6/22/2016

हे अपंगत्व व्यवस्थेचे!

साधारण सकाळचे अकरा वाजत होते. पंचायत समितीचे कार्यालयही उघडले होते. आज आठवड्याच्या कामाचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे कार्यालयात फारशी गर्दी नव्हती. कार्यालय तसे छोटेच होते. बहुतेकजण रजेवर असल्याने कार्यालयात केवळ एकच महिला कर्मचारी उपस्थित होती. ती तिच्या टेबलावर कामात व्यस्त होती. काही वेळातच तेथे एक 20-22 वर्षांचा तरुण आला. त्याला पंचायतीकडून एक प्रमाणपत्र हवे होते. त्यासाठी त्याने मुदतीत अर्जदेखील केला होता. एका अधिकाऱ्याने त्याला आज बोलावले होते. मात्र संबंधित अधिकारी आज जागेवर नव्हता. त्यामुळे तो या महिला कर्मचाऱ्याकडे वळला. तिच्याकडे त्याने प्रमाणपत्राबाबत विचारणा केली. महिलेने जवळचे कपाट दाखवत ‘थोडा वेळ थांबा. आमचा शिपाई येईल. तो या कपाटातून काढून देईल तुमचे प्रमाणपत्र‘ असे म्हणत त्याला थांबायला सांगितले. तरुण समोरच्या लाकडी बाकावर वाट पाहात बसला. 

कार्यालयात आता थोडीशी गर्दी होत होती. महिला कर्मचारी कामात व्यग्र होती. माणसे येत होती. महिला माहिती देत होती. लोक अर्ज वगैरे करत होते. निघून जात होते. अशातच जवळपास 20-25 मिनिटे गेली. मात्र महिला कर्मचारी जागेवरून हलली नाही. आता तरुण फार त्रस्त होत म्हणाला, "अहो कधी येणार तुमचा शिपाई?‘ त्यावर "आतापर्यंत यायला पाहिजे. येईल 5-10 मिनिटांत. तुम्ही थांबा.‘ त्यावर तरुण संयम बाळगत वाट पाहू लागला. हळूहळू कार्यालयात आणखी लोकं येऊ लागली. काम करून निघून जाऊ लागली. तरुण हा सारा प्रकार पाहत होता. याच्यानंतर आलेल्या काही लोकांची कामे याच्या आधी होत असल्याचे याला वाटू लागले. आता त्याला कार्यालयात येऊन जवळपास अर्धा तास झाला होता. तो त्रागा करत महिलेकडे येऊन म्हणाला, "अहो, मॅडम अर्धा तास झाला आहे. अजून का नाही येत तुमचा शिपाई?, असा त्रागा तो तरुण करू लागला. त्यावर "आता येईलच तो. तुम्ही थांबा. नाहीतर जरा वेळाने या‘, महिला कर्मचाऱ्याने शांतपणे सांगितले. 

त्यावर काहीच उत्तर न देता तरुण बाहेर पडला. चहाच्या टपरीवर त्याने कटींगची ऑर्डर दिली. टपरीवर थोडी गर्दी होती. झक्कासपैकी चहा घेऊन त्याने डोके शांत ठेवायचा प्रयत्न केला. तरीही त्याच्या मनात राग होताच. ‘आपली व्यवस्था अशी का?‘ असा विचार त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. तरुण रक्त असल्याने यावरची उपाय योजनेवर तो विचार करू लागला. तेवढ्यात "गोड बोलून आपली कामं करायची भाऊ‘ असा शेजारच्या दोन माणसांचा संवाद त्याच्या कानावर पडला. त्यामुळे याने गोड बोलूनच काम करून घ्यायचं ठरवलं. तो पुन्हा कार्यालयात आला. अतिशय नम्रपणाने त्याने महिला कर्मचाऱ्याकडे विचारणा केली. त्यावर पुन्हा त्याला थांबण्याचा सल्ला मिळाला. या सर्व प्रकाराला आता तास झाला होता. यामुळे आता तरुणाचा संयम सुटत चालला होता. कार्यालयातही आता फार कोणीच नव्हते. सगळेजण आपले काम करून निघून गेले होते. काही वेळाने तो तरुण महिला कर्मचाऱ्याकडे येऊन म्हणाला, "अहो, आम्हाला काही दुसरे काम नाही का? तुम्हाला आमच्या वेळेची काही किंमतच नाही. तुम्ही देता प्रमाणपत्र की मी स्वत:च घेऊ? आणि या इथल्या कपाटातून तुम्हाला माझा कागद काढता येत नाही का?‘ तरुण रागामुळे चांगलाच पेटला होता. आता महिला कर्मचाऱ्याला जागेवरून उठून कपाटातून प्रमाणपत्र काढून देण्याशिवाय पर्याय नव्हता. महिला कर्मचारी काहीच बोलली नाही. तिने शांतपणाने आपल्या समोरील फाईल बंद केली. पुढे काही क्षण काहीच घडले नाही. आजूबाजूला कोणीच नव्हते. एकाएकी ती महिला कर्मचारी खाली वाकल्यासारखे तरुणाला वाटले. आता तर तिचे डोके वगैरे काहीच दिसत नव्हते. 

मात्र तरुणाला पुढे जे दिसले त्यामुळे गेल्या तासाभरातील घडामोडींबद्दल प्रचंड पश्‍चाताप होऊ लागला. महिला खुर्चीतून खाली उतरली होती. कपाटाच्या दिशेने पुढे जात होती. फरक फक्त एवढाच होता की महिलेला दोन्ही पाय नसल्याने ती घसरत घसरत कपाटाच्या दिशेने पुढे सरकत होती. तिची गती अगदी संथ होती. घसरत पुढे जात असल्याने तिला थोडा त्रासही होत होता. निष्ठेने आपले काम करणाऱ्या महिलेबद्दल आपण विनाकारण संशय घेतला म्हणून तरुणाला पश्‍चाताप होत होता. तर कामचुकार अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळे व्यवस्थेल्या आलेल्या अपंगत्वावर पर्याय शोधत होता.

(Courtesy: eSakal.com)

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...