1/21/2015

जोपर्यंत कठीण आयुष्य आहे, तोपर्यंत तुम्ही काहीतरी करू शकता...

जगाच्या कोणत्यातरी एका कोपऱ्यात 73 वर्षांचा एक तरुण आजही जगाच्या उत्पत्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. ज्याप्रमाणे ताऱ्यातील ऊर्जा संपल्यावर तो बिंदूवत होतो. त्याचप्रमाणे संपूर्ण विश्‍वाची ऊर्जा संपल्यावर विश्‍वही बिंदूवत होणार आहे, असा अनुमान या तरुणाने वयाच्या 24 व्या वर्षी जगाच्या समोर मांडला. याच विषयावर या तरुणाने डॉक्‍टरेटही प्राप्त केली आहे. परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच चालले होते. आपला 21 वा जन्मदिन साजरा करत असताना या तरुणाला असाध्य अशा अर्धांगवायूचा आजार जडल्याचे समजले. हळूहळू आपल्या संपूर्ण शरीरावर हा अर्धांगवायू कार्यरत होऊन एक वेळ संपूर्ण शरीर प्राण असतानाही निश्‍चल होणार असल्याचे त्याला समजले. सर्वसामान्य माणूस यानंतर कोलमडला असता अन्‌ काही वर्षांनी जगाच्या इतिहासातून निघून गेला असता. मात्र, अशा परिस्थितीतही तो तरुण किंचितही डगमगला नाही, आपल्या ध्येयापासून तीळमात्रही दूर सरकला नाही. तर प्रयत्नांना आपलेसे करत यशाच्या दिशेने मार्गक्रमण करत राहिला. हळूहळू शरीर निश्‍चल होत असताना नियतीने आणखी एक घाला घातला. 1985 साली या तरुणाला न्युमोनिया झाला. न्युमोनियावर श्‍वासनलिकेतून छिद्र घालून केलेली शस्त्रक्रिया तर यशस्वी झाली; मात्र त्यासाठी त्या तरुणाला मोठी किंमत मोजावी लागली. यानंतर आजतागायत हा तरुण स्वत:च्या तोंडातून, स्वत:च्या वाणीने कधीच बोलू शकला नाही.

तुम्हाला काही करायचे असेल तर अवघं जग तुम्हाला मदत करतं, त्याप्रमाणे ज्या नियतीने त्याच्यावर मोठा घाला घातला होता. त्याच नियतीने त्याची भेट डेव्हिड मेसन या संगणकतज्ज्ञाशी यापूर्वीच घालून दिली होती. त्याच्या सल्ल्यानुसार त्याच्याच मदतीने या तरुणाने स्वत:च्या विचार करण्याचे निरनिराळ्या प्रकारचे "इनपुट' अनेकवर्षे संगणकाला दिले. मेंदूत करत असलेले विचार वाचून त्यांना वाणी प्राप्त करून देण्यासाठी तयार करावयाच्या संगणकीय प्रणालीसाठी त्या तरुणाच्या पाठीच्या कण्यातून अपारदर्शक असा एक द्रवपदार्थ इंजेक्‍शनद्वारे आत सोडण्यात आला. त्या द्रव पदार्थाच्या गतीसह त्याचा मेंदू विविध गोष्टींचा विचार करत असताना मेंदूमध्ये निर्माण होणारे विद्युत कंपने, कंपनांची गती, क्षमता अन्‌ शक्ती तपासण्यात आली. तसेच दरम्यान शरीरातील रक्ताच्या प्रवाहाची दिशा, रक्ताचा दाबही अभ्यासण्यात आला. अशा प्रकारे अनेक वेळा असे प्रयोग करून नेमके डोक्‍यात आलेले विचार, विविध स्वरुपात डिजिटलपद्धतीने संगणकाने आपल्या अंत:करणात साठवून ठेवले. त्यांची वेळोवेळी तपासणी करून त्यामध्ये आवश्‍यक ते बदल करण्यात आले. दरम्यानच्या काळात डॉक्‍टरांनी तरुणाच्या निरोपाचा अपेक्षित कालावधीही जाहीर करून टाकला. परंतु, त्या तरुणाला तेव्हाही वाटत होते. मला आणखी काहीतरी करायचे बाकी आहे...

