5/02/2016

हो, आम्ही सरकारी नोकरदार!


हो, आम्ही सरकारी नोकरदार!

सरकारी कार्यालय. सकाळचे 11 वाजून गेलेले. एका सरकारी कार्यालयात नागरिकांची गर्दी. "सर, झालं का माझं प्रमाणपत्र तयार?‘ एका तरुणाने एका कर्मचाऱ्याकडे विचारणा केली. कर्मचारी कामात व्यग्र होता. बराच वेळ पॉज घेऊन त्याने उत्तर दिले, "चार वाजता या!‘ नाराज होत तरुणानं म्हणाला, "पण तुम्ही मला 11 वाजता सांगितलं होतं!‘ आता कर्मचारी चिडला. खड्या आवाजात म्हणाला, "अहो, साहेब नाहीत सही करायला. तसचं देऊ का?‘ तरुणही पेटला, "अहो, पण...‘ त्याला मध्येच थांबवत कर्मचारी म्हणाला, "अहो, आम्हाला काय स्वप्नं पडलं का साहेब आज उशिरा येणार आहेत ते?‘ आता कार्यालयातील बहुतेक लोक या दोघांकडेच पाहत होते. तरुणाला ओशाळल्यागत झालं. मनातल्या मनात काहीतरी पुटपुटत, आजूबाजूला न पाहता तो थेट बाहेर पडला.


संध्याकाळचे साधारण 5 वाजून गेले. सकाळी सांगितल्याप्रमाणे तरुण पुन्हा आला. त्याच कर्मचाऱ्याच्या टेबलापुढे उभा राहिला. आता कार्यालय अगदीच रिकामं झालं होतं. बहुतेक कर्मचारी निघण्याच्या तयारीत होते. सकाळी खड्या आवाजात बोललेला कर्मचारी मागे एका कॅबिनमध्ये दोन-तीन सहकाऱ्यांसोबत चहा पीत होता. त्याने तरुणाला कॅबिनमध्ये येण्याचा इशारा केला. तरुण गेला. तिथे त्याला बसायला खुर्ची देऊन चहासुद्धा देण्यात आला. हे सारं दृश्‍य पाहून तरुण आश्‍चर्यचकित झाला. ज्याने सकाळी आपल्यावर राग काढला तो बसायला खुर्ची आणि चहा देतो, हा विचार त्याला बेचैन करू लागला. दरम्यान कॅबिनमधील इतर सहकारी निघून गेले होते. आता फक्त तो कर्मचारी आणि तो तरुण. तरुणाच्या चेहऱ्यावरील भाव जाणून कर्मचारी बोलू लागला, "अरे, बाबा एवढं आश्‍चर्य वाटून घेऊ नको. आम्ही पण माणसच आहोत.‘ "पण मग सकाळी...‘ त्यावर कर्मचारी बोलू लागला, "अरे सकाळी-सकाळी कामाचा ताण असतो. गर्दी असते. शिवाय साहेब नव्हते. त्यामुळे जरा तोल सुटला. तसं तुझ्यावर रागावून मला पण फार वाईट वाटलं. त्यामुळेच तुला आता आत बोलावलं.‘

