3/20/2014

माहिती अधिकार आणि संतांची भूमिका

(आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर दि. १८ मार्च २०१४ रोजी प्रसारित झालेले भाषण)


मंडळी, शासन नेहमीच लोककल्याणकारी कायदे लागू करण्याकरिता प्रयत्नशील असते. लोकांना अधिकाधिक हक्क, अधिकार प्राप्त व्हावेत आणि राज्यकारभार हा अधिक सुसूत्रपणाने, पारदर्शी आणि गतीने व्हावा. त्यात लोकसहभाग वाढावा हा हेतू त्यामागे  असतो. यातून राष्ट्राला परमवैभवी करण्याचा प्रयत्न असतो.

माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 हा त्यापैकीच एक कायदा. या कायद्यामुळे पारदर्शकता, उत्तरदायित्व व लोकसहभाग या शब्दांना नव्याने अर्थ प्राप्त झाला आहे. माहितीचा अधिकार कायदा महात्मा गांधीजींची ‘विश्वस्त’ ही संकल्पना स्वीकारतो. या संकल्पनेनुसार शासनकर्ते सार्वजनिक संस्थांमधील माहितीचे मालक नसून केवळ विश्वस्त आहेत. माहितीच्या अधिकाराने माहितीच्या लोकशाहीचे नवे पर्व सुरू झाले आहे. यालाच सुराज्याच्या दिशेने जाणारे ‘दुसरे स्वातंत्र्य’ असेही म्हटले जाते. माहितीचा अधिकार हा घटनात्मक मूलभूत हक्क असणारा कायदा आहे. 12 ऑक्टोबर 2005 पासून माहिती अधिकार अधिनियम, 2005 या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आपल्या देशात सुरू झाली. या कायद्यात एकूण 31 कलमे आहेत. प्रगल्भ लोकशाहीसाठी माहितगार नागरिक व नागरिकांचे समूह घडविणे, नागरिकांचा शासन कारभारातील सहभाग वाढवणे, राज्यकारभारात पारदर्शकता व खुलेपणा निर्माण करणे, शासनयंत्रणेमध्ये नागरिकांच्या प्रति उत्तरदायित्व निर्माण करणे, राज्यकारभार व व्यवस्थेतील भ्रष्टाचारास आळा घालणे, माहिती मिळविण्यासाठी व्यवहार्य यंत्रणा उभारणे इत्यादी या कायद्याची उद्दिष्टे आहेत. या कायद्यात ‘माहिती’ याचा अर्थ कोणत्याही स्वरूपातील कोणतेही साहित्य, असा असून त्यामध्ये अभिलेख, दस्तऐवज, ज्ञापने, ई-मेल, अभिप्राय, सूचना, प्रसिद्धिपत्रके, परिपत्रके, आदेश, रोजवह्या, संविदा, अहवाल, कागदपत्रे, नमुने, प्रतिमाने (मॉडेल), कोणतीही इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील आधार सामग्री आणि त्या त्या वेळी अंमलात आलेल्या अन्य कोणत्याही कायद्यान्वये सार्वजनिक प्राधिकरणास मिळविता येईल अशी कोणत्याही खाजगी निकायाशी संबंधित माहिती यांचा समावेश होतो.

हा कायदा जरी 2005 साली शतकात प्रत्यक्ष अस्तित्त्वात आला असला तरी देखील प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणाने या कायद्याची अधिकृत मागणी आणि अंमलबजावणी फार पूर्वीपासूनच करण्यात येत होती. प्रत्येक वेळी तत्कालिन व्यवस्थेत सामान्यांपासून दडवून ठेवण्यात आलेली माहिती सर्वांसाठी खुली करण्याचे प्रयत्न केले गेले. यात त्या त्या काळातील महापुरुषांनी तसेच संतांनी आणि विद्वानांनी अधोरेखित केले होते. चला तर मग आज आपण माहिती अधिकार कायद्याविषयीची संतांची भूमिका जाणून घेऊयात-

‘ऐसा चैतन्याचा मेरू,
अवघ्या प्रसन्नतेचा तरू।
जैसा भास्कर या नभी शोभतो,
करू या तेजाची आरती ।
घेऊनिया हाती ज्योती॥

