7/06/2017

सायबर दरोडा आणि दहशतही

जगाच्या बऱ्याच भागात पुन्हा एकदा सायबर हल्ल्याची घटना घडली असून, त्यामुळे कामकाजात मोठ्या प्रमाणावर व्यत्यय निर्माण झाला. रुग्णालये, जहाज कंपनी, औषधनिर्माण कंपनी, पोलाद कंपनी आदी ठिकाणांना आता हा संसर्ग भारतातही पसरला आहे. जहाजबांधणी मंत्रालयाने "जेएनपीटी' येथील टर्मिनलवर "रॅन्समवेअर'चा हल्ला झाल्याचे मान्य केले आहे; तर पुण्यातील एका कंपनीनेही असा हल्ला झाल्याचे जाहीर केले आहे. संगणकाच्या भाषेत रॅन्समवेअर हा व्हायरसचा एक भीषण प्रकार आहे. झटपट पैसे कमाविण्याच्या उद्देशाने काही देशांतील तरुणांची टोळी ही घातपाती कृत्ये करीत आहे. जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यातील संगणक ताब्यात घेणे आणि घेतलेला ताबा परत देण्यासाठी खंडणीची मागणी करणे, हा रॅन्समवेअरचा उद्देश आहे. खंडणी मागणाऱ्याचा मागमूस लागू नये म्हणून "बीट कॉईन'सारख्या डिजिटल चलनाच्या माध्यमातून खंडणी मागितली जाते. शिवाय अशा प्रकारात खंडणी दिल्यानंतरही संगणकावरील माहिती आणि संगणक पूर्वावस्थेत येईल, याची कोणतीही शाश्‍वती नसते. शिक्षित टोळीने द्वेषभावनेने केलेल्या दहशतवादाचा हा अतिप्रगत प्रकार समजायला हरकत नाही.

हातात शस्त्र घेऊन किंवा आत्मघातकी दहशतवादी त्या त्या परिसरातील नागरिकांना धोका ठरतात. मात्र, असे दहशतवादी संगणकातील माहितीवर हल्ला करून लाखो जणांना धोका निर्माण करतात. कामकाजाची घडीच विस्कटून टाकतात. अशा सायबर शस्त्रांचा वापरही नजीकच्या भविष्यात वाढत जाण्याची शक्‍यता आहे. विशेषत: शत्रू राष्ट्रांवरील यंत्रणा ठप्प करण्यासाठी आणि त्या माध्यमातून पैसे कमाविण्यासाठी अशा गैरप्रकारांचा वापर वाढणार आहे. माहितीवर आणि संगणकावर विसंबून असलेले जग क्षणार्धात बंद पडू शकते, याची प्रचिती रॅन्समवेअरच्या माध्यमातून झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर भारतासारख्या विकसनशील देशाने माहितीच्या सुरक्षिततेची अधिकाधिक काळजी घेणे, नव्या पिढीला या बाबींची आणि त्यामुळे होणाऱ्या नुकसानीची जाणीव-जागृती करून देणे काळाची गरज बनली आहे.

(सौजन्य इ सकाळ )

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...