5/17/2019

एक विचार नाश करू शकतो! (बोधकथा)

आटपाट नगर होतं. तेथे एका गुरुकुलात अनेक वर्षांपासून काही शिष्य विद्या ग्रहण करत होते. गुरूकुलातील गुरूजी शिष्यांवर प्रचंड प्रेम करत होते. दरवर्षी शिष्यांची एक तुकडी शिक्षण घेऊन बाहेर पडत होती. गुरूजी दरवर्षी मोठा निरोप समारंभ आयोजित करत होते. शिष्यांना पंचपक्वान्नांचे जेवण दिले जायचे. एका वर्षी अशाच एका निरोप समारंभाची तयारी सुरू होती. एक शिष्य गुरुंकडे आला. तो अस्वस्थ असलेला गुरूजींना दिसला. ते म्हणाले, "काय झाले?' तो बोलू लागला, "गुरूजी, मी गेल्य अनेक वर्षांपासून येथे आलो आहे. मी सर्व विद्या ग्रहण केली. मला त्या साऱ्या विद्या अवगत आहेत. पण इतर शिष्यांप्रमाणे मी एकाही विद्येत पारंगत नाही. माझे आयुष्यात काय होईल? मी समर्थपणे आयुष्य जगू शकेल का? मी प्रचंड अस्वस्थ झालो आहे गुरूजी.' त्यावर गुरूजी काहीही बोलले नाही. शेजारीच एक लिंबाचे झाड होते. गुरूजींनी शांतपणे एक लिंबू काढला आणि शिष्याच्या हातात ठेवला. आणि त्याला स्वयंपाक घरात घेऊन गेले. गुरूजींनी ते लिंबू कापायला सांगितले. शिष्याने ते कापले. आता गुरूजींनी निरोप समारंभातील भोजनासाठी तयार केलेल्या बासुंदीच्या मोठ्या पातेल्याजवळ शिष्याला आणले. गुरूजी म्हणाले, "हे कापलेल्या लिंबाचा एक थेंब फक्त या बासुंदीत सोड.'



शिष्याला आश्‍चर्य वाटले. तो म्हणाला, "गुरूजी त्यामुळे एवढी सारी बासुंदी खराब होईल. वाया जाईल. फेकून द्यावी लागेल. कोणालाही खाता येणार नाही.' त्यावर गुरूजी शांतपणे बोलू लागले, "वत्सा, जर लिंबाच्या एका थेंबामुळे एवढी सारी बासुंदी खराब होत असेल, तर नैराश्‍याच्या, अस्वस्थतेच्या साध्या किरकोळ विचाराने तुझे मन खराब होणार नाही का? ज्याप्रमाणे खराब झालेली बासुंदी कोणी खाऊ शकणारय नाही, ती टाकून द्यावी लागेल. त्याप्रमाणे तुझे खराब झालेल्या मनाचा तरी काय उपयोग?' एवढे सारे ऐकून शिष्याच्या डोळ्यात पाणी आले. त्याने गुरूजींचे चरण धरले. "वत्सा, आयुष्यात कधीही नकारात्मक विचार मनाला स्पर्श करू देऊ नकोस. सतत सकारात्मक विचार कर आणि पुढे जा. एक वेळ शरीरावर जखम झाली तर ती भरून निघेल. पण मनाला जर जखम झाली तर ती भरून येईलच याची शाश्‍वती नाही. त्यामुळे नकारात्मक विचारापासून सतत दूर रहा', एवढे बोलत गुरूजींनी पूर्णविराम दिला.

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...