संत म्हणजे चैतन्याचा पर्वत असतात. संत म्हणजे प्रसन्नतेचे वृक्ष असतात. त्यांचे जीवन, उद्दिष्ट आणि ध्येय हे आकाशातील सूर्याएवढे शुभ्र आणि स्वच्छ असते. अशा या तेजाची आपण हातामध्ये ज्योती घेऊन आरती करत असतो. जिच्या स्वरूपात बदल होत नाही आणि जिचा अभाव कोणत्याही काळी सिद्ध होत नाही अशी जी चैतन्य वस्तू, तिलाच संत असे म्हणतात. देह आणि अहंकाराशी लढून, त्याचा निःपात करून, कार्यकारण उपाधीवर विजय मिळवून जो आत्मरूप बनला आहे, त्याला मिळणारी एक महान पदवी म्हणजे संतत्व होय. श्रुतिसंपन्नता आणि ब्रह्मनिष्ठता याबरोबरच कृपाळूपणा हा संतांचा महत्त्वाचा गुण. श्रुतिसंपन्नतेने ब्रह्मनिष्ठ झालेले संत सतत कृपेचा वर्षाव करतात. संत व्यक्ती केवळ अध्यात्म मार्गाचा अंगिकार जनमानसांमध्ये रूजवित नाहीत; तर राज्यकर्ते, प्रशासक आणि सामान्य नागरिक यांच्यासाठीही आदर्श जीवनाचरणाचे शिक्षण देतात. आदर्श जीवनाचरणाकरिता शासनाने अंगिकारलेले विविध कायदे त्यांची अंमलबजावणी याबाबतही संतांनी तत्कालिन व्यवस्थेतून भाष्य केले आहे. जे आजच्या काळातही उपयोगी पडतात. संत साहित्याकडे संशोधनाच्या दृष्टीने पाहिले असता असे लक्षात येते की, आज आपल्यासमोर जो माहिती अधिकार आहे त्याची अत्यंत सुक्ष्म बीजे ही त्याकाळीच रोवली गेली होती. एवढेच नव्हे तर माहिती मिळणे हा समाजातील सर्व स्तरातील नागरिकांचा हक्कच आहे असे प्रतिपादनही तत्कालिन संतांनी केल्याचे आढळून येते. संतपरंपरेच्या कार्याकडे थोडेसे व्यापक दृष्टीने बघितले की ते कार्य कसे अपूर्व व अभूतपूर्व आहे हे लक्षात येते.

सतराव्या शतकात वारकरी संप्रदायात तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे) नावाचे संत होऊन गेले. पुढे ते संत तुकाराम नावाने जनमानासत लोकप्रिय झाले. आज ते ‘जगद्गुरु’ नावानेही ओळखले जातात. तुकाराम महाराज हे साक्षात्कारी, निर्भीड संत कवी होते. तत्कालिन व्यवस्थेत विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. वेदांमधील माहितीच्या स्वरूपातील ज्ञान तत्कालिन व्यवस्थेत काही विशिष्ट समुदायांनी जनसामान्यांपासून जाणूनबुजून दूर ठेवण्यात आले होते. त्या ज्ञानावर ते आपलाच हक्क आहे आणि ती आपलीच मक्तेदारी आहे असा दावा त्याकाळी विशिष्ट समुदाय करीत होते. तुकारामांना ही व्यवस्था मान्य नव्हती. वेदांमधील ज्ञानाच्या स्वरूपातील माहिती जनसामान्यांकरिता खुली करण्याकरिता त्यांनी आपल्या हयातभर लढा दिला. त्यासाठी त्यांना अपार कष्ट करावे लागले. माहितीच्या स्वरूपातील ज्ञान सामान्य जनांना समजेल अशा भाषेत लिहिलेले ग्रंथ नष्ट करण्याचे प्रायश्चित त्यांना देण्यात आले. ‘वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा। इतरांनी वहावा भार माथा॥ अशा शब्दात तुकारामांनी तत्कालिन व्यवस्थेतील भेदाभेद अधोरेखित केला होता. तरीदेखिल त्यांनी ‘विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ।’ असे सांगून तुकोबांनी आपण एक आहोत कोणत्याही प्रकारचा भेदाभेद आपल्यामध्ये नाही हा वैश्विक विचार मांडला आहे.  त्यामुळे सर्वांना समान सामाजिक-आर्थिक-सांस्कृतिक संधी उपलब्ध असाव्यात असा विचार त्यांनी व्यक्त केला. ‘सकळासि येथे आहे अधिकार।’ अशी स्पष्ट संकल्पना त्यांनी सतराव्या शतकात तुकाराम महाराजांनी मांडली आहे. समाजातील तळागाळातील वर्गापासून सर्वांना वेदांमधील ज्ञान जाणून घेण्याचा अधिकार आहे असे तुकोबांची अगदी स्पष्टपणाने म्हटले आहे. माहिती अधिकाराच्या निमित्ताने ती संकल्पना आज आपण प्रत्यक्षात अनुभवत आहोत.