आता तरुण जरा खुलला. "सर, पण तुमचे साहेब अचानक गायब कसे?‘ आता कर्मचारीही खुल्या मनाने बोलू लागला, "चल, आता तुला दोन-चार गोष्टी सांगतोच. अरे, सरकारी नोकरी म्हणजे लय ताण असतो. नेतेमंडळी कधीही येतात. काहीही काम करायला सांगतात. तशाच एका प्रकारात साहेब होते आज सकाळी.‘ तरुणाची उत्सुकता जागृत झाली. "आणखी बरेच ताण म्हणजे?‘ कर्मचारी आता अधिक विस्ताराने सांगू लागला, "हे बघ, सरकारी नोकरदाराची इमेज आता फार वाईट करण्यात आली आहे. भ्रष्टाचारी, कामचुकार वगैरे वगैरे. पण मुळात आम्ही माणसं आहोत रे. आमच्या रोजीरोटीची आम्हालाही चिंता आहेच. लोकांच्या समोर चांगलं बोलायला हवं हे आम्ही समजू शकतो. त्यात सुधारणा करण्याची गरज आहे. पण जबाबदाऱ्या अनेक आहेत. दिवसभर कॉम्प्युटरसमोर बसावं लागतं. शिवाय मध्ये-मध्ये ऑडिटर येतात. मग रात्र-रात्र ऑफिसातच. माणसांची मनं सांभाळण्यापेक्षा कागदपत्रे अधिक महत्वाची आहेत, असे संस्कारच होतात नकळतपणे सरकारी नोकरदारांवर. शिवाय आता माहिती अधिकार आला आहे. कोण कधी काय माहिती मागेल याचा नेम नाही. मग सगळी कामं सोडून ती माहिती वेळेत गोळा करावी लागते. त्यासाठी पुन्हा अतिरिक्त काम. मग नेहमीची कामं बाजूला. मग पुन्हा ताण. त्यातच एका जागी बसून स्थूलपणा वाढतो. त्यामुळे रोगांना आमंत्रण वगैरे वगैरे..‘

त्यानंतर काही वेळ शांतता पसरली. आता तरुणाने पुन्हा प्रश्‍न केला, "पण तुम्हाला नोकरीची खात्री असते. सहजासहजी कोणी तुम्हाला काढू शकत नाही आणि त्यामुळे कित्येक कर्मचाऱ्यांना कामाची फिकीर नसते.‘ त्यावर कर्मचारी बोलू लागला, "हे बघ नोकरीची खात्री होती. आता तशी नाही. कॉम्प्युटर शिकणं आम्हाला कंपलसरी केलं आहे. काही कार्यालयात तर कॉम्प्युटरमध्ये गती नसेल तर इन्क्रिमेंटही रोखण्यात आले आहे. अर्थात ती गरज आम्ही समजू शकतो. पण कामं वेळेत झाली नाहीत, अनावधनाने काही चुका झाल्या तर गडचिरोली, चंद्रपूर अशा दुर्गम भागात बदलीची भीती. आमच्यातील कित्येकजणांनी तर तिकडं बदली झाल्यामुळे राजीनामा दिला आहे. शिवाय सतत बदली. सतत साहेब बदलणार. सतत टेबल बदलणार. नवीन काम समजावून घ्यायचे. साहेबांच्या मर्जीत राहायचे. शिवाय नेते वगैरे. हे सगळं करावचं लागतं नाही तर प्रमोशन थांबण्याची भीती.‘

"पण मग तुमच्यापैकी बरेच लोकं कामचुकार असल्याचं म्हटलं जातं. त्याचं काय...?‘ तरुणाची जिज्ञासा चांगलीच जागृत झाली. "अरे बाबा, खाजगी क्षेत्रात पण कामचुकार लोकं आहेतच की. प्रत्येक ठिकाणी कामचुकार लोकं असतातच. इथं सरकारी किंवा खाजगी असा भेदभाव करता येत नाही. या प्रकाराला मानसिक प्रवृत्ती किंवा विकृती म्हणावे फार तर. नाही म्हणायला इतर क्षेत्रांपेक्षा सरकारी लोकांमध्ये हे प्रमाण कदाचित किंचित जास्त असेल. पण आता त्यामध्येही सुधारणा होत चालली आहे.‘

