6/23/2019

दादावर तू रुसू को (ताईसाठीची कविता)

💫  _माहेरी आलेल्या ताईला दादा रागावलाय. तिला समजावण्यासाठी लिहिलेली हृदयस्पर्शी कविता_

😰
माहेराला आलीस ताई
दादावर तू रुसू नको
त्याचा राग खोटा आहे
खरं खरं फसू नको

बोलला असेल दादा तुला
त्याचं नको मानू वाईट
मनापासून एकदा आठव
लहानपणीची खोटी फाईट

राखी पौर्णिमेला तू
किती किती नटायचीस
ओवाळणीसाठी मग
दादाशीच भांडायशीच

चड्डीतला दादा तुझा
पँटमध्ये केव्हा गेला
हातात नेऊन देऊ लागलीस
चहाचा गरम पेला

भातुकलीचा संसार तुझा
बालपणी तो मोडत होता
संसार खरा मांडून दिला
तेव्हा किती रडत होता

आठवतं का तुला तो
तुझ्या लग्नात झटला होता
तू गेल्यावर चार दिवस
रडत रडतच झोपला होता

बोलला असेल भले बुरे
त्याचं काय असतं एवढं
ताई दादात असतात का गं
राग लोभ खरे खुरे

दादालाही असतात गं
खूप सारे व्याप ताप
कसा देईल ताईला तो
वाईट साईट शिव्या शाप

आई बाप पिकलं पान
कधीतरी गळून पडेल
त्यानंतर दादाच माहेर
तुझे तुलाच कळून चुकेल

नको ना गं ताई तू
दादावरती अशी रुसू
कशी आवडेल दादाला
रडणारी ताई मुसू मुसू 😰

 © *व्यंकटेश कल्याणकर*, पुणे

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...