11/06/2013

ग्रामविकासात संतांची भूमिका

ग्रामविकासात संतांची भूमिका



आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर लोकजागर या कार्यक्रमात ‘ग्रामविकासात संतांची भूमिका’ या विषयावर पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीच्या माध्यम व प्रकाशन केंद्रातील व्यंकटेश कल्याणकर यांचे प्रसारित झालेले भाषणातील संपादित भाग.

राम राम गावकरी मंडळींनो,

चांगलीच थंडी सुटली आहे ना! तुम्ही दिवसभर शेतातून थकून भागून आला आहात. शेतातील काळ्या आईकडे तुम्ही नेहमीच चांगलं धान उगवण्याची विनंती करीत असता. ते धान म्हणजेच तुमचं वैभव असतं. त्यातून तुम्ही स्वत:चा विकास साधता. तुमच्या गावातील प्रत्येक घरातील प्रत्येकाचा असा विकास म्हणजेच तुमच्या गावाचा विकास. एका एका गावाने मिळून देश बनतो. म्हणजेच तुमच्या गावाचा विकास पर्यायाने आपल्या देशाचा विकासच असतो.

आता, तुमचा विकास साधण्याचा मार्ग कितीतरी शतकांपासून संतपदाला पोचलेले व्यक्ति सांगत आली आहेत. चला, तर मग संत मंडळींनी तुमच्या म्हणजेच तुमच्या गावाच्या विकासाच्या बाबतीत काय काय सांगितले आहे याची माहिती आज आपण घेऊ.





‘ऐसा चैतन्याचा मेरू,
अवघ्या प्रसन्नतेचा तरू।
जैसा भास्कर या नभी शोभतो,
करू या तेजाची आरती ।
घेऊनिया हाती ज्योती॥

संत म्हणजे चैतन्याचा पर्वत असतात. संत म्हणजे प्रसन्नतेचे झाड असतात. त्यांचे जीवन, उद्दिष्ट आणि ध्येय हे आकाशातील सूर्याएवढे शुभ्र आणि स्वच्छ असते. अशा या तेजाची आपण हातामध्ये ज्योती घेऊन आरती करत असतो.

जिच्या स्वरूपात बदल होत नाही आणि जिचा अभाव कोणत्याही काळी सिद्ध होत नाही अशी जी चैतन्य वस्तू, तिलाच संत असे म्हणतात. देह आणि अहंकाराशी लढून, त्याचा निःपात करून, कार्यकारण उपाधीवर विजय मिळवून जो आत्मरूप बनला आहे, त्याला मिळणारी एक महान पदवी म्हणजे संतत्व होय. श्रुतिसंपन्नता आणि ब्रह्मनिष्ठता याबरोबरच कृपाळूपणा हा संतांचा महत्त्वाचा गुण. श्रुतिसंपन्नतेने ब्रह्मनिष्ठ झालेले संत सतत कृपेचा वर्षाव करतात.

संतपरंपरेत निरनिराळ्या शैली, रचना आणि पद्धतींवरून साधारणपणे नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय, लिंगायत संप्रदाय, महानुभाव पंथ असे प्रकार करता येतात. संप्रदाय जरी निराळे असले तरी सर्व संतमंडळींनी परमवैभवाचे मार्ग प्रसृत केले आहेत.

संत परंपरेत अगदी अलिकडच्या काळात होऊन गेलेल्या माणिक बंडोजी इंगळे अर्थात संत तुकडोजी महाराज यांनी अंधश्रद्धा आणि जातिभेद निर्मूलनासोबतच ग्रामविकासाच्या बाबतीत मोठे कार्य केले आहे.

