12/17/2013

प्रिय बाबास...

का कोणास ठाऊक काल तुमचा थरथरणारा हात पाहिला अन् अंत:करण दाटून आलं. दाटून येणं काय असतं ते त्यावेळी मी प्रत्यक्ष अनुभवलं. तुमच्याबद्दलच्या माझ्या भावना व्यक्त व्हाव्यात म्हणून हे पत्र. बाबा, पूर्वी तुमच्या हातात माझा हात होता; तुमचा हात मला आधार देत होता, तोच तुमचा हात आज माझ्या हातात आहे. अन् माझा हात तुमच्या हाताला आधार देत आहे. चित्रपटातील प्रतिमा बदलाव्यात त्याप्रमाणे माणसाच्या आयुष्यातील काळ बदलतो, पण नातं तेच असतं.

आम्हाला एक चांगला ‘माणूस’ म्हणून घडविण्याकरिता बाबा तुम्ही किती कष्ट केलेत. मी आईच्या गर्भात असताना तुम्ही हॉस्पिटलच्या दारात अगदी अस्वस्थपणाने मारलेल्या फेर्‍या अन् केलेली काळजी मला उमगत होती. पण व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य त्यावेळी मला नव्हतं. म्हणूनच मी जन्मल्याचं ओरडून सांगण्याकरिता मी रडत होतो. माझ्या रडण्याच्या आवाजानं तुम्ही सुखावलात. त्यानंतर मात्र मी रडत असताना तुम्ही कधीही सुखावला नाहीत. नंतर तुम्ही मला कधीच रडू दिलं नाहीत. प्रसंगी मला हसलेलं पाहण्याकरिता आपण कितीतरी वेळा रडलात. तुमचं रडणं त्यावेळी मला ऐकू आलं नाही. मात्र, मी स्वत: बाप झाल्यावर ते मी स्वत:च अनुभवलं. त्यामुळे आपल्याबद्दलचा आदर अधिकच वाढला. पुढे मी जस-जसा मोठा होऊ लागलो. तसतसे तुम्ही मला बाहेरचं जग दाखवू लागलात. कधी फुलाफुलांच्या बागेत नेलेत, तर एकदा मुलामुलींच्या शाळेत नेऊन सोडलेत. बागेतील पानाफुलांवर, मुक्या प्राण्यांवर तर प्रेम करायला शिकविलेतच पण शाळेतील वर्गमित्रांवर, माणसामाणसांवर प्रेम करायला शिकविलेत. प्रसंगी मी चुकल्यावर मार दिलात, रागाने ओरडलात. मला त्यावेळी तुमचा राग यायचा. पण आज समजतं तेव्हा तुम्ही मारलं नसततं तर मी संस्कारांशिवायच ‘मेलो’च असतो.

बाप झाल्यावर किती कष्ट पडतात, हे शब्दात सांगण्यासारखं नाही. नवी जबाबदारी, नवा आनंद! एका मातीच्या निरागस गोळ्याचं संस्कारक्षम  व्यक्तीमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया खरोखरच अद्भूत आहे. प्रेम, कारूण्य अन् ममतेनं ओथंबून वाहणारं हृदय असल्याशिवाय हे शक्य नाही. आई तर मुलाच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावते. खरे तर वडिलांबद्दल आदराची भावना असावी हे  ही आईच शिकविते. कारण अजाणतेपणी सुरुवातीला बाळ बापाला एकेरी हाक मारते; त्याचवेळी आदरानं बोलण्याचं आई शिकविते. दादा, बाबा, तात्या, अण्णा, अप्पा आदी नावांनी हाक मारलेल्या बापाला कधी विसरून चालणार नाही. ती प्रेमानं मारलेली हाक मारतात. काही ठिकाणी तर बापाला ‘बाप’ म्हणण्याची देखील म्हणतात. पण त्या सार्‍या मागची भावना आदराचीच, अतीव प्रेमाची, आपुलकीचीच असते.

जेवढे प्रेम तुम्ही माझ्यावर केलेत, तेवढेच माझ्या ताईवरदेखिल केलेत. मुलगा-मुलगी असा भेदभाव आपण कधीही केला नाहीत. अशा स्वकृतीतून आपण आमच्यावर संस्कारांचा अभिषेक केलात. बाबा, आठवतं लहानपणी संध्याकाळच्या वेळी तुमच्या सायकलची घंटी वाजली की दारात येऊन उभा राहत होतो. अन् आज माझ्या गाडीची घंटा वाजली की तुम्ही गॅलरीत येऊन मजकडे पाहता. शाळेत असताना मला तुमचा मुलगा म्हणून ओळखायचे. तुम्ही मला सतत सांगितलतं की ‘तुझा बाप म्हणून मला लोकांनी ओळखलं पाहिजे.!’ आज लोक तुम्हाला माझे बाबा म्हणून ओळखतात, ते केवळ तुम्ही माझ्यावर केलेल्या प्रेरणेच्या संस्करणामुळे.

तुमच्या निवृत्तीच्या वेळी जेवढा पगार तुम्हाला होता. तेवढा माझा पहिला पगार होता. पण तुमचा पगार झाला की तुम्ही आणलेला खाऊ खातानाची मजा मी कितीही पगारात परत कधीच आणू शकणार नाही. बाबा, म्हणूनच मोठेपणीच्या स्वातंत्र्यापेक्षा मला बालपणीचे पारतंत्र्य अधिक आनंददायी वाटते. जन्मलेल्या प्रत्येकाला एक ना एक दिवस जगाच्या बापाकडे जाणं आवश्यक आहे. पण तुम्ही कोठेही असा माझे ‘बाबा’च असाल हे नि:संशय! युगानयुगागांपर्यंत हेच बाबा मला मिळावेत हीच प्रार्थना!

2 comments:

  1. छान लिहिलं आहे. बाबांनी वाचलं की नाही? अशा भावना त्या त्या व्यक्तिपर्यंत पोचणं महत्वाचं!

    ReplyDelete
  2. chan lihile ahe, saglya babana lagu padel asech ahe likhan

    ReplyDelete

Related Posts Plugin for WordPress, Blogger...