संत परंपरेत अगदी अलिकडच्या काळात होऊन गेलेल्या माणिक बंडोजी इंगळे अर्थात संत तुकडोजी महाराज यांनी समाजातील निरनिराळ्या समस्येवर भर भाष्य तर केलेच मात्र माहिती मिळविण्याच्या अधिकाराविषयीही आणि त्यासाठी आवश्यक त्या संसाधनांचाही त्यांनी उल्लेख केला आहे. गावाच्या विकासासाठी लिहिलेल्या एकूण 41 अध्यायांच्या ग्रामगीता या अपूर्व ग्रंथांत त्यांनी तेराव्या अध्यायात 106 व्या ओवीत त्यांनी असे म्हटले आहे की-

सहज कळावे विचार आणि वृत्त। म्हणोनि फळा असावा चौकांत। 

आदर्श गावाचे उदाहरण देताना तुकडोजी महाराज म्हणतात की गावातील माहिती, विचार आणि वृत्त सर्वांना समजावेत म्हणून गावातील चौक चौकात फलकाच्या माध्यमाचा उपयोग करावा. माहिती अधिकारातील कलम 4 अंतर्गत ‘स्वयंप्रेरणेने घोषित करावयाची माहिती’ या कलमाशी तुकडोजी महाराजांचा हा विचार अत्यंत मिळता जुळता आहे.

संत तुकोबांच्या आणि तुकडोजी महाराजांच्या याच विचारांशी सतराव्या शतकात होऊन गेलेल्या नारायणी सूर्याजी ठोसर ऊर्फ समर्थ रामदास यांनी मांडलेला आहे. समर्थांच्या दासबोध या अपूर्व ग्रंथराजात एकोणिसाव्या दशकातील दहाव्या समासात चौदाव्या ओवीत ‘विवेकलक्षणनिरूपण’ सांगताना ‘जितुकें काही आपणासी ठोवं। तितुकें हळुहळु सिकवावें। शाहाणे करून सोडावे। बहुत जन॥ असा विचार समर्थांनी अभिव्यक्त केला आहे. यात जे जे आपल्याला माहिती आहे ते ते इतरांना सांगावे आणि सर्वांना शहाणे करून सोडावे असे विवेकाचे लक्षण सांगितले आहे.

समर्थ रामदास यांनी मानवी जीवनाच्या व्यवस्थापनाविषयी मांडलेल्या विचारांवर देशातच नव्हे तर अवघ्या विश्वात अभ्यास सुरु असतो. मनाचे श्लोक, दासबोध यांसारख्या साहित्यातून त्यांनी आदर्श आचरणाचे नियम समजावून सांगितले. संत पदाला पोचलेले व्यक्ती सतत निरनिराळ्या गोष्टीतील सत्व शोधीत असतात. पुढे त्या सत्वाच्या मागचे तत्व आणि पुन्हा त्या तत्वाच्या मागील सत्वाचा शोध घेत असतात. एवढे करुनही या मंडळींकडे  हे सारं साध्या, सोप्या आणि स्पष्ट भाषेत मांडण्याचं सामर्थ्य असतं.

तेराव्या शतकातही संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ‘पसायदान’ या काव्यातून सर्व जगासाठी कल्याणाची मागणी केली आहे. ‘जो जे वांछिल तो ते लाहो।’ अर्थात ज्याला जे हवे त्याला ते मिळो, अशी प्रार्थना त्यांनी विश्वात्मक देवाकडे केली आहे. आध्यात्मिक दृष्टीने असलेल्या या प्रार्थनेचा माहिती अधिकाराशी संबंध जोडता येऊ शकेल. इथल्या सामान्य नागरिकांना शासन दरबारी उपलब्ध असलेली माहिती उपलब्ध व्हावी आणि तीदेखिल त्यांना मिळो असा अर्थबोधही उक्तीतून अधोरेखित होतो.

मंडळींनो संत गाडगेबाबा, संत एकनाथ, संत चोखामेळा, संत निळोबा, संत पुंडलिक, संत सावतामाळी, संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई, संत भगवानबाबा, संत बसवेश्वर, संत मोरया गोसावी, संत दासगणू महाराज यांसह सकलसंतांनी आपण एक आहोत हा एकात्म, वैश्‍विक आणि समतेचा विचार मांडला. हा विचार एकदा समजामनात रूढ झाला की कोणतेही भेदाभेद राहत नाहीत आणि सर्वांना सारं काही विनासायास प्राप्त होऊ शकतं. तेव्हा चला तर मग संतांनी दिलेल्या प्रगल्भ विचारांच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यासम मिळालेल्या माहिती अधिकाराचा आपल्या विकासासाठी उपयोग करून घेऊयात.


0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...