12/03/2016

शनिवारची गोष्ट: 'श्रद्धा' म्हणजे काय?

आटपाट नगर होतं. नगरावर एक राजा राज्य करत होता. नगरातील लोक श्रद्धाळू होते. नगरात एक मोठे मंदिर होते. मंदिराचा गाभारा खूप मोठा होता. तो पाण्याच्या हौदासारखाच होता. राजाने एकदा आदेश दिले. मंदिराचा गाभारा फक्त दुधाने भरून काढायचा. त्यासाठी नगरातील लोकांकडून दूध गोळा करायचे. ज्याला जेवढे जमेल त्याने तेवढे दूध आणून गाभाऱ्यात ओतायचे. दिवस ठरला. वेळ ठरली. दवंडी पिटवण्यात आली. सारे जण तयारीला लागले.

तो दिवस उजाडला. प्रत्येकाने आपल्या घरात कोणालाही दूध न देता सगळे दूध गाभाऱ्यात आणून ओतले. दूध ओतण्यासाठी मंदिरात रांगा लागल्या. प्रत्येकजण घरातील सगळेच्या सगळे दूध आणून ओतत होता. अशातच दोन-तीन तास झाले. खूप सारे दूध ओतूनही गाभारा दुधाने भरला नाही. दूध ओतण्यासाठी रांगा सुरूच होत्या. लोक दूध ओततच होते. गाभारा काही भरत नव्हता. अशातच दुपारचे बारा वाजून गेले. गर्दीही संपली. गाभारा अजून भरलेला नव्हता. मात्र गाभारा भरण्याची वाट पाहण्यासाठी मंदिराभोवती गर्दी होती. सर्वांना चिंता लागली. आणखी दूध आणायचे कोठून? तेवढ्यात एक वृद्ध स्त्री मंदिराच्या दिशेने आली. तिच्या हातात केवळ अर्धा पेला दूध होते. "एवढ्याशा दुधाने काय होणार आजी', गर्दीतून आवाज आला. वृद्ध स्त्रीने दुर्लक्ष केले. ती गाभाऱ्याच्या दिशेने चालू लागली. तिने मंदिरातील मूर्तीला दुरूनच मन:पूर्वक नमस्कार केला. हातातील अर्धा पेला दूध गाभाऱ्यात ओतले. आणि काय आश्‍चर्य! क्षणार्धात गाभारा दुधाने भरलाच आणि ओसंडून वाहू लागला. गर्दीने जल्लोष केला.

ही वार्ता राजापर्यंत पोचली. राजाने त्या वृद्ध स्त्रीला राजवाड्यात बोलावून घेतले. वृद्ध स्त्रीला तातडीने राजवाड्यात आणण्यात आले. राजाने तिला विचारले, "माते, तू घरून आणलेल्या अर्ध्या पेल्याच्या दुधात काय होते की ज्यामुळे गाभारा भरून गेला.' वृद्ध स्त्री बोलू लागली, "राजेसाहेब गाभाऱ्यात सकाळपासून खूप लोकांनी दूध ओतले. पण गाभारा भरला नाही. त्या सगळ्या लोकांनी घरातील लहान बाळाला, प्राण्यांना आणि सगळ्या लोकांना दूधापासून वंचित ठेवले. त्यामुळे काही घरातून दूध ओतण्यास विरोध झाला. पण तो विरोध झुगारून त्या त्या घरातील सगळे दूध गाभाऱ्यात येऊन पडले. मी मात्र कोणाचीही नाराजी किंवा विरोध पत्करला नाही. आधी माझ्या नातवाला रोजच्याप्रमाणे दूध दिले. माझ्या मुलाला, सुनेला नेहमीप्रमाणे दूध दिले. मी पण दररोजप्रमाणे दूध पिले. घरातील मांजर आणि कुत्र्यालाही दररोजसारखे दूध पाजले. एवढे करून माझ्याकडे अर्धा पेलाच दूध उरले. ते घेऊन मी मोठ्या श्रद्धेने मंदिरात आले. माझ्या दुधाने गाभारा भरण्याची देवाला मनातून विनंती केली. दूध ओतले. सर्वांना समाधान देऊन उरलेले दूध गाभाऱ्यात पडल्याने देवही खूष झाला आणि गाभारा दुधाने ओसंडून वाहू लागला.'

वृद्ध स्त्रीची गोष्ट ऐकून संपूर्ण राजवाड्यात शांतता पसरली.

(शब्दांकन: व्यंकटेश कल्याणकर)
(Courtesy: eSakal.com)

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...