4/30/2016

लहानपणीचे क्रिकेट

एका छोट्या शहरातील एका मोठ्या माळवदांच्या दोन मजली वाड्यात पाच-पंचवीस बिऱ्हाडं राहात होती. वाड्याच्या अंगणात ऐसपैस रिकामी जागा होती. त्याला चौक म्हटले जायचे. वाड्याला मोठे दार होते. दाराच्या बाहेर बरीचशी रिकामी जागा होती. अलिकडेच त्या जागेवर सिमेंटचा थर दिला होता. तेथेच एका कोपऱ्यात पाण्यासाठी आड होता. त्या आडाजवळ भूताचे घर असल्याचे लहानमुलांना सांगितले जायचे. वाड्यात सगळेमिळून 20-22 चिल्ले-पिल्ले होते. त्यापैकी 8-10 जण शाळेत जातील एवढी मोठी होती. बहुतेकजण परीक्षा संपल्याने मामाच्या गावाला गेले होते. सर्वांच्या शाळेला कालच सुटी लागली होती. त्यामुळे सगळ्यांना स्वतंत्र झाल्याचा आनंद होता. सगळेजण खूप धिंगाणा करण्याच्या मूडमध्ये होती. वाड्यात वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळी कामे करून पोट भरणारी बिऱ्हाडं होती. चिल्ल्या-पिल्ल्यांना मात्र त्याच्याशी काही घेणं-देणं नव्हतं. ते केवळ एकत्र मिळून खेळत. खटके उडाले तर भांडत. मारामारी करत. काही वेळ गप्प बसत आणि पुन्हा एकत्र येऊन खेळत.



आता सकाळचे दहा वाजले होते. सगळे चिमुरडे मोठ्या दाराबाहेर एकत्र आली. त्यामध्ये सहावीतील स्नेहा आणि सौरभ, आठवीतील सचिन आणि दीपक, पाचवीतील वैभव, सातवीतील पूनम आणि तिचा चार वर्षांचा भाऊ पंकज, नववीतील लक्ष्मी, छाया, चौथीतील बबन हे सगळेजण होते. आणखी काही चिल्ले-पिल्ले आईला उन्हाळी कामात मदत करत होते. तर कोणी अजून झोपेतच होते.

काय खेळायचे? यावर चर्चा सुरू झाली. स्नेहाने कोपरापाणी खेळायचा आग्रह धरला. तिला छायाने पाठिंबा दिला. मात्र त्यावर एकमत झाले नाही. मग लपंडाव, कबड्डी, लगंडीपाणी, शिवणापाणी, विष का अमृत, खोखो असे पर्याय समोर आले. पण कशावरच एकमत होत नव्हते. शेवटी मग कि केटचा विषय निघाला. त्यावर छायाने खूप विरोध केला. मात्र सर्वांनी त्यावर एकमत दर्शविले. पण लहान पोरांना घ्यायचे नाही असे ठरले. मग पूनम तिच्या भावाला घरी सोडून आली. आता प्रश्‍न बॅट आणि बॉलचा होता. बबनला घ्यायचे नाही असे सौरभने सांगितले. त्यामुळे तो ही घरी रागाने निघून जात होता. तितक्‍यात छायाने सौरभच्या कानात काहीतरी सांगितले. त्यावर सौरभने बबनला थांबविले. फक्त त्याने त्याचा प्लॅस्टिकचा बॉल आणावा या अटीवर. बॉल त्याच्या खिशातच असल्याचे त्याने सांगितले. आता प्रश्‍न फक्त बॅटचा उरला. स्नेहाने धावत जाऊन एका मोरीतील कपडे धुण्याची लाकडी फळी आणली. त्यावर "हा हा हा‘ असे सगळ्यांनी एकत्र म्हणत तिला चिडवले. असे चिडवले की तिला राग यायचा. मग थोडा वेळ वाद झाले आणि ती फळी फक्त मुलींनी बॅट म्हणून वापरावी असे ठरले. आता मुलांच्या बॅटचा प्रश्‍न होता. प्रश्‍न सुटेना म्हणून वाड्यासमोरच्या घरात राहणाऱ्या आणि बॅट असलेल्या गिरीशकडे धाव घेण्यात आली. त्याला बाहेर जायचे होते. पण त्याने सर्वांच्या आग्रहामुळे बॅट दिली. "गिरीश किती छान आहे‘, असे गौरवोद्गार बबनने काढले. आता प्रश्‍न स्टंपचा होता. त्यावर वैभवने धावत घरी जाऊन वडिलांच्या रिक्षाचे एक निकामी चाक आणले. तर दुसऱ्या बाजूला एकावर एक रचलेल्या तीन विटांचा स्टंप तयार झाला. दोन्ही स्टंपांजवळ क्रीज म्हणून विटेने रेघ ओढण्यात आली. या सर्वाला "पीच‘ म्हणून सर्वमान्यता मिळाली.

