6/27/2016

माय आपल्याला जेवण का नाय?

संध्याकाळचे चार वाजून गेले होते. समारंभासाठी हॉल छान सजला होता. नयनररम्य डेकोरेशन, कर्णमधूर सनईवादन, लज्जतदार जेवणाची तयारी आदी व्यवस्था चोख होती . विवाहसमारंभ वाटावा एवढा मोठा समारंभ होता. पण विवाह समारंभ नसून घरगुती कार्यक्रम होता. फुलांची आरास करण्यात आली. आजूबाजूच्या परिसरात फुलांचा सुगंध पसरू लागला. विद्युत रोषणाई, वाद्य वगैरेने वातावरणात प्रसन्नता निर्माण झाली. कुटुंब गर्भश्रीमंत, हौशी आणि मोठे असल्याने खूप पाहुणे अपेक्षित होते. काही दिवसातच "त्या‘ कुटुंबात एका नव्या पाहुण्याचे अगमन होणार होते. "डोहाळजेवण‘ हे निमित्त होतं. खरं तर नव्या पाहुण्याच्या आगमनापूर्वी, त्याच्या स्वागताचा हा समारंभ होता. 

हॉलच्या शेजारच्या मुख्य रस्त्यावरील फुटपाथवर एक कुटुंब राहात होतं. या कुटुंबात केवळ तीन जण होते. सहा-सात वर्षांचा चिमुकला, दोन वर्षांची चिमुकली आणि त्यांची आई. चिमुकलीला कडेवर घेऊन फुटपाथवर, शेजारच्या सिग्नलवर फिरून फिरून आई फुगे विकायची. त्यातून जे काही मिळायचं त्यावर दिवस पुढे जायचा. बऱ्याचदा काहीच मिळायचं नाही. दिवस मात्र पुढे निघून जायचा. मात्र कुटुंब भीक मागत नव्हतं किंवा चोरीही करत नव्हतं. जे मिळेल त्यात आनंदी होतं. हॉलमधील समारंभाच्या दिवशी मात्र बऱ्याचदा या चांगली फुगे विकली जायची. त्यामुळे तो दिवस आनंदात जायचा. आज समारंभ असल्याचं या कुटुंबाला माहित होतं. त्यामुळे आजचा दिवस आनंदातच जाईल अशी आशा सर्वांनाच होती. हॉलमध्ये ज्या कुटुंबाचा समारंभ होता त्या कुटुंबात आणि फुटपाथवरील कुटुंबात दोन टोकांचा फरक होता. फुटपाथवरील कुटुंबातील जिवंत माणसांना पुरेसे अन्न मिळत नव्हते. तर हॉलमधील कुटुंबात अद्याप जन्मही न झालेल्या व्यक्तीचं स्वागत करण्यात येत होतं. त्याला छान छान पदार्थ खाऊ घालण्यात येत होते. 

