12/13/2013

प्रेरणेचा प्रकाश देणारे ‘तारांगण’ - पुस्तक परिचय

प्रेरणेचा प्रकाश देणारे ‘तारांगण’ - पुस्तक परिचय

तारांगण
सुरेश व्दादशीवार
साधना प्रकाशन, शनिवार पेठ, पुणे
मूल्य: रु. 200/- पृष्ठे: 220

निरनिराळ्या प्रकृतीची, विचाराची अन् मानसिकतेची माणसे आयुष्याच्या प्रवासात सतत भेटत राहतात.  काही माणसे त्यांच्यातील गुणवैशिष्ट्यांमुळे कायम स्मरणात राहतात. मग त्यांचा या जगात असण्याचा वा नसण्याचा प्रश्न उरत नाही. त्यांच्या अद्वितीय कर्तृत्त्वाने दुसर्‍यांच्या हृदयात घर करून राहण्याचं सामर्थ्य त्यांच्या नकळतच त्यांना प्राप्त होत राहतं.  अशा काही व्यक्तींबद्दल अनेकांच्या मनात नितांत आदर असतो. जणू अशा काही व्यक्तींचं मिळून मनात निर्माण झालेलं ‘तारांगण’ कित्येकांना सतत प्रेरणेचा प्रकाश देत असतं. मनामनात प्रकाशणार्‍या अशाच काही तारांकित व्यक्तींचं ‘तारांगण’ सुरेश द्वादशीवार यांनी पुस्तकाच्या रूपात वाचकांच्या समोर उभं केलं आहे.

आपल्या स्वत:च्या आईच्या वाट्याला आलेले अपार दु:ख केवळ एका वाक्यात सांगून आईला पुस्तक अर्पण करीत लेखकाने पुस्तकाच्या प्रारंभीच वाचकांशी भावनिक नाते जोडले आहे.  प्रदीर्घ लेखनाचा समृद्ध अनुभव असलेले सुरेश द्वादशीवार यांनी काही वर्षांपूर्वी ‘साधना’ साप्ताहिकात ‘तारांगण’ ही लेखमाला लिहिली होती. वाचकांच्या उदंड प्रतिसादानंतर अन् त्यांच्याच आग्रहाखातर या लेखमालेचे पुस्तकाच्या रूपाने एकत्रित संकलन ‘साधना प्रकाशनाने’ नुकतेच वाचकांना सादर केले आहे. विशेष म्हणजे अवघ्या सहा महिन्याच्या आतच या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित होऊन ती सुद्धा संपण्याच्या मार्गावर आहे. ‘मराठी वाचक कमी झाला’ असे म्हणणार्‍यांसाठी ‘तारांगण’ म्हणजे तडाखेबाज उत्तर आहे.

‘तारांगण’ म्हणजे असामान्य कर्तृत्त्व गाजविलेल्या व्यक्तींचं निव्वळ चरित्र नसून सामान्यातील सामान्यांवर प्रेरणेचे संस्करण करणारा प्रेरणाग्रंथच म्हणावा लागेल. आपापल्या क्षेत्रात माणसाला शक्य असेल तेवढी उंची प्राप्त करणार्‍या कर्तृत्त्ववान व्यक्तीच्या संघर्षाची इत्यंभूत कहाणी ‘तारांगणात’ आढळत नाही, तर परिस्थितीच्या काळोखावर अन् व्यवस्थेच्या उरावर मात करीत आपल्या ध्येयाचा झेंडा रोवणार्‍या उमद्या ‘तरुणां’ची संघर्षकथा वाचकांना भारावून टाकणारी आहे. तसेच वाचकांच्या मनात प्रेरणेची ठिणगी प्रज्वलित करण्यासाठी ती पुरेशी आहे.

