6/24/2019

एक ठिणगी

कधी... कधी...

आकाश भरून येतं. आक्राळविक्राळ काळेकुट्ट ढग एकत्र येतात. भयावह काळोख गिळायला पाहतो. क्षितीज संपलयं वाटतं. संकटं मिठित घेतात. आव्हानं क्रूर थट्टा करतात. अस्ताचा आरंभ झाल्यासारखं वाटतं. पण....  तेवढ्यात, तेवढ्यात एक कर्णकर्कश्श आवाज होतो. एक दैदिप्यमान उजेड पळभरातच अंधाराला खाऊन टाकतो. नष्ट होतात आसमंतावर पसरलेली काळीकुट्ट जळमटं. अस्ताच्या आभासाचा अस्त होतो. भवताल निर्मळ होतं. आसमंत सुंदर होतो. मन: पडद्यावर दिसू लागते वाट. दैदिप्यमान उजेड जगायला शिकवतो.

आणि आणि तेव्हाच जाणवतं...

मला आहेत हजारो चक्षु. आहेत सहस्र बाहू. बाहूंमध्ये आहे कोट्यवधी हत्तींचं बळ. माझ्यात आहे हा आसमंत कवेत घेण्याची ताकद. माझ्या धमन्यांमधून रक्त नव्हे वाहतोय उजेड. अंधाराची चिरफाड कडून शरीरभर सळसळतयं उजेडाचं चैतन्य. वाटतं हजारो पृथ्वींना गदागदा हलवण्याचं सामर्थ्य आहे या मर्दात. क्षुद्र संकटांची गुंडाळी करून मी भिरकावतोय लांब लांब ढगात. तिळाएवढी आव्हानं मी खाऊन टाकू शकतो आणि मी देऊ शकतो स्वप्नांच्या तृप्ततेचा कृतार्थ ढेकर.

कारण... कारण...

माझ्यात आहे दैदिप्यमान उजेड पुरविणारी एक अंत:प्रेरणेची ठिणगी. जी पेटवून टाकेल सा-या विश्वाला आणि निर्माणही करेल नवं विश्व. जी लाथ मारेल काळ्या ढगांना आणि चुंबन घेईल आभाळाच्या उंचीचं. दमड्या फेकून ही ठिणगी तुमच्या बाजारात विकत मिळणार नाही. ती घुसमटतेय माझ्या आत. तुमच्या आत. सगळ्यांच्याच आत. तिच्या घुसमटीचा अंत करा.  उडू द्या तिला मुक्त आकाशात. उधळू द्या तिने अवकाशात अनेक रंग आणि साजरा करा फक्त आयुष्याचा उत्सव...

त्यानंतर

एक दिवस तुमचं शरीर न्यायला तो येईल. तुमची ठिणगी मात्र तो इथेच ठेऊन जाईल. इथल्या प्रत्येकाला पेटवण्यासाठी खूप आतून...

© व्यंकटेश कल्याणकर

Related Posts:

  • हो, मी 500 रुपयांची नोट बोलत आहे! हो, हो! मी 500 रुपयांची एक नोट बोलत आहे. काही तासांपूर्वी मोठी किंमत असलेल्या माझी आता किंमत शून्य आहे. हा, माझे सारे नातेवाईक वगैरे एकत्र करून रद्दीमध्ये मला काही भाव येईल. पण पूर्वीसारखा नाही. जाऊ द्या! आपल्याकडे किंमत … Read More
  • 'माणूस महत्त्वाचा की गुरे?' डोंगरकपारीत जंगलाच्या जवळ एक वाडी होती. त्या वाडीमध्ये त्यांचा मोठा वाडा होता. त्यांचं घराणं प्रतिष्ठित होतं. जंगलाच्या अलिकडे त्यांची 100 एकरपेक्षा जास्त जमीन होती. वाड्यात नोकरचाकर होते. दूध, तूप, लोण्यांसाठी आणि शेतकाम… Read More
  • शनिवारची गोष्ट: 'श्रद्धा' म्हणजे काय? आटपाट नगर होतं. नगरावर एक राजा राज्य करत होता. नगरातील लोक श्रद्धाळू होते. नगरात एक मोठे मंदिर होते. मंदिराचा गाभारा खूप मोठा होता. तो पाण्याच्या हौदासारखाच होता. राजाने एकदा आदेश दिले. मंदिराचा गाभारा फक्त दुधाने भरून काढाय… Read More
  • 'या हयातीत तुमचे घर होणार नाही!' ते दोघे कॉलेजपासून चांगले मित्र होते. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची म्हणावी अशीच होती. तरीही ते कुटुंबियांसोबत खाऊन-पिऊन सुखी होते. दोघेही वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत होते. आपापल्या क्षेत्रात ते निष्णात आणि प्रामाणिक होत… Read More
  • ...जसं वाटतं तसं जगायला हवं! कंपनीच्या आवारात रोज रात्री एक आलिशान चारचाकी गाडी यायची. रात्री उशिरा गाडी यायची. गेल्या अनेक दिवसांपासून ती गाडी पार्किंगमध्येच दिसत होती. ही गोष्ट कंपनीच्या कॅम्पस मॅनेजरच्या लक्षात आली. त्याने वॉचमनला विचारले. "रोज रा… Read More

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...