खायला होतं. पुढे 1-2 दिवस त्रागा करून ते थकून गेलं. त्यानंही हेच आपलं विश्‍व मानायला सुरुवात केली. असेच काही दिवस गेले. 

इकडे पिल्लाचे आई-बाबा अजूनही पिल्लाला शोधत होते. दूरपर्यंत जाऊन रोज त्याचा शोध घेत होते. पण पिल्लू सापडत नव्हतं. आई-बाबा थकून जात होते. पण शोध थांबवत नव्हते. अशातच काही दिवस गेले. आता पिल्लू थोडं मोठं झालं होतं. पिंजऱ्यात चांगलच रूळलं होतं. पिंजऱ्यात अन्न होतं, पाणी होतं, छोटासा झोपाळाही होता. सोबतचे मित्र बनले होते. दिवसभराचा कार्यक्रमही ठरला. सुरुवातीला पिंजऱ्यातच उडणारं पिल्लू आता उडणच विसरुन गेलं. पिंजराच खोपा अन्‌ पिंजराच कुटुंब बनलं.
एकेदिवशी आई-बाबांना शोध घेताना पिल्लाचा पिंजरा दिसला. त्यांनी दुरूनच पिल्लाला पाहिलं. आजूबाजूला कोणी नसल्याचं पाहून ते पिंजऱ्याजवळ आले. पिल्लाला हाक मारली. पिंजऱ्यातील सारे जण त्यांच्या समोर आले. मात्र आई-बाबा आणि त्यांच्यामध्ये लोखंडी जाळी होती. आईच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या. पिल्लाची तब्येत सुधारली होती. पण चेहऱ्यावर तेज उरलं नव्हतं. पिल्लाची अवस्था पाहून बाबाही हळहळले. जाळी तोडण्याचा आई-बाबांनी खूप प्रयत्न केला. पण चोचीलाच त्रास झाला. आईच्या डोळ्यातून पाणी अन्‌ चोचीतून रक्त वाहू लागलं. मग बाबांनी सर्वांना सांगितलं, "संध्याकाळी पिंजरा उघडा ठेवला जातो. तुम्ही बाहेर या अन्‌ उंच आकाशात झेप घ्या. आम्ही समोर झाडावर आहोत‘, सर्वांना ते पटलं. बाबांनी अनेकदा पक्षी असलेले उघडे पिंजरे पाहिले होते. आई दूर व्हायला तयार नव्हती. पण बाबांनी पटवून सांगितलं. 


संध्याकाळी पिंजऱ्याजवळ एक माणूस आला. त्यानं पिंजऱ्याचे दार उघडं ठेवलं. आई-बाबांनी इशारा केला. पिल्लू दाराशी आलं. बाहेर झेप घेऊ लागलं. पण आश्‍चर्य? त्याला उडताच येत नव्हतं. एवढ्या दिवसात उडण्याची कलाच पक्षी विसरून गेला होता. आपल्याला पंख आहेत याचीही त्याला आताच आठवण झाली होती. तरीही धडपड करताना पिल्लू पिंजऱ्याबाहेर जमिनीवर कोसळलं. तिकडून माणूस आला. त्यानं पिल्लाला उचललं अन्‌ पुन्हा पिंजऱ्यात टाकून दार बंद केलं. ही सारी शोकांतिका दूरवरून आई-बाबा पाहत होते. पिंजऱ्यातून पिल्लू ओरडून म्हणत होतं, "आई मला पंख आहेत, पण...‘ आईच्या डोळ्यातून पाणी आणि चोचीतून रक्त अद्यापही सुरुच होतं.
(Courtesy: eSakal.com)

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...