4/29/2016

नातेवाईकांकडे राहण्याचा त्रास!

कॉलेजचा आजचा शेवटचा दिवस होता. निरोप समारंभाच्या कार्यक्रमापूर्वी सगळेजण आपल्या कॉलेजातील आठवणी सांगत गप्पा मारत होते. कॉलेजच्या वर्षातील अनुभव तसेच पुढे काय करायचे याबद्दलच्या गप्पा रंगात आल्या होत्या. एक जण सांगू लागला, "मी कॉलेज लाईफ फुल्ल एन्जॉय केली. मी पुढे आयुष्यपण फुल्ल टू फुल्ल एन्जॉय करणार. पुढे मास्टर्सचा विचार आहे. त्यानंतर मला जे वाटतं, जे आवडतं तेच काम करणार. आवडीचं काम नसेल तर रिकामा बसणार पण आवडीचंच काम करणार!‘ ग्रुपमधील एक विद्यार्थीनी सांगू लागली, "मी तर ठरवलयं. हे शिक्षण बिक्षण बस्स झालं. मी दोन-तीन महिन्याचा ब्युटिशिअनचा कोर्स करून थेट ब्युटी पार्लर उघडणार आणि जगाला आय मिन जगातील मुलींना सुंदर बनवत राहणार!‘ त्यानंतर ग्रुपमध्ये बराच वेळ हशा पिकला. "मुलींचं हृदय पण जरा सुंदर बनवायला शिक‘, प्रेमात पडलेल्या एकाने कॉमेंट केली. त्यावर पुन्हा सगळेजण हसू लागले.

त्यानंतर सर्वांनीच आपल्या भावना मांडल्या. एक दोघांना फारच वाईट वाटत होतं. "अरे, आपण काय मरणार आहोत काय? आयुष्य आता खरं सुरू होणार आहे...‘, असं तत्त्वज्ञान मांडत एकाने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी आपल्याला आलेल्या अडचणी वगैरे सांगण्याचा प्रयत्न केला. पुढील स्वप्नांचे चित्र रेखाटले. ग्रुपमधला सर्वांत हुशार आणि नेहमी आनंदी आणि राहणारा एक विद्यार्थी आज जरा अस्वस्थ होता. सर्वांनी विनंती केल्यावर तो बोलू लागला, "माझं कॉलेजचं आयुष्य मजेत गेलं. पण मी माझ्या एका नातेवाईकाकडे राहात असल्याने जरा त्रास सहन करावा लागला. जाऊ द्या ना. चांगल्या गोष्टी बोलूयात आपण!‘

त्यावर त्याला पुढे बोलण्याचा सर्वांनी आग्रह केला. त्यामुळे तो बोलू लागला, "गावाकडे शिक्षणाची सोय नसल्याने वडिलांनी मला इथे माझ्या नातेवाईकांकडे शिकायला पाठवलं. नातेवाईकांची परिस्थिती चांगली होती. सुरुवातीला त्यांनी चांगला पाहुणचारही केला. मात्र हळूहळू त्यांना मी परका भासू लागलो. त्यांच्या मुलांत आणि माझ्यात ते भेदभाव करू लागले. तरीही मला काही वाटले नाही. पण सहा महिन्यातच त्यांनी याला हे आवडत नाही, याला ते आवडत नाही, असे म्हणत माझा चहा, सकाळचा नाष्टा बंद केला. हिवाळ्यातही आंघोळीला गरम पाणी मला मिळाले नाही. शिवाय "मी कमी जेवतो‘ असे कारण सांगून माझा आहारही कमी करण्यात आला. रोज मला घरातील बरीच कामे करावी लागत होती. पण मी कधीही तक्रार केली नाही. आपलं शिक्षण महत्त्वाचं. जाऊ द्या कशाला त्या आठवणी...‘

