Tuesday, May 14, 2019

ते स्वीकारूच नका! (बोधकथा)

एकदा गौतम बुद्ध आपल्या काही शिष्यांसह एका गावातून निघाले होते. गावातून जात असताना एक रागीट मनुष्य धावत धावत त्यांच्यासमोर आला. "तुम्ही तत्त्वज्ञानी नाहीत. तुम्ही विद्वान नाहीत. तुम्ही हा सारा बनाव करत आहात....', अशा शब्दांत तो बुद्धांवर टीका करू लागला.



स्वत:च्या तंद्रीत आणि रागाच्या भरात तो मनुष्य सलग 5-7 मिनिटे बरेच काही बरळत राहिला. त्याच्या तोंडातून काही शिव्याही गेल्या. दरम्यान बुद्धांच्या काही शिष्यांना हा प्रकार सहन झाला नाही. ते त्याच्या अंगावर धाऊन जाऊ लागले. मात्र बुद्धांनी त्यांना खुणेने शांत राहायला सांगितले. काही वेळाने तो टीका करणारा मनुष्य शांत झाला.

आतापर्यंत तो एकटाच बोलत होता. बुद्ध आणि त्यांचे शिष्य हा सारा प्रकार फक्त शांतपणे ऐकत होते. आपण एवढी टीका केली आणि त्यावर आपल्याला कोणीच काही म्हणत नाही हे पाहून तो मनुष्य जरा बावरला आणि इकडे तिकडे पाहू लागला. तो बुद्धांना म्हणाला, "मी तुम्हाला एवढं बोललो, शिव्या दिल्या. तुम्हाला राग नाही आला? तुम्ही शांत कसे?' त्यावर बुद्ध म्हणाले, "मला एक सांग तू एखाद्याला भेट देण्यासाठी भेटवस्तू खरेदी केली आणि ती भेटवस्तू एखाद्याने स्वीकारलीच नाही. तर ती वस्तू कोणाची असेल?' तो व्यक्ती म्हणाला, "अर्थातच. मी ती खरेदी केली असेल तर ती वस्तू माझीच असेल. पण त्याचा इथं काय संबंध?' बुद्ध शांतपणे स्मित हास्य करत म्हणाले, "वत्सा, तू दिलेल्या शिव्या आणि तू दिलेले वाईट शब्द आम्ही स्वीकारलेच नाहीत. त्यामुळे ते कोणाचे झाले?' त्यावर त्या व्यक्तीला आपली चूक उमगली आणि त्याने बुद्धांना साष्टांग नमस्कार केला. तेव्हापासून तो व्यक्ती बुद्धांचा शिष्य बनला. बुद्ध म्हणाले, "आयुष्यात बऱ्याच गोष्टी नाकारणे शक्‍य असतानाही आपण नको त्या गोष्टी स्वीकारतो त्यामुळे आपण बऱ्याचदा संकटात सापडतो. त्यामुळे चराचरातल्या ज्या ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्याच स्वीकारा आणि आनंदी, उत्साही, शांत राहा.'

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...