पेशावरमधील आर्मी स्कूलवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला आज (शुक्रवार) एक महिना पूर्ण झाला. या हल्ल्यात एकूण 132 विद्यार्थ्यांसह एकूण 145 जणांचा बळी गेला. या हल्ल्यात मृत्युमूखी पडलेल्या एका निरागस विद्यार्थ्याने त्याच्या आईला लिहिलेले पत्र -
डिअर अम्मी,
पत्र पाहून सरप्राइज वाटलं असेल ना! कारण मी जिथे आलो आहे ना तेथून कोणीच कधीच पत्र लिहित नाहीत. पण मी ट्राय करत आहे. आजपासून बरोबर वन मंथआधी माझी स्कूल सुरू होती. त्या दिवशी माझी एक्झाम होती. खूप टेन्शन आलं होतं. स्कूलमधील मॅम क्वशनपेपर देत होत्या. मी क्वशनपेपर वाचत होतो आणि अचानक आमच्या क्लासमध्ये मिलिटरी ड्रेसवाले एक गनमॅन घुसले. मला वाटले आम्ही कॉपी करू नये म्हणून ते आम्हाला भीती दाखवायला आले असावेत. पण थोडाच वेळात त्यांनी काहीही न बोलता आमच्या मॅमवर गोळ्या झाडल्या. बंदुकीचा मोठा आवाज झाला. मॅम रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. त्यानंतर त्या गनमॅनने आमच्या प्रिन्सिपल काझी मॅमला वर्गात आणलं और अम्मी त्यांनी माचीसने मॅमला डायरेक्ट पेटवलं, मी खूप ओरडलो. तर त्यांनी माझ्यावर गोळ्याच झाडल्या. अम्मी, मी तर कॉपी करत नव्हतो, मग माझ्यावर त्यांनी फायरिंग का केले? माझ्या अंगातून खूप रक्त आलं, अन्...
त्यानंतर मी एका शांत ठिकाणी पोचलो. जिथं खूप शांतता होती. अगदी शाळेत टिचर आम्हाला "पिन ड्रॉप सायलेन्स' म्हणतात त्यापेक्षा जास्त. माझ्या आधीच तिथं रांगेत खूप जण उभे होते. आणि माझ्या मागे स्कूलमधील फ्रेंडस् हळूहळू रांग लावत होते. मी काऊंट केले तेव्हा ते हंड्रेडपेक्षा जास्त होते. पुढे मी काऊंटिंग केलेच नाही. मला कळतच नव्हते की मी कोठे आलो आहे. पण स्कूलमधील खूप फ्रेंडस् सोबत होते म्हणून मला भीती नाही वाटली. अम्मी, तू कधीच मला या दुनियेबद्दल सांगितलं नव्हतसं. ही दुनिया खूप शांत आणि अजब आहे. त्यानंतर इथून मला आपली स्कूल दिसत होती. सगळी दुनिया दिसत होती. स्कूलमध्ये अजूनही ते मिलिटरी ड्रेसवाले गनमॅन होतेच. ते स्कूलमधील सगळ्यांना गोळ्या मारत होते. अम्मी तू और अब्बा छोट्या बाजीला (बेहन) घेऊन शाळेच्या बाहेर आला होता. तुमच्या डोळ्यात आसू होते. अम्मी मी रडल्यावर तुला किती वाईट वाटायचं, मग तू म्हणायचीस "कधीच रडायचं नाही', पण मग त्यादिवशी तू का रडत होतीस? आणि त्या दिवशी सगळेजण माझ्या नावाऐवजी, रोलनंबरऐवजी मला 'बॉडी, बॉडी' का म्हणत होते? मला त्याच्या आधी कोणी कधीच "बॉडी' म्हणून पुकारले नव्हते. आई, मला वाटलं तुझ्या जवळ यावं, रडावं अन् तुला सबकुछ सांगावं, पण...