फुटपाथवरील कुटुंबाने दुपारपासूनच मेहनतीने खूप फुगे फुगवून ठेवली होती. सोबत मदतीला चिमुकलाही होताच. वेगवेगळ्या रंगाची फुगे घेऊन हे कुटुंब हॉल जवळ आले. आत सगळी "मोठी‘ माणसे आहेत त्यामुळे आपली चांगली विक्री होईल, याचा त्यांना आनंद झाला. त्यांनी विक्री सुरू केली. हॉलमधील समारंभ सुरू झाला. बराच वेळ झाला तरी एकही फुगा विकला गेला नाही. आलिशान चारचाकी गाड्या पार्किंगमध्ये गर्दी करू लागल्या. त्यातून उंची वस्त्रे परिधान केलेली बायका आणि माणसे हातात काहीतरी "गिफ्ट‘ घेऊन हॉलच्या दिशेने जाऊ लागले. भोजनातील पदार्थांचा सुगंध बाहेरपर्यंत येत होता. त्यामुळे चिमुकल्याने खिडकीतून हॉलमध्ये डोकावून पाहिले. हॉलमधील बायका आणि माणसे "गिफ्ट‘ देत होते. गिफ्ट स्वीकारून त्यांना स्नेह भोजनाचा आस्वाद घेण्याचा आग्रह करण्यात येत होता. बुफे पद्धतीने स्नेहभोजनाचा कार्यक्रम सुरू होता. चिमुकल्याने नजर फिरवली तर त्याला अचानकच फुगे न विकण्याचे कारण समजले. हॉलमध्ये आधीच एक फुगेवाला येऊन फुगे देत होता. बहुधा त्या "श्रीमंत‘ कुटुंबाने त्याला कॉन्ट्रॅक्‍ट दिले होते. चिमुकल्याने ही गोष्ट आईला सांगितली. आई प्रचंड अस्वस्थ झाली. आता काय करायचे? संध्याकाळ उलटून गेली होती. फुगे विकले नव्हते. दुसरीकडे जाऊन फुगे विकण्याचे त्राण नव्हते. "माय, समदी लोकं येत्यात एका माणसाला कायबाय देतात अन्‌ त्यामुळं त्यांना खायला मिळतय. आपल्याकडचे सगळे फुगे दिऊ मंग आपल्यालाबी जेवाया मिळल!‘, चिमुकल्याने साधा सोपा उपाय सांगितला. 

चिमुकल्याने जग पाहिले नव्हते. त्याला तो उपाय साधा वाटत होता. न जन्मलेल्या बाळाला खाऊ घालणारी माणसं आपल्यालाही खायला देतील याबद्दल चिमुकल्याला शंकाच नव्हती. आईला मात्र हे सारं अशक्‍य वाटत होतं. पण तरीही दुसरा कोणताच पर्याय नसल्याने शेवटचा उपाय म्हणून ती तयार झाली. चिमुकल्याच्या मदतीने आईने सगळ्या फुग्यांचा एक गुच्छ तयार केला. हा गुच्छ फारच सुंदर दिसत होता. कडेवर चिमुकलीला आणि गुच्छ धरलेल्या चिमुकलेल्या हाताने धरून हे कुटुंब स्नेहभोजनाच्या आशेने हॉलमध्ये आले. थेट "गिफ्ट‘ स्वीकारणाऱ्या व्यक्तीकडे गेले. काळीकुट्ट शरीरयष्टी, मळकट-फाटकी वस्त्रे, विस्कटलेले केस आणि हातातील फुग्यांचा गुच्छ या साऱ्या अवस्थेमुळे ते हॉलमध्ये उठून दिसले. "गिफ्ट‘ स्वीकारणाऱ्याकडे व्यक्तीकडे फुग्यांचा गुच्छ देणार इतक्‍यात "अरे बाहेर काढा यांना‘ असे म्हणत दोन-चार जण पुढे आले. त्यांनी या सर्वांना ढकलत हॉलबाहेर आणू लागले. भोजनाचा आस्वाद घेणारी माणसं हा सारा प्रकार पाहात होती. फुटपाथवरील कुटुंबाचं जेवणाचं स्वप्न भंग पावलं. त्यांना पुन्हा आत न येण्याचा इशारा देऊन हॉलबाहेर काढण्यात आलं. एवढ्या साऱ्या गडबडीत सकाळपासून मेहनत घेऊन फुगविलेली फुगे हॉलमध्ये इतरत्र विखुरली.

हा सारा प्रकार पाहून चिमुकला म्हणाला, "माय आपण तर इतके फुगे दिले मंग आपल्याला जेवण का नाय दिलं?‘ आईकडे आता फुगेही नव्हते. पोटात अन्नही नव्हते. मुलांना खाऊ घालायलाही काही नव्हतं अन्‌ चिमुकल्याच्या प्रश्‍नाचे उत्तरही नव्हते.

(Courtesy: eSakal.com)

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...