7/22/2016

प्रेम नाकारलेल्या प्रेयसीला लिहिलेले पत्र..

तो  आज माझे शब्द हरवले आहेत. शब्दच काय मी स्वत:च हरवलो आहे. मात्र, तरीसुद्धा माझे चित्त स्थिर असून मी स्वत: स्थितप्रज्ञ आहे. अशा क्षणांना शब्द स्वत:च मला भेटायला आले आहेत. यावेळी एक गोष्ट मला स्पष्ट सांगावीशी वाटते की, काल जे बोलता आलं नाही ते मी आज लिहिणार आहे. अर्थात् यात माझा काहीही उद्देश्य नाही. हे कृपया समजून घ्यावे. गैरसमज करून घेऊ नये. पत्र वाचून झालं की विसरून गेलात तरी चालेल किंवा तसेच करणे अधिक सोयीचे होईल.

अर्थात् हे मी आपणांस का सांगत आहे, हे निराळं सांगण्याची गरज नाही. काल काही क्षणांच्या अवधीत काय काय सांगणार? त्यामुळे कोसळण्याकरिता पत्राचा चा हा मार्ग मला अधिक सुकर वाटतो. अर्थात् हे कोसळणं म्हणजे भौतिक नव्हे तर हे कोसळणं म्हणजे भावनांचं, जाणिवांचं कोसळणं आहे. शिवाय पाणी जसं कोसळताना आपलं सौंदर्य तसूभरही कमी होऊ देत नाही. तसाच माझा प्रयत्न आहे. असलं काहीतरी भलतं-सलतं वाचून आपण हे पत्र शेवटपर्यंत वाचाल याची जगात कोणी शाश्वती देऊ शकत नाही. तरीसुद्धा कधीतरी हे पत्र पूर्ण वाचाल किंवा कदाचित पहिल्याच वेळी वाचून पूर्ण कराल अशा वेड्या आशेवर मला लिहिण्यास धीर आला आहे. कदाचित या पत्राची पारायणंसुद्धा (एकापेक्षा अधिक वेळा वाचन) कराल...

खरे तर गेल्या 60-70 तासांत काय झालं, काय होत होतं, काय होणार होतं हे मला कळतच नव्हतं. कदाचित आपणही अशा परिस्थितीला अनभिज्ञ असाल. मी तर अगदीच अनभिज्ञ होतो. कालपर्यंत तर जगणंच थरथरत होतं. आज माझा हात थरथरत आहे. आता ते काही प्रमाणात स्थिर झालं आहे. पूर ओसल्यावर नदीची झालेली अवस्था मी आज अनुभवत आहे. समुद्राला आलेल्या ओहोटीची अवस्था आज मी अनुभवत आहे. काळ्याकुट्ट ढगानं आपल्या आत दडलेलं पाणी उधळून टाकल्यानंतरची अवस्था मी अनुभवत आहे. माझी अवस्था शब्दातीत आहे. माझी अवस्था जगण्यापलिकडची आहे. माझी अवस्था जाणिवांपलिकडची आहे. संवेदना आणि अनुभूती यांच्या पलिकडच्या जाणिवांनी जन्म घेतला आहे. या जाणिवांना शब्द नाहीत, या जाणिवांना नाव नाही, या जाणिवांना कोठलीही बंधनं नाहीत. या जाणिवांना मूर्त स्वरुप नाही, देहसुद्धा नाही. त्यामुळेच या पत्रात नावांना स्थान दिले नाही. अर्थात् असे शब्द, त्यातील अर्थ, त्यातील मतितार्थ जाणण्याइतपत आपण सूज्ञ आहात असे मी गृहित धरतो.

