6/23/2016

इतक्‍या पगारात कसे भागेल?

तो चांगल्या कुटुंबातील होता. शिक्षणही चांगले झाले होते. एक चांगली कायम नोकरीही त्याला होती. मात्र कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी सुदृढ नव्हती. तरीही कुटुंब खाऊन-पिऊन सुखी होते. तो त्याचे आई आणि वडील असे त्यांचे कुटुंब होते. वडिल खाजगी सेवेतून निवृत्त झाले होते. तर आई गृहिणी होती. तो आई-वडिलांच्या आज्ञेत होता. आता त्याचे लग्नाचे वय झाले होते. वधू संशोधन जोरात सुरू होते. 

"मुलाला सरकारी नोकरी हवी‘, "मुलाला एवढाच पगार हवा‘ अशा प्रकारच्या मुलीकडून आलेल्या प्रतिसादामुळे आई-वडिल त्रस्त होते. तरीही आई-वडिल प्रयत्न सुरूच ठेवत होते. एकदा एका मुलीच्या आईला फोन केला. मुलाची माहिती वगैरे सांगितली. शेवटी चर्चा मुख्य प्रश्‍नापर्यंत पोचली. "मुलाला पॅकेज किती?‘ मुलीच्या आईने प्रश्‍न केला. त्यावर याच्या आईने पगाराचा आकडा सांगितला. "इतक्‍या पगारात कसे भागेल हो?‘, असे खडे बोल सुनावत मुलीच्या आईने अप्रत्यक्षपणे नकार कळविला. त्यावर काय उत्तर द्यावे हे याच्या आईला समजलेच नाही. तिने कशीबशी चर्चा थांबविली आणि फोन ठेवला. मात्र त्यानंतर आई-वडिल पुन्हा व्यथित झाले. हा सारा प्रकार घडताना मुलगा समोरच होता. तो ही जरा व्यथित झाला आणि आपल्या मित्राला भेटायला बाहेर पडला. 

मित्र नोकरी करत नव्हता. काहीतरी उलाढाली करून चांगले पैसे कमवायचा. घडलेला सारा प्रकार त्याने मित्राला सांगितला. मित्र म्हणाला, "अरे पेमेंट, इन्कम, पैसा, रुपया तर मेन पॉईंट आहे ना!‘ त्यावर हा म्हणाला, "अरे पण सगळं पैशातच मोजणार का?‘ मित्राने सरळ सांगितले, "तू काही म्हण पण या जगात एखाद्याची इमेज पैशात मोजण्याची या जगाची पद्धत आहे.‘ त्यावर प्रचंड त्रागा करत हा म्हणाला, "अरे पण ही असली तुलना करणं बरोबर आहे का?‘ "अगदीच बरोबर नाही. ते मलाही समजतयं. पण भावा, पैसे कमवायला अक्कल लागते. हुशारी नाही. आणि आपलं जग अक्कल पाहतं. हुशारी नाही. तुला राग येऊ देऊ नको. पण तुझं लग्नाचं वय झालं आहे. धडपड करून तू खूप पैसे कमावू शकला असतास ना? पण नाही तू तुझ्या कोषात राहिलास. रिस्क घेतली नाहीस. म्हणून तू धडपडच करणेही विसरलास ना! म्हणून ही अशी अवस्था.‘

त्यावर याने नाराजी व्यक्त करत म्हटले, "चल, तू ही आमच्यावरच...‘ त्याला थांबवत मित्र म्हणाला, "तुला राग येऊ देऊ नको. पण तुझ्याबद्दल मनातून वाटतं म्हणून बोलतो. शेवटी तुला राग आला तरी चालेल पण वास्तवाची जाणीव करून देणं हे मला माझं कर्तव्य वाटतं. अजूनही प्रयत्न कर ना! मी आहे. सोडून दे कोष. शोध नवी नोकरी. नाहीतर काहीतरी बिझनेस जमतो का बघ?‘ "पण भीती वाटते रे!‘ मित्र शांतपणे म्हणाला, "हे बघ फार काय होईल तुला नुकसान होईल किंवा एखादवेळी कमी पैसे मिळतील, नोकरी मिळणार नाही. पण तू मरणार तर नाहीस ना? दोन वेळचे अन्न खाशील एवढे कमावशील ना!‘ याच्या डोक्‍यात ट्युब चमकल्यासारखे झाले. हा म्हणाला, "ठीक आहे. काहीतरी हालचाल करायलाच हवी.‘ "एस्स. क्‍या बात हैं। जगायचं असेल तर हालचाल करावीच लागते. पैसे कमवावेच लागतात. रिस्क घ्यावीच लागते. त्यानंतर तर जगायला अर्थ प्राप्त होतो‘, मित्राने पाठीवर हात ठेऊन लढण्याची प्रेरणा दिली.

(Courtesy: eSakal.com)

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...