शरीराने विज्ञानाला साथ दिली. संवादातील अडथळा दूर झाला. यंत्राचा मेंदूशी समन्वय घडला. अन्‌ एके दिवशी त्या तरुणाच्या डोक्‍यावर लावलेल्या यंत्रातून मेंदूमध्ये करण्यात येत असलेले विचार संगणकापर्यंत पोचले. मानवी आवाजातून तो तरुण संगणकाच्या स्पीकरमधून जगाशी संवाद साधू शकला. आपले म्हणणे सांगू लागला. त्या परमोच्च क्षणाचा आनंद साजरा करण्यासाठी शरीर निश्‍चल असतानाही या तरुणाने केवळ इच्छाशक्तीच्या बळावर ओठ किंचितसे हलवले. तेवढीच हालचाल त्याला पुढील ऊर्जा देण्यासाठी पुरेशी ठरली. एक वाणी गेली होती. पण दुसऱ्या वाणीतून जग त्या महान संशोधकाला ऐकत होते. आता बोलण्याचा अडथळा दूर झाला होता. पुन्हा नव्या ऊर्जेने काम करण्याची वेळ आली होती. एव्हाना अर्धांगवायूने संपूर्ण शरीरावर नियंत्रण मिळविले होते. चाकांच्या एका खुर्चीतून पुढील आयुष्य कंठावे लागणार होते. एकाच जागी निश्‍चल अवस्थेत असताना "तो' तरुण करीत असलेला विचार संगणकाद्वारे मानवी आवाजातून जगाशी संवाद साधत होता. त्यातून निरनिराळे संशोधने करण्यात हा तरुण यशस्वी ठरला. पुढे त्या तरुणाने सहाय्यकांच्या मदतीने संगणकाच्या वाणीतून "जगाच्या विस्ताराचे गुणधर्म' जगापुढे मांडले. सापेक्षवादाच्या सिद्धांताच्या अन्य अनेक सिद्धांताशी जोडणी करून मोठेमोठे निष्कर्ष मांडले. कृष्णविवरावर मोठे संशोधन केले. विश्‍वउत्पत्तीशास्त्राचा त्या तरुणाचा शोध अखंडपणाने सुरुच आहे.

संशोधनाच्या क्षेत्रात जमिनीवरून मोठी झेप घेतलेल्या त्या तरुणाला आता अवकाश झेपेचे वेध लागले. अशक्‍यप्राय ही गोष्ट देखील त्या तरुणाने साकार केली. 727 क्रमांकाच्या एका बोईंगमधून तो अटलांटिक नावाच्या पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण नसलेल्या ठिकाणी पोचला. आपण आयुष्यात एकटेच आलो आहोत, अन्‌ एकटेच जायचे आहे. त्यामुळे त्याने त्या गुरुत्वाकर्षणरहित परिसरात आपल्या खुर्चीपासून दूर होत जवळपास 100 मिनिटांपेक्षा अधिक काळ घालवला. त्यावेळी त्या तरुणाने त्या जमिनीचे घेतलेले चुंबन केवळ दोन पदार्थांचा स्पर्श नव्हता तर त्याने स्वत:च्या कर्तृत्वाला, अपार निष्ठेला, अविरत प्रयत्नातून साकारलेल्या यशाला केलेला स्पर्श होता...

एरवी आपल्या अपयशाचे खापर परिस्थितीवर फोडणाऱ्या जगातील कोट्यवधी "तरुणां'ना संदेश देत या 73 वर्षाच्या तरुणाने परिस्थितीला फोडून यशाला आपलसं केलं होतं. अन्‌ परिस्थिती, नियती, आजार, अशक्‍यता या साऱ्या गोष्टींचे तुकडे करत त्यांच्यावर उभे राहून कितीतरी उंच पोचला होता. जगाला संदेश देण्यासाठी, लढण्याचा, पळण्याचा, पडण्याचा, पडून पुन्हा उठण्याचा, अन्‌ उंच झेप घेण्याचा... त्या 73 वर्षाच्या तरुणाला साष्टांग दंडवत... सलाम.... त्या तरुणाचे नाव स्टिफन हॉकिन्स! आजही स्टिफन संगणकाच्या स्पीकरमधून जगाला कर्तृत्वाचा संदेश देत म्हणत आहे, "जोपर्यंत कठीण आयुष्य आहे, तोपर्यंत तुम्ही काहीतरी करू शकता आणि त्यात यश मिळवू शकता...'

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...