2/08/2015

स्पर्श : उत्तर

आकाशातील लाल गोळा खाली जात होता. तर याच्या पोटात भुकेचा गोळा उगवत होता. संपूर्ण दिवस दोन कटिंगवर काढत तो खूप धावला होता. रविवारी रस्त्यावर गर्दी असल्याने त्याने विकायला आणलेली खेळण्यातील "विमाने' सिग्नलवर थांबूनच चांगली विकली होती. रात्री माय अन्‌ छोट्या भावासोबत गोडाधोडाच्या जेवणाची स्वप्ने तो पाहत होता. गोडाधोडाच्या जेवणात गोड काहीच नव्हतं, पण जेवण पोटभर होतं, ते ही कमाईचं. तेच गोड मानून खाऊन त्यालाच ते गोडाधोडाचं जेवण म्हणत होते. अंधार पडला. तो जेवणाची तयारी करू लागला. एरवी भाजीवाल्याची सडलेली भाजी अन्‌ गिरणीतलं सांडलेलं पीठ खाणारं त्याचं कुटुंब दुकानातल्या पीठासोबत ताज्या भाजीचा स्वर्गिय आनंद लुटणार होतं. ठरल्याप्रमाणे सगळं झालं. आमावस्येची रात्र असूनही फूटपाथवरील त्यांच्या "मूव्हेबल' घरात गोडाधोडाच्या जेवणामुळे आनंदाचा प्रकाश पडला होता. उद्याचा विचार न करता तृप्त मनानं ते कुटुंब निद्रिस्त झालं.

दुसरा दिवस उजाडला. तो आज रूमाल अन्‌ गजरे घेऊन रस्त्याच्या सिग्नलवर धावू लागला. दुपारपर्यंत फक्त एकच रुमाल विकला. कालचे पैसे कालच उधळले होते. आज हातात काहीच नव्हतं. संध्याकाळी गर्दी होईल म्हणून तो धावू लागला. माय अन्‌ भाऊ दूर उभे राहून सारं पाहत होते. धावता धावता बसला आडवं जाताना त्याचा तोल गेला, अन्‌ क्षणार्धात हातातील रूमाल अन्‌ गजरे रक्तात माखून निघाले. मर्त्य जग सोडून तो क्षणार्धात निघून गेला होता. थोडी गर्दी झाली. हॉर्न वाजू लागले. थोडावेळ ट्रॅफिक जाम. काही वेळात कोणीतरी रक्तात माखलेला "मृत' देह कडेला नेला.

माय अन्‌ भाऊ अजूनही कडेला थांबून रडत होते. पोलिस आपल्याला पकडतील म्हणून ते पुढे सरकले नाहीत. मेलेल्याला पाहायचे का जिवंत असलेल्याला सांभाळायचे अशी मायची अवस्था झाली. शिवाय "मेल्या'ला जाळायचं कुठं हा प्रश्‍नही होताच. दोघेजण फूटपाथवरून अश्रू ढाळत "त्या'च्या पासून दूर जाऊ लागले. 2-3 किलोमीटरवर नदीच्या काठी येऊन बसले. कालचं गोडधोड जेवण पोटात मावलं होतं. पण आजचं दु:ख पोटात मावणारं नव्हतं. तिनं दादल्याची बॉडीपण अशीच सोडली होती, अन्‌ आता थोरल्या पोराची पण.

बराच वेळापासून हे सगळं पाहणारा 4-5 वर्षाचा धाकला निरागसपणे म्हणाला, "माय, तू मला बी अशीच सोडून जाशील?' मायकडं उत्तर द्यायला शब्द तर नव्हतेच, पण अश्रू ढाळायला डोळ्यात पाणीपण नव्हतं.

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...