मात्र, जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं म्हटलं जातं. त्याची प्रचिती मला प्रत्यक्ष आली. कदाचित माझ्या भोळ्या-भाबड्या भावना या जाणिवाच नसणार्‍या मशिनलाही कळत आहेत. त्यामुळे त्यांचेही अवयव काम करत नाहीयत. कारण इथंपर्यंत लिहितानाच माझा संगणक 2 वेळा बंद पडला आहे. एवढा सगळा पसारा लिहिण्याच्या मुख्य उद्देशाकडे वळूयात. सोमवारी मला देवानंच दिलेल्या बुद्धिमुळं मी आपणांस भेटलो आणि मला जे वाटतं ते बोललो. अर्थात् हे सर्व देवाच्या मनात असेल, आणि त्यामुळेच त्यानं मला तशी बुद्धि दिली असेल यावर माझा दुर्दम्य विश्वास आहे. ‘माझ्या पदरचे काहीच नसे’। आपणांस बोलताना मी स्वत:वर लादलेली सर्वसाधारण आचारसंहिता कधी मोडली नाही. आचारसंहिता म्हणजे नियम आणि बंधनं. माझा धर्म, माझे संस्कार, माझी संस्कृती आणि आई-बाबांची शिकवण यामुळे हे शक्य झालं. मला जेवढे बोलायचे होते, जे बोलायचे होते, तेवढेच आणि तेच अगदी नेमकेपणाने मांडले, असे मला वाटते. हे सगळं घडलं कसं असा प्रश्न आपणांस पडणे स्वाभाविक आहे. बघा ना, स्थिर, शांत पाण्यावर जर न दिसणार्‍या हवेचा थोडासा दाब जरी पडला तरी त्यावर असंख्य अगदी न मोजता येणारे वलय निर्माण होतात. मग एखादा जिवंत माणूस कोणाचा विचार करीत असेल तर त्याच्या मनात किती वलयं निर्माण होतील.

या जगात कोणी कोणाला आवडू शकत नाही का? इथं चंद्राला चांदणी आवडू शकते, समुद्राला किनारा आवडू शकतो, वृक्षाला छाया आवडू शकते. स्वप्नांना सत्य आवडू शकतं. काळ्याकुट्ट रात्रीला रम्य सकाळ आवडू शकते. जगण्याला मृत्यु आवडू शकतो. असा खुळा विचार मी केला. आणि तसे थेटपणाने व्यक्तही झालो. चंद्र अन् चांदणी, समुद्र अन् किनारा, वृक्ष आणि छाया, स्वप्न आणि सत्य, रात्र अन् सकाळ, जन्म अन् मृत्यु कधी भेटू शकते का? एवढा साधा विचारही करण्याचं तारतम्य त्यावेळी मला राहिलं नाही हेच माझं दुर्दैव.
तुम्ही तर माझ्या भावनांची, जाणिवांची, संवेदनांची तुलना थेट उभ्या आयुष्याशी केलीत. अवघं आयुष्य जोडण्यातील असमर्थतता व्यक्त केलीत. भावना, जाणिवा आणि संवेदना यांना थेटपणानं अवघ्या आयुष्याच्या पटावर मांडण्याचा प्रयत्न केलात. आपल्या दोघांत निरनिराळ्या अन् जगात कोणालाही न मोडता येणार्‍या अशा ‘अंबुजा सिमेंट’च्या भिंती निर्माण केल्यात. त्या भिंती तोडण्याची क्षमता सध्यातरी माझ्यात नाही. इथल्या व्यवस्थेतसुद्धा ती क्षमता नाही. माझ्या भावनेच्या आधारापेक्षा तुम्ही भेदा भेदाच्या भिंतीचाच आधार घेऊन मला निराधार केलेत. या भिंतींपलिकडे मी निखळ, निरागस, निर्विकार मैत्रीच्या पटापर्यंतचाच विचार केला होता. जिथं आपण आपल्या भावभावना, आठवणी, सुख-दु:ख, संवेदना, अन् आपला जिवंतपणा वाटून घेऊ शकलो असतो. त्यातून जगण्यातील आर्तता आपणांस समजू शकली असती. दु:ख याचंच आहे की आपण मला समजून घेऊ शकला नाहीत. असो.

माणसाचं आयुष्य म्हणजे सायकल चालवण्यासारखं असतं. तोल सावरण्याकरिता पुढे पुढे जात रहावं लागतं. आपल्यालाही पुढे पुढे जात रहावं लागणार. ज्या घटना घडून गेल्या त्या रात्रीच्या अंधारानं गिळून टाकल्या. येणार्‍या उष:कालावर आपलाच अधिकार असणार आहे. त्यामुळं ती रात्र कधी उगवणार नाही तो उष:काल आपल्यासाठीच उगवत राहवा, अशी मी देवापुढं प्रार्थना करतो. या पत्रातून माझ्या साहित्याचा प्रवास अखंड चालू राहणार हे निसंदेश. माझ्या स्वप्नवत प्रवासाला सुरुवात करून दिल्याबद्दल धन्यवाद!

7/19/2016

नवरा शोधताना....

