2/07/2015

स्पर्श : सामर्थ्य

रस्त्याच्या कडेला फुटपाथवर त्यांचा उघडा संसार ताडपत्रीचं वेष्टन देऊन बंद केला होता. बाहेर भुरभुर पाऊस पडत होता आणि हिच्या पोटात भुकेचा. हिच्या पोटचा एक गोळा जीवाच्या आकांतानं भिजत भिजत सुगंध देणारे गजरे विकत होता, तर दुसरा गोळा भुकेनं तळमळत त्या दुस-या गोळ्याकडं पाहत आभाळाएवढ्या आशेनं होता. दिवस मावळू लागला, गर्दी वाढू लागली. गज-याचा सुगंध येईनासा झाला अन्‌ पहिल्या गोळ्याची काळीकुट्ट देहयष्टीही दिसेनाशी झाली. आता काय करावं म्हणून ती दुस-या गोळ्याच्या तोंडाकडं पाहून हुंदका दाबत होती. काही वेळात गज-याचा नकोसा सुगंध अन्‌ मागोमाग तो ही आला. त्याच्या हातात फक्त गजरे होते, जे भूक भागविणार तर नव्हतेच पण आशाही संपविणारे होते. तो धावत आला, ‘‘माय आलोच म्या...!’’ म्हणत गजरे ठेऊन धावत गेलादेखील.

काही वेळानं हातात दोन वडापाव अन्‌ एक कोल्ड्रिंकची नवी कोरी बाटली घेऊन तो धावतच आला. तिनं ते पाहिलं. तिच्या पोटातली भूक आणखी चाळवली. त्यानं मोठ्या आनंदानं छोट्या गोळ्याला कोल्ड्रिंकची बाटली दिली. एकाएकी तिला काहीतरी झालं. तिनं वडापाव अन्‌ बाटली हातात घेतली अन्‌ जोरात ओरडत म्हणाली, ‘‘मेल्या.... भूकेनं मेलोत तरी चोरी करून खायाचं नाय तुला सांगितलं होतं ना...!!’’ त्या काळ्या गोळ्याला जोरात धक्का देत तिनं ते शेजारच्या नाली ओतलं...

त्या मोठ्या गोळ्याच्या पोटात मोठा गोळा आला. 

अन्‌ हुंदका देत, ‘‘आए, चोरी नाय केली म्या, रस्त्यावर आलेल्या दोन पोरींनी दिलयं ते मला... कोनतरी त्यांना ‘समाजसेविका’ म्हणत होतं... चोरी नाय केली म्या...!!!’’ एवढं बोलण्याचं सामर्थ्यही त्याच्याकडे उरलं नाही.

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...