6/28/2016

ते देवीकडं काय मागतात?

देवीच्या उत्सवाचा शेवटचा दिवस होता. दररोज लाखो फक्तांची दूरपर्यंत रांग लागत होती. शहरातील संपन्न कुटुंबातील भक्त देवीच्या चरणी माथा टेकायला येत होते. "मोठ्या‘ भक्तांना पैसे देऊन देवीजवळ लवकर पोचण्याची व्यवस्था होती. आलिशान गाड्यांमधून उंची वस्त्रे घातलेले भक्त सहकुटुंब देवीकडे येत होते. देवीला नमस्कार करून मागणे मागून झाले की भक्तगण मंदिर परिसरातील जत्रा एन्जॉय करत होते. 

दुसरीकडे एक कुटुंब भक्तांच्या लेकरांना फुगे आणि खेळणे विकून एन्जॉय देत होते. फुगे विकणाऱ्यांमध्ये माय, बाप, त्यांची एक धाकटी मुलगी तर थोरला मुलगा असे कुटुंब होते. विक्रीच्या ठिकाणीच त्यांनी तात्पुरतं बस्तान बसवलं होतं. त्यालाच ते घर म्हणत होते. सकाळ, दुपार, संध्याकाळी, रात्र जत्रेची साक्षीदार होत होती. आज शेवटचा असल्याने फुगे आणि खेळण्यांची चांगलीच विक्री झाली होती. त्यामुळे ते चार जण अगदी आनंदात होते. उद्या ही जागा रिकामी होणार होती. आणि मुक्काम हलणार होता. दरम्यान आजचा दिवस आनंदात जाणार होता. साधारण रात्री जेवणाच्या वेळी वडिलांनी दोन्ही पोरांना काही पैसे दिले आणि जत्रेतून काहीतरी खाऊन घेण्यास सांगितले. इतके दिवस फुगे विकून दुसऱ्यांना आनंद देणारे आज स्वत:च जत्रेचा आनंद घेणार होते. दोघेही खूप वेळ जत्रेत फिरले. दरम्यान त्यांनी खूप काही बघितलं. जेवण म्हणून भेळपुरीही खाल्ली. आता ते परत आपल्या मुक्कामाकडे आले. आई-वडिल दोघेही आवराआवर करत होते.उद्यापासून नवी "जत्रा‘ शोधायची होती. काही वेळातच खूप थकल्याने चौघेही घरात झोपायला आले. झोपताना धाकल्या मुलीने वडिलांना अनेक प्रश्‍न विचारले. "आपण उंद्या कुटं जाणार? कसं जाणार?‘ अशा प्रश्‍नांची बरसात करत राहिली. वडिलही तिच्या प्रश्‍नांचे समाधान करण्याचा प्रयत्न करत राहिले. तिचे प्रश्‍न सुरुच राहिले. एका प्रश्‍नाने तिने वडिलांना निशब्द केले. ती म्हणाली, ‘आपल्याकडं जेवायला नाय त्यामुळं आपण कायबाय इकून पैकं कमावतो. त्याच्याकरता जत्रेत इतो. पण जत्रेत लई लोकं येतेत. छान छान कपडे घालून मोट-मोट्या गाड्यांमदे येतेत. त्यांच्या घरी पैकं असतील, त्यांच्या घरी खेळणीबी असतील. त्यांच्या घरी जेवायलाबी असल. तरीबी ते देवीकडे काय मागत असतील ओ?‘

(सौजन्य www.esakal.com)

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...