शहराच्या मध्यवर्ती भागात फक्त मुलींसाठीचे एक हॉस्टेल. कोणी शिकणाऱ्या, कोणी नोकरी करणाऱ्या होत्या. बहुतेकजणी अविवाहितच होत्या. हॉस्टेलच्या मालकीण अत्यंत प्रेमळ होत्या. अर्थात हिशोबात काटेकोर होत्या. पण मुलींच्या अडचणी समजून घेत होत्या. कधीतरी त्या मुलींसोबत दिलखुलासपणे बोलतही असत. शिवाय मुलींच्या पालकांशीही त्या सतत संपर्कात असत. त्यामुळे हॉस्टेलची लोकप्रियता चांगली होती. 
 
 

रविवार असल्याने हॉस्टेलमधल्या एका खोलीत अनेकजणी एकत्र आल्या होत्या. नेहमीप्रमाणे गप्पा मारता मारता लग्नाचा विषय निघाला. "लग्न म्हणजे ना लाईफ ड्रामा टाईप चेंज झाल्यासारखी वाटते. बापरे. स्टॉप झाल्यासारखी वाटते जरा कटकट वाटते‘, एका कॉलेजातील मुलीने थेट भावना व्यक्त केल्या. "हो, यार घर बदलणार. अनोळखी घर. अनोळखी माणसे. नवरा, सासू-सासरे, दीर, नातेवाईक वगैरे वगैरे... त्यापेक्षा सिंगल लाईफ मस्त..‘, दुसऱ्या एकीने तिला दुजोरा देत पाठिंबा दिला. त्यावर हॉस्टेलमध्ये ताई म्हणून परिचित असलेली एक प्रौढ अविवाहित महिला बोलू लागली, "कसं आहे की जसा तुमचा दृष्टिकोन असतो तसं तुम्हाला सगळं जग दिसतं. पण लग्न ही काही किंचितही वाईट किंवा कटकटीची गोष्ट नाही. अर्थात जर तुम्ही लग्न मनापासून स्वीकारले असेल तरच...‘ चर्चेत चांगलाच रंग चढत चालला होता. "ताई, तुम्ही एवढं सांगताय पण मग तुमचं एवढं वय झालं तर का नाही केलं लग्न?‘ एका जराशा फटकळ बोलणाऱ्या आणि हॉस्टेलमध्ये "बोल्ड‘ म्हणून परिचित असलेल्या मुलीने नेमक्‍या वर्मावर बोट ठेवला. त्यानंतर काही क्षण शांतता पसरली. 

थोडा वेळाने ती प्रौढ महिला बोलू लागली, "मला भाऊ नाही. तीन बहिणी. वडिलांचे तुटपुंजे उत्पन्न. त्यात भागत नव्हते. म्हणून मग मी लग्न न करता आधी सर्व बहिणींचे लग्न करायचा निर्णय घेतला. मीच घरात मोठ्या मुलाची भूमिका बजावली. मला माझ्या बहिणींचे लग्न करताना खूप अडचणीी आल्या. आर्थिक परिस्थितीपेक्षा मोठ्या बहिणीचे लग्न नाही आणि छोटीचे आधी असे का? या प्रश्‍नाने मला प्रचंड त्रास झाला. शेवटी मोठीने आधी करावे असे कोठे लिहून ठेवले आहे का? असे म्हणत मी सर्व बहिणींचे लग्न केले. आता माझे लग्नाचे वय उलटून गेले आहे. शिवाय आई-बाबाही थकले आहेत. त्यामुळे त्यांची काळजी करायला कोणीतरी हवेच ना. नोकरीच्या निमित्ताने मी इथे आहे. काही दिवसांनीच त्यांनाही इकडे आणणार आहे. त्यांच्या सेवेतच पुढील आयुष्य घालवणार आहे‘, ताईने आपली कथा पूर्ण केली. त्यावर खोलीतील सर्व मुलींनी टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक केले.