"आणि मग वरकमाईचं काय? खूप लोकं तर पेमेंटकडे पाहत नाहीत म्हणे!‘, तरुणानं नेमक्‍या वर्मावर बोट ठेवलं. कर्मचारी म्हणाला, "हे बघ, जरा बारकाईने पाहिलं तर भ्रष्टाचार किंवा वरकमाई सगळीकडेच असते. अर्थात पैसे खर्च करण्याचे अधिकार हातात आले, तर माणसाची बुद्धी फिरू शकते यात दुमत नाही. अर्थात ते चुकीचेच आहे. मात्र जे काही करायचं ते सगळं कायद्यात राहून आणि नियमात बसवूनच करावं लागतं. पण सरकारी नोकरीतील सगळीच लोकं तशी नसतात रे. यावर कोणी विश्‍वासच ठेवत नाही. एखाद-दुसऱ्यामुळे सगळे बदनाम होतात बघ‘ "पण मग हे सगळं नियमात बसून कसं काय करू शकतात ही सगळी मंडळी?‘ आता तरुण अधिक जाणून घेऊ लागला. त्यावर कर्मचारी स्पष्टीकरण देऊ लागला, "हे बघ आमच्याकडे पूर्वी बहुतेक कामे मॅन्युअल फाईल्समार्फत होत होती. आता जरा कॉम्प्युटरची पद्धत वेगळी आहे. त्यात फार कमी करप्शन होण्याची शक्‍यता आहे, बहुधा शून्य टक्केच. पण पूर्वी एखाद्या फाईलमधील एखाद्या नोटवर जर मान्य करावी लागणार रक्कम लिहिली असेल तर त्याखाली अंडरलाईन करून "अ‘ अशा अक्षराने त्या वाक्‍याचं महत्व अधोरेखित केलं जातं. त्यानंतर पैसे खाणारा एखादा व्यक्ती "अमान्य‘ असं लिहितो. आणि पुन्हा मान्य करण्यासाठी पैसे मिळाले की, "अ‘मान्य लिहून मान्यता मिळवून दिली जाते.‘ "अरे, बापरे! असं असतं का?‘, तरुणाला फार काही तरी जाणून घेतल्याचा प्रचंड आनंद झाला होता.

"जाऊ दे! खूप गोष्टी आहेत रे अजून सरकारी नोकरीत. पण गैरसमज करून घेऊ नकोस. मी अीाण माझ्यासारखी कित्येक कर्मचारी या साऱ्या गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असतात. त्याचा त्रास होऊ लागला की सकाळी तुला बोललो तसा प्रकार घडतो. एकदा काय झालं की आमच्या ऑफिसला मी एकटाच होतो. संध्याकाळी मीच ऑफिस बंद करू लागलो. तेवढ्यात एक माणूस त्याच्या लहान मुलाला घेऊन कोणतं तरी प्रमाणपत्र मागू लागला. प्रमाणपत्र तयार होतं. पण ऑफिसची वेळ संपली होती. ट्रॅफिकमध्ये अडकल्याने त्याला उशीर झाला होता. ते दोघं इतके धावत आले होते की त्यांना धाप लागली होती. "साहेब प्रमाणपत्र‘ म्हटल्यावर मी त्यांना सहज विचारलं, आधी काय घेणार? "पाणी की प्रमाणपत्र‘ त्यावर त्या माणसाच्या डोळ्यातून अक्षरश: पाणी आलं रे. माणसांची सेवा करण्याशिवाय दुसरं काही नसतं, हे आम्हाला कळतं रे. पण सर्वांनी समजून घ्यायला हवं. आमच्यापैकी कित्येक जण त्यांच्यातील क्रिएटिव्ह माईंड वापरून खूप काही वेगळे प्रयोग करत असतात. त्यामुळे मला अभिमान वाटतो "हो, मी सरकारी नोकरदार‘ असं म्हणायला. चल, तुझं प्रमाणपत्र देतो. जायची वेळ झाली आहे.‘ असं म्हणून दोघंही कॅबिनबाहेर पडले. आता तरुणाच्या मनातील सरकारी कर्मचाऱ्याबद्दलची प्रतिमा मात्र बरीच बदलली होती.

(Courtesy: www.esakal.com)

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...