आता वाड्याच्या दिशेने तोंड करून फलंदाजाची जागा ठरली. त्यानंतर नियमांवर चर्चा सुरू झाली. वॉल कॅच आऊट, वन टप्पा आऊट, कोणाच्या घरात बॉल गेला तर आऊट, वाड्यावर बॉल गेला तर आऊट, बॉल आडाला लागला तर चौका, वाड्याच्या दाराला लागला तर दोन रण, खालचा बॅटस्मन नाही, टीम नाही, स्वतंत्रपणे खेळायचे, ज्याचे जास्त रन तो पहिल्यांदा बॅटिंग करणार असे नियम एका दमात सचिनने सांगितले. त्यावर लहानांपासून बॅटिंग सुरु करू असे छायाने सुचविले. "बॅटिंग करून पळून जायचे नाही‘, अशी सूचना स्नेहाने केली. शिवाय बॉल हरवला तर भरून द्या असे बबनने सांगितले. सगळ्या सूचना मान्य झाल्या. चेंडू कोणी फेकायचा यावरही तोडगा निघाला. ज्याची शेवटी बॅटिंग असेल त्याने एक विकेट पडेपर्यंत चेंडू टाकायचे ठरले. आणि हो ओव्हरचे बंधन नाही, अंपायर नाही, आऊट होईपर्यंत खेळायचे असेही ठरले.

या सर्व पूर्वतयारीच्या नादात सकाळचे 11.30 वाजले होते. सगळेजण फिल्डिंगवर गेले. सचिन फिल्डर्सला जागा सांगू लागला. पण लक्ष्मीने त्याचे ऐकणार नाही असे सांगत "ज्याला जिथं वाटेल तिथं उभं राहा. फक्त जवळजवळ उभे नका राहु‘ असे सांगितले. सगळ्यांनी आपल्या आवडत्या जागा पकडल्या. सचिनने किपरिंग करण्याचे ठरवले. पहिला बॉल पडणार तितक्‍यात "लक्ष्मी, अगं ए लक्ष्मी‘ असा आवाज वाड्यातून आला. तिची आई पापड्या करत होती. तिला मदतीसाठी हाक मारत होती. "आले आले‘ म्हणत ती निघून गेली. तरीही खेळ सुरू ठेवा असे तिने सांगितले. सर्वप्रथम बबन बॅटिंगला उतरला. त्याच्या उंचीपेक्षा बॅट अगदी किंचित छोटी होती. "मुलींची बॅट वापर‘ असा सल्ला त्याने धुडकावून लावला. त्याने बॅट घेतली. त्याला छाया चेंडू टाकू लागली. दोन टप्पे पडून चेंडू बॅटवर आदळला. पण शॉट मारण्याच्या नादात बॅट मागे टायरला लागली आणि टायर खाली कोसळले. "आऊटए, आऊटए‘ असे ओरडत सगळ्यांनी जोष सुरू केला. त्यावर "पहिला बॉल देवाला असतो‘ असा दावा बबनने केला. त्यावर थोडे वाद झाले. पण "सगळ्यांचा पहिला बॉल देवाचा मग‘ असा ठराव पास झाला. बबन पुन्हा खेळू लागला. छायाने चेंडू टाकला. यावेळी बबनने हुशारी दाखवत थोडे समोर येऊन बॉल मारला. बॅट फेकून बबन रन काढण्यासाठी धावला. पण स्नेहाने बॉल पकडून छायाकडे दिला. तिने खालच्या स्टंपला मारण्याचा प्रयत्नही केला. तसा तो स्टंपला लागला. पुन्हा "आऊटए, आऊटए‘ म्हणत जल्लोष सुरू झाला. पण कि जमध्ये पोचल्याचा दावा बबनने केला. त्यावर वाद निर्माण झाले. "जा, माझा बॉल घेऊन मी चाललो‘ असे म्हणत बबन रागाने निघून जाऊ लागला. त्यावर "खेळ तू, खेळ चिडकी‘ म्हणत त्याला रोखण्यात आले. त्यावर "कॉलर टाईट‘ झाल्याच्या आविर्भावात बबन पुन्हा खेळू लागला. सचिनने छायाला कानात येऊन काहीतरी सांगितले. छायानेही ते ऐकले. त्यानंतर तीन-चार बॉल खेळून बबन आऊट झाला. यावेळी त्याने नकार दिला नाही.