त्याला मध्येच थांबवत एकजण म्हणाला, "अरे, नातेवाईकाकडे राहण्याचा लय त्रास होतो. खायचे वांदे. शिवाय वेळा पाळा. मी पण होतो एका ठिकाणी... पण नय टिकलो. दोन महिन्यात बाहेर पडलो.‘ जगाला सुंदर करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मुलीने प्रश्‍न केला, "अरे, पण हे नातेवाईक एवढा त्रास का देतात? माझे तर कोणी नातेवाईक त्रास वगैरे देत नाहीत.‘ हुशार मुलगा उत्तर देऊ लागला, "कसं असतं की माणसाची जातच अशी आहे की आपण आपला आणि परका भेदभाव करते. आता हेच बघ आपण गावाबाहेर गेलो की आपल्याला गावाकडचा माणूस भेटला की बरं वाटतं. तसंच राज्याबाहेर गेल्यावर राज्यातला, तर देशाबाहेर गेल्यावर देशातला माणूस भेटला की बरं वाटू लागतं. मग पृथ्वीच्या बाहेर जिथं माणसचं नसतील तिथं गेल्यावर फक्त "माणूस‘ भेटला की बरं वाटेल. पण इथं पृथ्वीवर माणूस बघून बरं वाटत नाही, हेच माणसाचं दुर्दैव आहे. आणि हे बघ दुरून डोंगर साजरे असते. जवळ गेलं की कळतो माणसाचा खरा स्वभाव. नातेवाईकांचं पण तसंच असतं.‘ त्यापैकी एकाने उत्सुकतेने विचारले, "पण मग एवढा त्रास सहन करूनही तू एवढा फ्रेश, हुशार कसा रे?‘ आता विषय नेमक्‍या मुद्यावर आला. तो आता चांगला खुलून बोलू लागला, "काय असतं मित्रांनो, आपल्या आयुष्यात अनेक चॅलेंजेस असतात. आपल्याला असं वाटतं की चॅलेंजेस खूप मोठ्या आहेत आणि त्या कशा सोडवायच्या याच विचारात आपण पुढे जाणं थांबवतो. त्यामुळे वेळ निघून गेल्यावर आपण मागे कसे राहिलो हे समजतही नाही. मी मात्र अडचणींकडे कधी पाहिलचं नाही. त्यांना स्वीकारलं आणि पुढे पुढे जात राहिलो.‘

"अरे तू फिलॉसॉफी नको सांगू रे... नेमकं सांग काय केलं ते!‘, एकाने स्पष्ट विचारलं. त्यावर पुन्हा तो बोलू लागला, "नातेवाईकाकडील एकूण परिस्थिती पाहून मी कॉलेजच्या कॅटिंनमध्ये नाष्टा, जेवण सुरू केलं. वडिलांनी पॉकेटमनीसाठी दिलेले काही पैसे तिथे कामी आले. नंतर ते कमी पडू लागले म्हणून एका शिकवणीत रोज दोन तास शिकवायला गेलो. त्यातून खर्च भागला. आता परीक्षेला काही महिने बाकी असताना तर आपल्याच एका मित्राच्या रूमवर राहत होतो मी. तिथं बसून शांतपणे अभ्यास केला. आतापर्यंत ठीक होतं. पण यापुढे आता नातेवाईकाकडे न राहण्याचा निर्णय घेतला आहे. काय असतं मित्रांनो की मार्ग शोधले की सापडतात. मार्ग सापडत नाहीत म्हणून शोध थांबवण्याला अर्थ नसतो. जाऊ द्या. आज शेवटचा दिवस कॉलेजचा अन्‌ आपण भलत्याच विषयावर आलो.‘ एवढे बोलून तो थांबला.

Related Posts:

  • ते देवीकडं काय मागतात? देवीच्या उत्सवाचा शेवटचा दिवस होता. दररोज लाखो फक्तांची दूरपर्यंत रांग लागत होती. शहरातील संपन्न कुटुंबातील भक्त देवीच्या चरणी माथा टेकायला येत होते. "मोठ्या‘ भक्तांना पैसे देऊन देवीजवळ लवकर पोचण्याची व्यवस्था होती. आलिशान ग… Read More
  • माय आपल्याला जेवण का नाय? संध्याकाळचे चार वाजून गेले होते. समारंभासाठी हॉल छान सजला होता. नयनररम्य डेकोरेशन, कर्णमधूर सनईवादन, लज्जतदार जेवणाची तयारी आदी व्यवस्था चोख होती . विवाहसमारंभ वाटावा एवढा मोठा समारंभ होता. पण विवाह समारंभ नसून घरगुती कार… Read More
  • इतक्‍या पगारात कसे भागेल? तो चांगल्या कुटुंबातील होता. शिक्षणही चांगले झाले होते. एक चांगली कायम नोकरीही त्याला होती. मात्र कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी सुदृढ नव्हती. तरीही कुटुंब खाऊन-पिऊन सुखी होते. तो त्याचे आई आणि वडील असे त्यांचे कुटु… Read More
  • माझी जात: माणूस, धर्म: माणुसकी तो संपन्न कुटुंबातील होता. त्याला चांगली नोकरी होती. आई-वडिल, पत्नी आणि एक मुलगी असे त्याचे सुखी कुटुंब होते. तो कर्तृत्वालाच देव मानणारा होता. त्याला जात, पात, धर्म, पंथ वगैरे वगैरे बंधने अजिबातच मान्य नव्हती. ही व्यवस्था ब… Read More
  • हो, आम्ही सरकारी नोकरदार! हो, आम्ही सरकारी नोकरदार! सरकारी कार्यालय. सकाळचे 11 वाजून गेलेले. एका सरकारी कार्यालयात नागरिकांची गर्दी. "सर, झालं का माझं प्रमाणपत्र तयार?‘ एका तरुणाने एका कर्मचाऱ्याकडे विचारणा केली. कर्मचारी कामात व्यग्र होता. ब… Read More

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...