लेखकाने केवळ चरित्रग्रंथांवरून, ऐकीव माहितीवरून, माध्यमांच्या संदर्भातून लिहिलेले वर्णन वगळून अगदी एकेरी हाकेच्या अंतरावरून त्या त्या व्यक्तींबद्दल आलेले अनुभव अगदी प्रामाणिकपणे मांडले आहेत. प्रत्येक प्रकरणाच्या प्रत्येक व्यक्तीला (अपवाद एम.एफ.हुसैन) अगदी जवळून अनुभवून त्यांचे केलेले निरीक्षण, परीक्षण आणि त्यातून काढलेले निष्कर्ष  या पुस्तकाच्या पानापानात वाचकांची भेट घेत राहतात. संबंधित व्यक्तींबद्दल त्यांच्या आयुष्यातील अगदी काही मोजके अन् निवडक प्रसंग लेखकाने प्रातिनिधीक स्वरुपात मांडले आहेत. ज्यातून त्या व्यक्तींनी परिस्थितीसोबत केलेल्या संघर्षाची अन् त्यातून प्राप्त केलेल्या भव्यतेची प्रचिती वाचकांना येते. हे सगळं वर्णन, संघर्ष अन् भव्यता वाचकांना अंतर्मुख करायला लावणारी आहे. म्हणूनच या पुस्तकातील व्यक्तींसोबतच लेखकाबद्दलही वाचकांच्या मनात आदराचे स्थान केव्हा निर्माण होते, ते वाचकालासुद्धा कळत नाही.

राजकारण, समाजसेवा, कला, साहित्य, अध्यात्म अशा निरनिराळ्या क्षेत्रांत गौरवास्पद नावलौकिक प्राप्त झालेल्या व्यक्ती या पुस्तकात वाचकांच्या भेटीत येत राहतात. क्रांतीवीर अनंत भालेराव, गुणांचा सतत शोध घेणारे यदुनाथ थत्ते, आपल्या जवळच्या व्यक्तींना उंची वाढल्याचा भास देणारे नरहर कुरूंदकर, स्वत:च्या नावातच राम असणारे राम शेवाळकर, आपल्या समयसूचक नेतृत्वगुणाच्या बळावर राजकारण गाजविणारे प्रमोद महाजन, गझलेला मराठी चेहरा देणारे सुरेश भट या नामवंत अन् सर्वांना सुपरिचित व्यक्तींची संघर्षकथा, स्थायीभाव अन् त्यांच्या आयुष्यातील काही निवडक प्रसंग खरोखर वाचनीयच आहे. यांसह पुरातन वास्तू केवळ वर्णनाने जिवंत करणारे पंडित विष्णुदत्त शर्मा, ‘या देशाला आसामाविषयी काही का वाटत नाही’ असे निर्भयपणे म्हणणार्‍या सविता डेका अशा बर्‍याचश्या नामवंत मात्र फार थोडे माहित असलेल्या व्यक्तींचे चित्रणही वाचकांना त्या व्यक्तींच्या असामान्यत्वाचा साक्षात्कार देणारे आहे. अशा विविधांगी व्यक्तिमत्वाच्या 16 व्यक्तींचे निरीक्षण बारकाईने मांडले आहे. ठिकठिकाणी जागतिक तत्त्ववेत्यांचे संदर्भासह दिलेले विचार ंवाचकाला पुस्तकासमोर खिळवून ठेवून एका वेगळ्या विचारविश्वात घेऊन जाण्यास पुरेसे ठरतात. प्रकरणात समाविष्ट नसणार्‍या बर्‍याच थोर व्यक्तींच्या विचारसरणीचे वेगळ्या बाजूने केलेले चिंतन वाचकांना त्या व्यक्तींच्या भूमिकेबद्दल पुनर्विचार करण्यास भाग पाडणारेच आहेत. मात्र, बर्‍याच ठिकाणी लेखकाची त्या त्या व्यक्तींबद्दलची काही वैयक्तिक मतेही प्रदर्शित झाल्याचे आढळून येते. अर्थात् पुस्तकाच्या सुरुवातीसच लेखकाने हे कबूल करून तसे स्वातंत्र्य प्राप्त करून घेतले आहे.
प्रत्येक मराठी वाचकाने वाचून संग्रही ठेवावे आणि या निमित्ताने शक्य तेवढी उंची गाठण्याकरिता मनात पेटलेल्या प्रेरणेच्या ज्योतीला उद्दिपित्त करावे असे राष्ट्रकार्य लेखक आणि प्रकाशकांनी पुस्तकाच्या माध्यमातून केले आहे.

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...