6/29/2016

'...पैशाशिवाय काही खरं नाही?'

त्याने रूममेटकडून प्रवासापुरते पैसे उसने घेतले. तो त्याच्या एका बालमित्राच्या गावाला जायला निघाला. जाताना त्याच्या मनात प्रचंड अस्वस्थता होती. मात्र, आयुष्यात काहीतरी करण्याची जिद्द त्याला ऊर्जा देत होती. अशा विचारातच मित्राचे गावही आले. ठरल्याप्रमाणे थेट तो मित्राच्या घरी पोचला. मित्राने, त्याच्या पत्नीने आणि लहानग्या मुलीनेही चांगले स्वागत केले. जेवण वगैरे झाले. "नको नको‘ म्हणत असताना मित्राने याला मुक्कामी राहण्यास भाग पाडले. रात्री दोघेही बाहेर समुद्रकिनारी फिरायला गेले. बालपणीच्या, शाळेतल्या खूप गप्पा सुरु झाल्या. "शाळेत मी शेवटच्या बाकावर बसायचो आणि तू पहिल्या बाकावर... तुम्ही सारे मागे बसलेल्यांना "ढ‘ समजायचा!...‘ मित्राने लहानपणीच्या आठवणी सांगितल्या. एकाएकी लहानपणीच्या गोष्टीचा याने मोठेपणीशी संबंध जोडला. आणि नकळतच म्हणाला, "आणि आज आयुष्याच्या स्पर्धेत तू पहिल्या बाकावर आणि मी...‘ मित्राने त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही काळ फक्त समुद्राच्या लाटांचाच आवाज येत राहिला. 



"तू कशासाठी आला आहेस, हे ही मला माहित आहे. त्यामुळे तू चिंता करू नकोस. तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस. पण सध्या करतोय काय तू?‘, मित्राने मर्मावर बोट ठेवले. त्यावर याने आपला जीवनग्रंथ वाचायला सुरुवात केली, "तुझे आतापर्यंत घेतलेले सगळे पैसे मी परत करणार आहे. पण मला खूप काही करायचं आहे... काहीतरी वेगळं करायचं आहे मला. तुला तर माहिती आहेच ना... शाळेत नंतर कॉलेजात मला नाटकाची आवड होती. मला मोठी बक्षिसेही मिळाली आहेत. त्यामुळेच ऍक्‍टिंगमध्ये मोठं काम करून "सेलिब्रिटी‘ व्हायचं आहे. त्यामुळेच सध्याची स्ट्रगल सेलिब्रेट करत आहे‘ पुन्हा काही काळ शांतता गेली. मित्राने समज देत म्हटले, "अरे, पण बघ तू खूप हुशार आहेस. ऍक्‍टिंगही चांगली आहे. पण बघ ना. स्ट्रगल स्ट्रगल आणि स्ट्रगल आणखी किती स्ट्रगल.. म्हणजे तू कर तुला काय करायचं आहे ते. पण मी बघ तुझ्याएवढाच पण सेटल झालो आहे. लग्न झाले आहे. "बाप‘पण झालो आहे. मात्र तुझं आयुष्य पुढं सरकत नाही याचं दु:ख आहे‘ त्यावर हा थोडासा अस्वस्थ होत म्हणाला, "प्लीज तुझ्याशी तुलना नको करूस माझी. पैसा कमावणं हे तुझं टार्गेट. माझं तसं नाही. मला आधी जगायचं आहे अन्‌ त्यानंतर... ऍक्‍टिंग माझा छंद आहे अन्‌ तोच मी जपणार आहे. तू बघ एक दिवस...‘ त्याला मध्येच थांबवत मित्र म्हणाला, "ते सगळं खरं आहे रे. पण बघ तू आता कुठेतरी किरकोळ नोकरी करून तुझ्यापुरते पैसे कमावतोस. मी तर आहेच रे तुला वेळोवेळी मदत करायला. पण ऍक्‍टिंगच्या बाहेर येऊन प्रत्यक्ष जगात जगायला श्‍वासाश्‍वासाला पैसा लागतो. आता हेच बघ तू इथं आलास कुणाकडून तरी पैसे घेऊन. आता माझ्याकडून पैसे घेऊन घरी देणार... अन्‌ पुन्हा तुझी स्ट्रगल... ती थांबेलही एक दिवस, पण कधी? त्यामुळे एक सल्ला देतो ऐकायचा का नाही ते तुझं तू ठरव.‘ मागे समुद्राच्या लाटांचा आवाज येत होता. तरीही त्याचे कान मित्राच्या सल्ल्या ऐकण्याकडेच होते.

मित्र पुन्हा सुरु झाला, "हे बघ... छंद, पॅशन, स्ट्रगल, स्वप्ने हे सगळं बोलायला, काही काळ बोलायला आणि करायलाही बरं वाटतं. पण प्रत्यक्ष जीवनात पैसा लागतो. तुझ्याकडे पैसा नाही. तुझं वय होत चाललं आहे. चांगली नोकरी-धंदा नाही म्हणून पैसा नाही. नोकरी नाही म्हणून तुझ्या आयुष्यात छोकरी नाही. आणि त्यामुळे सगळी लाईफच स्टॉप झाली आहे तुझी. शिवाय महिन्याकाठी पैशाची चिंता आहेच. यार, सगळं कसं वेळेत व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी पैसा लागतो. काय पण म्हण पण पैशाशिवाय जिंदगीला मजा नाय दोस्ता‘ एवढे बोलून मित्र थांबला. आता त्याचं लक्ष केवळ समुद्राकडेच होतं. पुन्हा बराच काळ केवळ समुद्राच्या लाटांचा आवाज येत होता. त्यापेक्षाही अधिक लाटा याच्या मनात उसळत होत्या.

काही वेळाने दोघेही घराकडे निघाले. ठरल्याप्रमाणे मित्राने मदत केली आणि दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच मित्र निघाला. "मदत करतोय म्हणून ऐकून घ्यावं लागतयं. शेवटी पैसा बोलतोच ना. कारण पैशाशिवाय काही खरं नाही‘, हा विचार काही केल्या त्याचा पाठलाग सोडत नव्हता.

(सौजन्य : www.esakal.com)

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...