6/20/2016

अल्लाह की मर्जी।

तो त्याच्या कुटुंबीयांसह एका मोठ्या शहरात राहात होता. त्याचं छोटं किराणा मालाचं दुकान होतं. त्याचं कुटुंब अगदी सर्वांशी मिळून मिसळून राहात होतं. परिस्थिती फार संपन्न नसली तरीही कुटुंब खाऊन-पिऊन सुखी होतं. घरात तो, त्याची बीबी, एक मुलगा आणि एक मुलगी, अम्मीजान असे सारे होते. वडील काही वर्षांपूर्वी अल्लाहला प्यारे झाले होते. वडील अतिशय प्रामाणिक आणि प्रतिष्ठेचं जीवन जगले होते. भुकेलेल्याला अन्न द्यावे, तहानलेल्याला पाणी द्यावे, "माणूस‘ म्हणून प्रत्येकाला शक्‍य ती मदत करावी, असे संस्कार वडिलांनी मुलावर केले होते. मुलगाही वडिलांप्रमाणेच होता. मुलाने आपल्या दोन बहिणींच्या निकाहची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली होती. त्यामुळे त्याच्यावर कर्ज होते. तरीही अल्लाहकडे जाण्यापूर्वी काही वर्षे आधी त्याने वडिलांच्या हज यात्रेची इच्छा पूर्ण केली होती. "बेटे की मदत से हज यात्रा पुरी हुई और हमारी जिंदगी सफल हुई‘, असे वडिल सर्वांना अभिमानाने सांगत. तसेच "जब पैसे इकठ्ठा होंगे, तब तुम जिंदगी में एक बार जरूर हज को जाना‘, असे त्यांनी मुलाला सांगितले होते. मुलानेही वडिलांचा वारसा पुढे सुरू ठेवून शेजाऱ्यांपासून ते दुकानातील कामगारापर्यंत सर्वांच्या मनात त्याने आदराचे स्थान मिळविले होते. मुलांवरही चांगले संस्कार करत होता. या साऱ्या घटनेला आता बरीच वर्षे झाली होती. रमजानला याच्या घरी सर्वांना निमंत्रण असे, तर गणेशोत्सव, नवरात्रीसारख्या समारंभात याचे सारे कुटुंबीय उत्साहाने सहभागी होत. त्याला आता वडिलांचा संदेश आठवत होता. हजच्या यात्रेला जावे, असे मनोमन वाटत होते. कर्ज हळूहळू फिटत होते. कर्जासह घरातला सारा खर्च भागवून गेल्या काही वर्षांपासून तो हजसाठी थोडी थोडी रक्कम बाजूला ठेवत होता. घरात उत्पन्नाचे दुसरे साधन नसल्याने तो हजसाठीचे पैसे कधी जमा होतील, असा विचार करत कधी कधी अस्वस्थ व्हायचा. मात्र "अल्लाह का बुलावा आना चाहिए बेटा‘, असे अम्मीजान त्याला सतत धीर द्यायची.

आता बरीचशी रक्कम जमा झाली होती. या वर्षी हजला जाता येईल, असे त्याला मनोमन वाटू लागले. एकेदिवशी सकाळी सकाळीच तो अर्जाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी निघाला होता. तेवढ्यात दुकानातील एक कामगार धावत धावत आला आणि दुकानातील दुसऱ्या एका कामगाराचा रात्री घरी जाताना मोठा अपघात झाल्याचे सांगितले. कोणताही विचार न करता हा धावत धावत रुग्णालयात त्याला भेटायला गेला. डोक्‍याला मार लागल्याने मोठी शस्त्रक्रिया करावी लागणार होती. त्यासाठी मोठा खर्च येणार होता. कामगाराकडे थोडे फार पैसे होते; पण ते पुरेसे नव्हते. त्याने कामगाराच्या घरच्या सर्वांना मोठा आधार देत कोणताही विचार न करता थेट हजसाठी जमा केलेले सगळे पैसे मदत म्हणून दिले. शस्त्रक्रिया यशस्वी झाली. कामगाराचे कुटुंबीय त्याच्या पाया पडू लागले. कामगाराला मदत केल्याने त्याच्या मनाला एक प्रकारची शांती मिळाली होती. या सर्व प्रकारात हजसाठी जमा केलेले सगळेच पैसे खर्च झाले.

त्यानंतर काही दिवसांनी कामगार कामावर आला, "आप मेरे लिए अल्लाह हैं। आपकी पाई-पाई चुका दूँगा‘, असे म्हणत त्याने चक्क पाय धरले. त्यावर "ये तो मेरी ड्युटी थी। जब तुम्हारे पास बहुत पैसे आएँगे, तब लौटा दे ना। क्‍या जल्दी है।‘ असे म्हणत त्याने त्याची समजूत काढली. घरी आल्यावर त्याने अम्मीजानला ही गोष्ट सांगितली. अम्मीजान म्हणाली, "बेटा, खुदा का बुलावा आना चाहिए और उस बंदे को तुमने जो मदत की है, वो भी कोई छोटी बात नहीं है। पैसे तो क्‍या फिरसे इकठ्ठा कर सकते हो।‘

त्याने पुन्हा पैसे गोळा करण्यास सुरुवात केली. आता निकाहचे कर्ज फिटल्याने पूर्वीपेक्षा लवकर रक्कम जमा झाली. एकदिवशी तो अर्जाच्या प्रक्रियेसाठी निघाला. त्या दिवशी मात्र त्याला काहीसे वेगळे वाटत होते. मागच्या वेळचा प्रसंग त्याला आठवला. तसे पुन्हा होणार नाही ना, अशी शंकाही मनात आली. तरीही चांगला विचार करत तो निघाला. खिशात पैसे होते, "यंदा हज अदा होणार‘ या आनंदात तो होता. जाताना मनात विचार येत होता. "पिछली बार अल्लाह की मर्जी के मुताबिक मैंने इन्सान की मदद की, फिर इस दुनिया में कितने लोग होंगे की जिनको पैसों की सक्त जरूरी होगी। शायद किसी की जान बच सकेगी, कोई पढ सकेगा, किसीके पेट की भूख मिट सकेगी, शायद किसी का निकाह हो सकेगा, इस बार तो मैं खुद की मर्जी से इन्सान की मदद कर सकता हूँ। शायद अब्बा की तरह मेरे भी नसीब में भी हज बेटे की मदद से होगी।‘ एवढा विचार करून तो प्रचंड अस्वस्थ झाला.

एका बाजूला अल्लाह आणि दुसऱ्या बाजूला इन्सान. त्याच्या मनाची प्रचंड घालमेल होत होती. अशा अवस्थेतच त्याने माघरी फिरण्याचा निर्णय घेतला. तो घरी आला. अब्बीजानला मनातला विचार बोलून दाखवला, "बेटा अल्लाह का बुलावा आना चाहिए। तुम्हे अगर दिलोजान से लगता है, कि तुमने जमा किए हुए पैसे से किसीको मदद करनी है, तो कर दो मदद! आखिरकार तुम्हारे मन में ऐसी बात आना ये भी खुदा की मर्जी होगी। और इन्सान की खिदमत भी अल्लाह के खिदमत से छोटी बात नहीं।‘ असे म्हणत तिने पोराला समजावले. त्यानेही जमवलेले पैसे गरजवंताला देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याने अम्मीजानला मिठी मारली आणि दोघांचेही डोळे भरून आले. तो मनातल्या मनात म्हणत होता, "शायद, अल्लाह ने हज इसी तरह पूरा कर लिया है।‘

(Courtesy: eSakal.com)

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...