आता वैभव मैदानात उतरला. त्याला दीपक चेंडू टाकू लागला. लक्ष्मी अजूनही आली नव्हती. दीपकने चेंडू टाकला. वैभवने बॅटवर चेंडूचा एक टप्पा खेळून चेंडू खूप उंच उडवला. "पूनम कॅचए‘ असे सगळेजण ओरडले. तेवढ्यात तिच्यावर विश्‍वास नसल्याने टायरला धक्का मारून सचिन कॅच पकडायला धावला. पूनमची आणि सचिनची टक्कर झाली आणि दोघेही खाली पडले. मात्र एक टप्पा पडूनही कोणी कॅच पकडू शकले नाही. वैभवने "हुश्‍शशश‘ म्हणत आनंद साजरा केला. तर सगळ्यांनी सचिनला दोष दिला. या सर्व गडबठीत पूनम गुडघ्यावर पडल्याने तिच्या गुडघ्यातून थोडेसे रक्त वाहू लागले. सर्वजण चिंताग्रस्त झाले. तेवढ्यात आडाशेजारी पडलेल्या चिंधीने छायाने तिचे रक्त पुसले. त्यावर तिने आराम करावा बॅटिंग आली की कळवू असे म्हणत तिचे सांत्वन करण्यात आले. तिनेही ते मान्य केले. काही वेळाने तिच्या जखमेवर कागद लावण्याचा सल्ला कोणीतरी दिला आणि एक कागदही लावण्यात आला.

बघता बघता वैभवने 15 रन केले. मात्र त्यानंतर एक जोरात शॉट मारायच्या नादात बॉल उंचावरून वाड्याच्या आतील चौकात पडला. सुदैवाने कोणाला लागला नाही. मात्र नियमाप्रमाणे वैभव आऊट झाला. त्यानंतर स्नेहा बॅटिंगला उतरली. तिने मुलींची बॅट घेतली. आणि उभे राहून धान्य पाखडताना सुप धरतात त्याप्रमाणे दोन्ही हातात बॅट धरली. तिच्या या पद्धतीला सचिनने विरोध केला. "कव्हर दिसत नाही‘ अशी तक ारही अनेकांनी केली. पण ती तिच्या पद्धतीवर ठाम राहिली. याच पद्धतीने तिने 10 रन केले. शेवटी एका बॉलवर वॉलवर टप्पा पडून ती बाद झाली. त्यानंतर पूनमही लवकरच बाद झाली.
आता दीपक बॅटिंगला उतरला. त्याने चांगला खेळ केला. तो 30 रनांपर्यंत पोचला. त्यावर त्याला आऊट होण्याची विनंती छायाने केली. आता खेळात सर्वांना थोडे बोअर होऊ लागले. तितक्‍यात घरातले काम उरकून लक्ष्मी आली. तिने बॉलिंग टाकते म्हणून मागणी केली. तिला संधी देण्यात आली. तिने एक "स्लोअर फुलटॉस‘ टाकला. सचिनने दोन रन करावेत म्हणून दाराच्या दिशेने बॉल मारताना लक्ष्मीनेच एक टप्पा कॅच पकडली आणि सचिन 35 रनावर आऊट झाला. सर्वांनी जल्लोष केला. त्यानंतर छाया आणि लक्ष्मीची बॅटिंग उरली. आता दुपारचा एक वाजत होता. "बबन जेवायला चल‘ अशी बबनला घरातून हाक आली. सर्वांना धडकी भरली. कारण बबन जाताना बॉल घेऊन जाणार होता. त्यावर बबन वेळ मारून नेऊ लागला. छाया बॅटिंग करत होती. खेळ पुन्हा रंगात आला होता. "बबनऽऽऽऽ‘ जोरात हाक आली. बबन पुन्हा "बॉल द्या‘ म्हणू लागला. खेळ रंगात आल्याने "देत नाही जा‘ असा दम सचिनने भरला. बबनने रडत घरी जाऊन तक्रार केली. काही आईला घेऊन तो मैदानाच्या दिशेने येऊ लागला. ही गोष्ट पंकजने धावत येऊन सर्वांना सांगितली. बॉल तेथेच टाकून सगळ्यांनी धूम्म ठोकली. अशाप्रकारे क्रिकेट पार पडले.

(Courtesy: www.esakal.com)

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...