तेवढ्यात मालकीण खोलीत आल्या, "काय गप्पा चालल्यात? ताईची गोष्ट ऐकताय का? फार कष्ट केलेत बरं तिने!‘ पुन्हा बोल्ड मुलगी बोलू लागली, "पण ताई लग्न करूनही नवरा कसा मिळेल वगैरे वगैरे चिंता असतातच त्यापेक्षा...‘ मालकीणीने तिला मध्येच थांबवत म्हटले, "मुलींनो लक्षात ठेवा मुलगा असो की मुलगी आयुष्यात लग्न ही महत्त्वाची बाब आहे किंवा तो एक संस्कार आहे. आता ताईसारखी लाखात एखादी अपवादात्मक गोष्ट असू शकते. पण आयुष्याच्या शेवटी जोडीदार सोबत हवाच. कारण तोच महत्वाचा असतो आणि हो लग्नाच्या बाबतीत तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह ऍटिट्युड ठेवा.‘ तेवढ्यात पुन्हा बोल्ड मुलगी बोलू लागली, "बट, अवर सिस्टीम इज मॅन ओरिएंटेड. सो मला ती बदलाण्याची गरज वाटते.‘ "तू कोणत्या जगात वावरतेस? सिस्टीम वेगाने बदलली आहे. बदलत आहे. आता छोट्या-मोठ्या खेड्यातील मुलीही पोस्ट ग्रॅज्युएट होत आहेत. नोकरी करत आहेत. घरातील बहुतेक निर्णय सर्वांनी मिळून घेतले जातात. लग्नाच्या बाबतीत तर मुलीच्या मर्जीला आणि होकाराला टॉप प्रायोरिटी दिली जाते. शिवाय घरातल्या इतर निर्णयांमध्येही महिलांचा सहभाग महत्त्वाचा मानला जातोय‘, ताईने बोल्ड मुलीला सुनावले.

मघापासून ही सारी चर्चा अगदी मनातून ऐकणारी एक मुलगी एकाएकी रडू लागली. साऱ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. मालकीणीने आणि ताईने तिला शांत करून बोलते केले. ती बोलू लागली, "ताई, मी अगदी साध्या घरातील. माझे लग्न ठरले होते. मी आणि तो बाहेर फिरायलाही जात होतो. एकेदिवशी त्याने माझ्याकडे नको त्या गोष्टीची मागणी केली. मी वेळ टाळून नेली. थेट घरी आले आणि नकार कळवला. आता...‘, असे म्हणून ती मुलगी पुन्हा रडू लागली. "अगं त्यात रडण्यासारखं काय आहे? तू योग्य निर्णय घेतलास. मुलींनो लक्षात ठेवा. लग्नाच्या पूर्वी तुम्ही कोणत्याही पुरुषाकडे तुमचं सगळं काही सोपवू नका. भलेही तो तुमचा होणारा नवरा असला तरीही!‘ मालकिणीने सर्वांना मोलाचा संदेश दिला.

आता ताई बोलू लागली, "हल्ली मुलींना त्यांचे पालक लग्नासाठी स्थळे आणतात. पण लग्न करताना मुली मुलाच्या संपत्तीकडे पाहतात. त्याच्या पॅकेजकडे, त्याच्याकडील गाड्या-बंगल्यांकडे बघतात. त्यात तो ‘फॉरेन रिटर्न‘ किंवा NRI असेल तर मुलगी भाळलीच म्हणून समजा. मग त्याचे इतर सर्व ‘गुण‘ दुय्यम ठरतात. वास्तविक मुलाचे वैयक्तिक कर्तृत्त्व काय आहे, ते बघायला हवे. बापाच्या जिवावर उड्या मारणाऱ्या पोरांना आयुष्याची खरी किंमत समजलेली नसते. स्वत: कष्ट करून सन्मानाने कमावलेले चार पैसे आयत्या संपत्तीपेक्षा हजारो पटींनी श्रेष्ठ असतात... 
पण माझी आजी नेहमी एक म्हणायची ते आठवतेय... की, ‘मुलाकडे फुटकी कवडी नसली तरी चालेल मात्र त्याच्याकडे अनमोल संस्कार, स्वच्छ चारित्र्य, मोठ्यांचा आदर करण्याची वृत्ती, निर्व्यसनी आणि कष्ट करायची तयारी असायला हवी.‘ 
हे आजीचं म्हणजे पण फारच आदर्शवादी वाटतं हो. अशी मुले लढतात, संघर्ष करतात, जिंकतात, प्रसंगी पडतातही पडले तर पुन्हा उठतात आणि पळू लागतात. पुन्हा जिंकत असतीलही... आयुष्यावरील निष्ठेमुळे ते आपल्या प्रेमाच्या, आपुलकीच्या माणसांच्या सुखासाठी कायम सन्मार्गाने धडपडत राहत असतीलही... अगदी शेवटच्या श्‍वासापर्यंत...‘‘ 

ती पुढे म्हणाली, "माझ्या दोन बहिणींना मी अशीच मुले पाहिलीत. त्यांच्याकडे लग्नाआधी फार काही नव्हते. पण लढण्याची जिद्द होती. त्यांनी स्वकर्तृत्त्वावर आज वैभव उभे केले आहे," एवढे बोलून ताई थांबली. सर्वांनी कडकडून टाळ्या वाजवल्या.