त्यादिवशीपासून आम्हाला सगळं जग दिसू लागलं. पण या जगात आम्हाला कोणत्याच "बॉर्डर' दिसत नाहीएत. इथं आमच्या जवळच असलेल्या मॅमलाही माहित नाही की त्या "बॉर्डर' का दिसत नाहीत ते. इथंच असलेल्या प्रिन्सिपलला पण माहित नाही. कारण आमच्या टेक्स्टबुकमध्ये त्या दिसत होत्या. इथून आम्हाला फक्त "अर्थ'चा एक राऊंडेड शेप दिसत आहे. "त्या' दिवशीनंतर दोन-तीन दिवस सगळी दुनिया "त्या' गनमॅननी केलेल्या ऍटॅकबद्दल चॅट करत होती. खूप जण गनमॅनला टेररिस्ट, टेररिस्ट म्हणत होते. पण तू तर कधी मला टेररिस्ट स्कूलमध्ये येऊन अशा गोळ्या मारतात हे सांगितलं नव्हतसं, गोळ्या तर "ब्रेव्ह सोल्जर' कंट्रीच्या एनिमीला मारतात ना? मग आम्ही काय कंट्रीचे एनिमी होतो का? आणि माझा देश काय त्या गनमॅनचा होता का? आई खरं सांग मी एनिमी होतो का? स्कूलच्या मॅमनीसुद्धा याबद्दल कधीच काहीच सांगितलं नव्हतं. कोणी म्हटलं की आपल्याला "पेनल्टी' मिळाली. पण मी काय गुन्हा केला होता, अम्मी? त्यानंतर 2-3 दिवस आम्हाला सगळ्या दुनियेतून फुलं वाहण्यात आली. पण का वाहण्यात आली?
अम्मी मला तुझी अब्बाची, बाजीची (बेहन) खूप याद येते. पण तू कधीच या दुनियेत येऊ नको. इथं खूप बोअर होतंय. अम्मी मी मोठा होण्याची वाट पाहत होतो. क्योंकी तू जो मिठाईचा बॉक्स एकदम वर ठेवला होतास ना तिथे हात पोचण्यासाठी. आता इथं मिठाईचा बॉक्स नाही. आपल्या किचनमधला मिठाईचा बॉक्स प्लिज जरा खाली ठेवशील? म्हणजे बाजीला (बेहन) आपल्या हातानं मिठाई खायसाठी मोठ्ठं होण्याची वेट नाही करावं लागणार!
अम्मी मी खूपदा तुमच्या सगळ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण ते जमलेच नाही. आता एक महिन्यानंतर "ट्राय' म्हणून हे पत्र लिहून खाली सोडत आहे. तुझ्यापर्यंत पोचेल ना? अम्मी पत्र पोचले तर माझा मेसेज सर्वांना सांग. सगळ्यांना सांग की, सगळ्या शाळेतील जिओग्राफीची बुक्स बदलून टाका, कारण माझ्या बुकमध्ये होत्या तशा "बॉर्डर्स' दुनियेत कोठेच नाहीत. सगळी दुनिया फक्त एक राऊंडेड शेप आहे, असंच शिकवा. त्या "गनमॅन'ना मारू नका, त्यांना विचारा गोळ्या का मारल्या ते! शायद त्यांना वाटत असेल की आपण त्यांचे एनिमी आहोत. त्यांना सांगा कोणीच कोणाचे एनिमी नसतात. कारण जगात बॉर्डरच नाहीत. बॉर्डर नसल्या तर सोल्जरची गरज नाही. सोल्जर नसल्याने गनची पण गरज नाही. टोटल "अर्थ' एक कंट्रीच आहे, इथले इन्सान अलग अलग ठिकाणी राहतात. इथे अलग अलग कलरचे इन्सान राहतात. ते अलग अलग लॅंग्वेज बोलतात... या राऊंडेड अर्थवरील बंदूकच्या सगळ्या फॅक्टरी क्लोज करून टाकायला पण सांग अम्मी!
अम्मी, गुड बाय! सबको सलाम बोल. माझा मेसेज जरूर दे. आणि हो, रडू नको. तू मेसेज दिला की मला बरे वाटेल...
सिर्फ तुम्हारा (अजब दुनिया से)