11/28/2016

पोटात आनंद तर असतोच की वो सायब

नेहमीप्रमाणे तो त्याच्या दुचाकीवरून घरी निघाला. रोजच्या पेक्षा आज त्याला जास्तच उशीर झाला होता. रात्रीचे 10 वाजून गेले होते. रोजच्या कटकटी, घरातील समस्या या साऱ्या गोष्टींचा विचार करत तो गाडी पुढे नेत होता. काही अंतर गेल्यावर त्याला एका बसस्टॉपवर विशीतला पोरगा हात करताना दिसला. गाडी येत असल्याचे पाहून त्या पोराने ‘सायब, सायब जरा पुडंपर्यंत सोडता का?‘ अशी आर्त हाक मारली. पोराच्या हाकेमध्ये त्याला सच्चाई जाणवली. त्यामुळे गाडी वेगात असूनही त्याने त्याच्याजवळ थांबवली. ‘सायब जरा पुडंपर्यंत सोडता का?‘ पोरानं पुन्हा अदबीने विचारलं. पोरगा फारच निरागस दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर सात्विक भाव होते. रंगाने थोडा काळा असला तरीही दिलानं गोरा वाटत होता. त्यामुळे त्याने फार काही चौकशी न करता ‘चल बस‘ म्हणत त्याला लिफ्ट दिली. 
गाडी पुढे जात होती. याच्या मनातील विचारचक्र सुरूच होते. सहजच त्याने पोराला विचारले, ‘का, रे आता काय बस नव्हती का तुला?‘ तो बोलू लागला, ‘सायब, बशी काय रातभर आहेत. पर आईशप्पथ सांगतो सायब माझ्याकडं आज रुपया सुद्धा नाही.‘ आता चालकाला त्याच्या स्टोरीत रस वाटू लागला. ‘काय करतोस काय तू?,‘ असं विचारत चालकाने त्याला बोलते केले. 
‘इथंच हाय सायब एका हाटेलात कामाला. ताटं, बशा उचलायला,‘ पोऱ्या आता खुलून बोलू लागला. ‘आज मालक पगार देणार व्हता. पर न्हाय दिला त्यानं. मंग काय त्या आशेवर व्हतो. सकाळच्याला हाटेलात जाण्यापुरतेच पैसे व्हते खिशात. यायचं कसं?,‘ गाडी पुढे जात होती आणि पोरा आपली स्टोरी सांगत होता. ‘मग मी थांबलो नसतो तर काय केलं असतंस?,‘ पुन्हा त्यानं प्रश्‍न केला. ‘सायब, तसं कवा कवा मी चालत बी जातुया घरला. पर आज पोटात अन्न बी नाय त्यामुळं...‘ पोराने खुलासा केला. 
‘कुठं राहतोस कुठं तू?‘ 
‘सायब हिथून पाच-धा मिन्टात ईल माझं घर. घर कसलं सायब मी आलोया परराज्यातनं. हिथं गावातले काही पोरं-पोरं मिळून काम-धंदा मिळतूय का बगायला आलो व्हतो. लई नई, सा महिने झाल्यात यीऊन. धा-बारा पोरं हायेत.‘ पोराने सविस्तर माहिती दिली. 
‘बरं मग आता जेवायचं काय?‘ त्याने मुख्य मुद्याला हात घातला. ‘सायब, आता काय खोलीवर पोरांनी काय शिलकीत ठेवलं असलं तर खायचं, नायतर गिलासभर पाणी पिऊन पडलं. हे बी दिस जातील सायब,‘ पोरानं व्यथाच मांडली. याच्या पोटात धस्सं झालं. ‘पोटात अन्न नसताना तुला कसं काय सुचतं रे एवढं बोलायला,‘ याने सहज त्याला डिवचले. 
‘सायब पैसा काय आज हाय उद्या नाय. अन पोटात अन्न नसलं म्हणून काय झालं? पोटात आनंद तर असतोच की वो सायब. त्यो कुठं जातोय. माणसानं कसं कायम आनंदात, मजेत जगावं. समजा आता इथनं आपल्या म्हणजे तुमच्या गाडीला कोण धडकलं तर संपलाच ना खेळ!‘ पोराच्या या वाक्‍याने याच्या पोटात धस्स झालं. तेवढ्यात स्पीड ब्रेकर आल्यानं त्यानं कच्चकन ब्रेक दाबलं. 
पुढे काही काळ फक्त गाडी पुढे जाऊ लागली. कोणी काहीच बोललं नाही. तेवढ्यात पोरानं ‘सायब थांबवा थांबवा‘ म्हटलं. गाडी थांबली. याने खिशात हात घातला. 30-40 रुपये सुट्टे होते. ‘जा. जाता जाता काहीतरी खाऊन घे,‘ असे म्हणत त्याने पैसे त्याच्या हातात ठेवले.  ‘सायब म्या कुणाकडून कधी घेत नाय पर आता लय नड हाय... तुमचा पत्ता द्या. मी परत करतो तुमाला पगार झाला की,‘ त्याने अतिशय उत्साहाने सांगितले. 
‘जा रे! 30-40 रुपयाचं काय असतं?‘ त्याने पोराला सांगितले. पोराने त्याच्या पायाला स्पर्श केला अन्‌ ‘सायब देव भेटला बगा तुमच्या रुपानं‘ असे म्हणत मागे न पाहता निघून गेला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडं पाहात याने मनातल्या मनात विचार केला. पोटात अन्न नाही. पगार नाही. घर नाही. खिशात रुपया पण नाही. तरीही केवढा उत्साह! प्रत्येक क्षण जगण्याचा मंत्रच जणू काही त्या बारक्‍या पोरानं दिला होता.

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...