अन् ती अस्वस्थपणे पुढे म्हणाली, "पण अशी मुलं किती प्रमाणात आहेत.. अन् असली तरी तशा मुलांची वाट पाहण्याएवढा पेशन्स आहे कुणाकडे?"
(हा प्रश्न तिने सर्व मुलींसह नकळत स्वतःलाही विचारला होता.)
 
(Courtesy: esakal.com)

7/02/2016

'...मला माणूस बघायचा आहे!'

शाळेतील कार्यक्रम काही वेळातच सुरू होणार होता. कार्यक्रमाची संपूर्ण तयारी झाली होती. विद्यार्थी रांगेत बसले होते. काही विद्यार्थ्यांचे पालक, शाळेतील सर्व शिक्षक आणि कर्मचारीवृंदही उपस्थित होते. काही वेळाने वक्ते आणि प्रमुख पाहुणे व्यासपीठावर आले. सर्व पाहुण्यांची ओळख करून देण्यात आली. स्वागत-सत्काराचा औपचारिक कार्यक्रम संपन्न झाला. पाहुण्यांचा परिचय, प्रस्तावना वगैरे सगळे झाले. आता प्रमुख वक्ते बोलण्यासाठी उभे राहिले. टाळ्यांचा कडकडाट झाला. विद्यार्थ्यांसह, शिक्षक आणि उपस्थित सर्वांना वक्तव्याला ऐकण्याची प्रचंड उत्सुकता होती. वक्ते साधारण पन्नाशी ओलांडलेले होते. त्यांची लोकप्रियता प्रचंड होती. ते बोलू लागले - 



"मित्रहो, आज मी तुमच्या समोर उभा आहे. एक संशोधक आणि अवकाशयात्री म्हणून. माझेही बालपण याच शाळेत गेले. मी ही तुमच्यासारखा याच मैदानावर खेळत होतो. आज मला माझ्या बालपणीची आठवण येत आहे. परंतु मला लहानपणी फार मित्र नव्हते. पण तुम्ही मात्र चांगले मित्र बनवा. खूप खूप मित्र बनवा. माणसे जोडा. खरे तर एवढेच सांगण्यासाठी मी येथे आलो आहे. लहानपणी मी फारच एकलकोंडा होतो. तसा काहीसा जणू माझा स्वभावच बनला होता. लहानपणी ज्यावेळी आई मला चांदोमामाच्या गोष्टी सांगायची त्यावेळी मी आईला प्रश्‍न विचारायचो. म्हणायचो "आई, चांदोबा तर आपला मामा आहे. मी माझ्या मामाकडे दरवर्षी जातो. मग या चांदोमामाकडे मला जाता येईल का?‘ त्यावर आई हसली आणि "हो, खूप अभ्यास केलास तर जाशील की‘ असे म्हणाली. 

मित्रांनो, मग मी चंद्रावर जाण्याचा ध्यासच घेतला. काय काय करता येईल असे आईला रोज विचारत होतो. आई-बाबा मला फक्त "तू अभ्यास कर‘ असे म्हणत होते. मी एवढा ध्यास घेतला की फक्त अभ्यास. त्यामुळे मी फारसे मित्रही केले नाहीत. मी खूप खेळतही नव्हतो. आठवीच्या नंतर तर माझे खेळणेही बंद झाले. दहावीत मी चांगल्या मार्कांनी पास झालो. त्यानंतर चंद्रावर जाण्यासाठी काय काय करता येईल त्यादृष्टीने मी पुढची वाटचाल केली. आवश्‍यक ते सर्व अभ्यासक्रम पार पाडले. ते पूर्ण करण्यासाठी मला माझे गाव सोडून जावे लागले. ज्यावेळी मी गावापासून दूर होतो, त्यावेळी मला आईची, घरची खूप आठवण यायची. मग गावाकडचा किंवा अगदी माझ्या जिल्ह्यातला माणूस भेटला की बरे वाटायचे. तरीही माझा एकलकोंडा स्वभाव बदलला नव्हता. काही वर्षांनी मला पुढील शिक्षणासाठी राज्याबाहेर जावे लागले. आता बाहेर राहण्याची सवय झाली होती. आईपासून दूर. मग ते गावाबाहेर असो की राज्याबाहेर. पण राज्याच्या बाहेर असताना मला हॉटेलमध्ये आणि इतर ठिकाणी माझ्या राज्यातील माणूस भेटायचा. मग त्याच्याशी मी आवर्जुन माझ्या भाषेत बोलायचो. अगदी ओळखीच्या लोकांना न बोलणारा मी अनोळखी लोकांशीही बोलू लागलो. त्यानंतर काही वर्षांतच पुढील शिक्षणासाठी परदेशात जाण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यासाठी मला आता आईपासून खूपच दूर जावे लागणार होते. मात्र मला माझे स्वप्न पूर्ण करायचेच होते. 

