5/16/2019

...असं होतं माणसाचं मन शुद्ध! (बोधकथा)

भगवान गौतम बुद्ध आपल्या काही शिष्यांबरोबर दूरच्या प्रवासाला निघाले होते. ते एका गावात पोहोचले. शेजारी नदी वाहत होती. बुद्धांनी सर्वांना थांबण्याचे आदेश दिले. सर्वजण एका झाडाखाली थांबले. बुद्धांनी तहान लागल्याचे सांगितले. एक शिष्य समोर आला. "गुरुवर्य मी शेजारच्या नदीतून पाणी घेऊन येतो' असे म्हणत तो कमंडलू घेऊन नदीकडे निघाला. काही वेळाने तो परतला. मात्र कमंडलू रिकामेच होते. बुद्धांनी विचारले, "पाणी का आणले नाहीस?' त्यावर त्याने या नदीतील पाणी खूप अस्वच्छ असल्याचे सांगितले. तो म्हणाला, "या नदीत कोणी कपडे धुवत आहेत. कोणी जनावरांना स्वच्छ करत आहे. कोणी स्नान करत आहेत. पाणी दूषित आहे. गुरुवर्य ते पाणी पिण्यायोग्य नाही.' यावर बुद्ध म्हणाले, "ठीक आहे. आपण आपला प्रवास सुरू ठेवू आणि पुढे कोठेतरी पाणी पिऊ' सर्व जण त्याच रस्त्याने सरळ पुढे प्रवासाला निघाले. शेजारून नदी वाहतच होती.



साधारण 4-5 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला. त्यानंतर बुद्धांनी पुन्हा सर्वांना थांबायला सांगितले. त्यांनी या आधी पाणी आणायला गेलेल्या शिष्याला बोलावले. त्यालाच पुन्हा पाणी आणण्यास सांगितले. तो कमंडलू घेऊन पाणी आणण्यासाठी वाहत असलेल्या नदीकडे निघाला. नदीचे पाणी स्वच्छ होते. आजूबाजूला कोणीही नव्हते. त्याने कमंडलू बुडवून पाणी भरले. तो बुद्धांजवळ आला. बुद्धांना त्याने कमंडलू दिले. बुद्ध म्हणाले, "मघाशी तुला ज्या नदीतील पाणी अस्वच्छ वाटत होते. त्याच नदीतील हे पाणी आहे. केवळ पुढे वाहत आल्याने ते स्वच्छ झाले. माणसाच्या मनाचेही असेच असते. मनाला एखाद्या चिंतेने ग्रासले की त्रस्त होऊ नये. केवळ काही काळ निघून गेला की या पाण्याप्रमाणे माणसाचे मनही स्वच्छ होते.'

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...