कितीही केलं तरी प्रोगाममधील एरर निघत नव्हती. त्यामुळे तो त्रागा करत चहा प्यायला बाहेर पडला. कंपनीच्या कॅंटीनपेक्षा विरंगुळा म्हणून तो बाहेरच्या टपरीवर चहा प्यायला आला. टपरीवरचा पोऱ्या कष्टांन चहा तयार करत होता. अन् प्रेमानं विकत होता. टपरीवर बऱ्यापैकी गर्दी होती. याने कटिंग घेऊन चहाचा पहिला झुरका घेतला. तेवढ्यात गावाकडून बाबांचा फोन आला. याचा मूडच फिरला. त्यातच, "बाळा, तुला मागावं वाटत नाही. पण चेक पाठविलास का रे?' हे वाक्य ऐकून तर त्यानं प्रचंड रागात, "अहो, मला काय चेक पाठविण्याशिवाय दुसरं काम नाही का? पाठवतो म्हणून सांगितलं ना!' असं म्हणून फोन आपटला. मी कॉलेजात असताना कशी मला भीक मागावी लागायची, फी साठी, मेससाठी. किती उशिर लावायचे पैसे पाठवायला! आता तुम्ही पण जरा अनुभवा, असं तो मनातल्या मनात पुटपुटला अन् चहाकडं वळला.
तो पुन्हा चहाकडं वळला. तेवढ्यात एक काळी कुट्ट अन् काळे कपडे घातलेली म्हातारी समोर आली. "बाबा, जरा चहा पाजशील का रे? पैसे संपलेत माझे.' डोक्याला ताप नको म्हणून टपरीवरच्या पोऱ्याला त्यानं कटिंगची ऑर्डर दिली. त्यानं विचार केल्याप्रमाणं कटिंग घेऊन म्हातारी गेली. अन् टपरीवरचा पोऱ्या बोलू लागला, "साहेब, ही म्हातारी रोज असच कोणालातरी चहा मागते. कोणालातरी जेवण मागते. फूटपाथवर झोपते. अन् बडबडते माझ्याकडे जमीन होती घर होतं. पण पोराच्या शिक्षणासाठी सगळं विकलं. पोरगा शिकून लई मोठा साप्तवेअरचा साहेब झाला. तो चेक पाठवणार आहे.. मी त्याची वाट पाहतेय..'
तितक्यात त्याला प्रोग्राममधल्या एरर वर सोल्युशन सापडलं. मात्र वास्तवतील एक नवाच एरर सापडला होता...
0 comments:
Post a Comment