मित्रांनो, परदेशात जाण्यापूर्वी मी आईला भेटायला गेलो. मला चांगलं आठवतयं आई म्हणाली होती, "आता मी चंद्राची रोज पूजा करत जाईल. तुझ्या भाच्याला सुखरूप परत पाठव म्हणून सांगेन‘ मित्रहो, त्यादिवशी नकळतपणे माझ्याही डोळ्यात पाणी आले. आईचे आशीर्वाद घेऊन मी नियोजनाप्रमाणे परदेशात गेलो. तिथे माझे आवश्‍यक ते अत्यंत खडतर प्रशिक्षणही सुरू झाले. मॉर्निंग वॉकला किंवा रात्रीच्या शतपावलीच्या वेळी मला एखादा माणूस माझ्या देशातला असल्यासारखा भासायचा. मग मी आपुलकीने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचो. बहुतेकवेळा तो माझ्याच देशातला निघायचा. एक-दोन वेळा अंदाज चुकला होता. मात्र माझ्या देशातला माणूस भेटला की मला बरे वाटायचे. मग तो कोणत्याही राज्यातला असला तरीही! 

मित्रहो, ज्या दिवसासाठी मी आतापर्यंत तपश्‍चर्या केली होती तो दिवस अखेर उगवला. जगातील वेगवेगळ्या टोकावरील चार माणसांना चंद्रावर पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये माझीही निवड झाली. माझे सहकारी ज्या देशातील होते त्या देशाबद्दल मला फारसे काहीच माहिती नव्हते. मात्र प्रत्यक्ष चंद्रावर जाण्यापूर्वी काही महिने आम्हाला एकत्र ठेवण्यात आले. तेव्हा छान ओळख झाली. थोडी फार भाषेची अडचण यायची. पण पुढे पुढे त्याचीही सवय झाली. हा कालावधीही यशस्वीरित्या पूर्ण झाला. मित्रहो, 

तुम्ही जर जिद्द ठेवलीत तर आयुष्यात तुम्हाला खूप काही मिळू शकते. ज्यादिवशी मी चंद्रावर जाणाऱ्या यानात बसलो त्यादिवशी माझ्या मनात मी माझ्या मामाला भेटायला जात असल्याची भावना होती. आणि "मी चंद्राची रोज पूजा करत जाईल. तुझ्या भाच्याला सुखरूप परत पाठव म्हणून सांगेन‘ हे आईचे शब्द कानात घुमत होते. त्यानंतर ठरलेल्या वेळी आमचे यान निघाले. माझ्याकडे यानातून बाहेर जाऊन चंद्रावर पाय ठेवून दिसतील तेवढ्या आणि जमतील तेवढ्या वस्तू आणण्याची जबाबदारी होती. त्यामध्ये चंद्रावरील दगड, माती आणि आणखी जे काही दिसेल त्या साऱ्या वस्तूंचा समावेश होता. आमचे यान पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर आले. आता माझ्या सोबत पृथ्वीवरील तीन कोपऱ्यातील देशांमधील नुकतीच ओळख झालेली तीन माणसे होती. पण सोबत माणूस होता, हे विशेष. यान चंद्रावर उतरले. ठरल्याप्रमाणे सर्वांचे काम सुरू झाले. यानाबाहेर उतरण्याची माझी वेळ आली. माझी दोरी यानाला जोडलेली होती. तसे प्रशिक्षणात या साऱ्या बाबींचे प्रात्यक्षिक केले होते. मात्र आता हे प्रत्यक्ष घडणार होते. मी यानाबाहेर पोचलो. गुरुत्वाकर्षण नसल्याने तिथे क्षणाक्षणाला तोल जात होता. मी फक्त काही क्षणांसाठी त्या अवकाशात राहणार होतो. आजूबाजूला काळाकुट्ट अंधार होता. नाही म्हणायला दूरवर एक निळसर रंगाचा मोठा गोळा किंचितसा चमकत असल्यासारखा दिसत होता. दिसायला तो साधा गोळा होता पण त्याला "ती पृथ्वी आहे‘ असा निष्कर्ष आम्ही काढला होता. खरं तर एवढे मोठे देश, एवढी माणसे एवढ्याशा गोळ्यात सामावलीत यावर माझा सुरुवातीला विश्‍वास बसला नाही. पण माझ्याकडे त्यासाठीचे आवश्‍यक पुरावे होते. त्या गोलाकार गोळ्यावर देशादेशामधल्या सीमा दिसत नव्हत्या. फक्त एक गोळा. त्यावर माझी आई होती. माझे घर होते. पण या साऱ्यापासून मी खूप दूर आलो होतो. अशाच विचारांच्या तंद्रीत मी पुढे पुढे जाऊ लागलो. काही वस्तू गोळा केल्या. मात्र या साऱ्या विचारात नियोजित वेळेपेक्षा अगदी काही क्षण मी अधिक वेळ बाहेर होतो. त्यामुळे माझ्या दोरीला यानातील सहकाऱ्यांना धक्का देऊन मला परत येण्याची अप्रत्यक्ष सूचना केली. माझी विचारांची तंद्री भंगली. मी प्रचंड भयभीत झालो. "एलियन्स‘ आलेत की काय असे क्षणभर वाटले. "एलियन्स‘ आपल्याला त्यांच्या जगात घेऊन जातील, आपले काय करतील? असे एक ना अनेक हजारो विचार त्या अर्धा-पाऊण क्षणात माझ्या डोक्‍यात तरळून गेले. 

मित्रहो, त्याक्षणी मला फक्त माणूस बघावासा वाटला. माझ्या गावाकडचा, माझ्या जिल्ह्याचा, माझ्या राज्याचा, माझ्या देशाचा हे सारे भेद त्या दोन-तीन क्षणांसाठी गळून पडले होते. केवळ हाडामासाचा आणि पृथ्वीवरचा माणूस मला त्याक्षणी आश्‍वस्त करणारा होता. कोणतेच भेदभाव आता माझ्या समोर नव्हते. माणसाचं मन कसं असतं पहा मित्रांनो! एक क्षण असा होता की मला माणसाला बोलायला आवडत, भेटायला नव्हते. मी एकलकोंडा होता. पण आता फक्त माणसाच्या भेटीसाठी माझा जीव तळमळत होता. त्यानंतर काही क्षणांतच मी यानाच्या दिशेने आलो आणि सुखरूपपणे यानात पोचलो. तेथे मला यानातील माझा सहकारी ‘माणूस‘ दिसला. आणि बरे वाटले! 

मित्रहो, हा सारा चंद्रावरचा प्रवास झाल्यानंतर मी पुन्हा माझ्या देशात परतलो आहे. मी पुन्हा माझ्या शाळेत परतलो आहे. प्रत्यक्ष चंद्रावरील संशोधनापेक्षा मला माझ्या आतला एक शोध लागला आहे. तो म्हणजे कोणत्याही भेदाशिवाय कोणत्याही माणसाला कोणताही माणूस भेटला की बरे वाटायला हवे. तेच तर जीवनाचे सार्थक आहे. आता मला फक्त माणूस भेटला की खूप बरे वाटते.. मित्रहो, जाता जाता एवढेच सांगतो की तुम्ही माणूस जोडा. प्रत्येक माणूस जोडण्याचे व्रत केले तर एक दिवस सारे भेद गळून पडतील. कोणीही कोणाचाच शत्रू राहणार नाही... धन्यवाद!‘

एवढे बोलून वक्ता थांबला. विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला. त्यानंतर जवळजवळ दोन-तीन मिनिटे फक्त टाळ्याच वाजत होत्या.

(सौजन्य : www.esakal.com)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...