संत व्यक्ती केवळ अध्यात्म मार्गाचा अंगिकार जनमानसांमध्ये रूजवित नाहीत; तर सामान्य माणसाला आदर्श जीवनक्रम अगदी सोप्या आणि साध्या समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. संत तुकडोजी महाराजांनी लिहिलेली ग्रामगीता हेच सिद्ध करते. खेडेगाव स्वयंपूर्ण कसं होईल, याविषयीची त्यांनी उपाययोजना सुचविली, ती अतिशय परिणामकारक ठरली. ग्राम हे सुशिक्षित व्हावं, सुसंस्कृत व्हावं, ग्रामोद्योग संपन्न व्हावं, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळावं, प्रचारकांच्या रूपानं गावाला नेतृत्व मिळावं, अशीही त्यांची निष्ठा होती. तिचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटलं आहे. देवभोळेपणा, अंधश्रद्धा जुनाट कालबाह्य रूपी नाहीशा व्हाव्यात, याविषयी त्यांनी अविरत प्रयत्न केले.

एकूण 41 अध्यायांच्या ग्रामगीतेतील बाराव्या अध्यायातील 47 आणि 48 व्या ओव्यांत तुकडोजी महाराज म्हणतात,

मी समजतो गावहि शरीर। त्यास राखावे नेहमी पवित्र। 
त्यानेच नांदेल सर्वत्र आनंद गावी॥
जैसे आपण स्नान करावे। 
तैसे गांवहि स्वच्छ ठेवीत जावे। 
सर्वचि लोकांनी झिजूनि घ्यावे। 
श्रेय गावाच्या उन्नतीचे॥

साध्या, स्पष्ट आणि सोप्या भाषेत गावाच्या विकासाचा मंत्र तुकडोजी महाराजांनी लिहिला आहे. ग्रामगीतेत सांगितलेल्या गावातील आचरणाचे नियम अत्यंत व्यवहार्य असेच आहेत.

महिलोन्नती हाही तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचा एक लक्षणीय पैलू. कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते, हे त्यांनी आपल्या किर्तनांद्वारे समाजाला पटवून दिलं. त्यामुळं स्त्रीला अज्ञानात व दास्यात ठेवणं कसं अन्यायकारक आहे, हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिलं.

देशातले तरूण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ. ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचं व राष्ट्राचं संरक्षण करू शकतील. ते नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील, याविषयीचं उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन त्यांनी केलं. व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध तुकडोजी महाराजांनी आपल्या लेखनातून केला.

संत तुकाराम

सतराव्या शतकात वारकरी संप्रदायात तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे) नावाचे संत होऊन गेले. पुढे ते संत तुकाराम नावाने जनमानासत लोकप्रिय झाले. आज ते ‘जगद्गुरु’ नावानेही ओळखले जातात. तुकाराम महाराज हे साक्षात्कारी, निर्भीड व एका अर्थाने बंडखोर संत कवी होते. तत्कालिन व्यवस्थेत विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. त्यातून वाचनाचा, पठनाचा, पारायणांचा आणि पर्यायाने आदर्श आचरणाचा मार्ग त्यांनी सामान्याना दाखवून दिला.

संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. तसेच त्यांचे अभंग ग्रामीण भागात तेवढेच लोकप्रिय आहेत.

वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे। पक्षीही सुस्वरे आळविती॥

अशा शब्दांमध्ये संत तुकाराम महाराजांनी अखिल मानवाचं निसर्गाशी नातं जोडून निसर्गाची जवळीक साधण्याचा अनमोल संदेश दिला आहे. तुकामारांचे अभंग, आजही अभंग आहेत. ज्याप्रकारे पंढरपूरचा विठ्ठल आपणांस युगान्युगांपासून आशीर्वाद देण्यासाठी उभा आहे. त्याप्रमाणेच तुकारामांचे अभंगही युगान्युगांपर्यंत अमृतज्ञान देत राहील.

संत तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या गाथेमध्ये व्यक्तीच्या शुद्ध आचरणाबाबतचे नियम व्यावहारिक उदाहरणे देऊन  अगदी स्पष्टपणाने ओवीबद्ध केलेले आहेत.

धन्य तो ग्राम जेथें हरिदास। 
धन्य तो चि वास भाग्य तया।
ब्रह्मज्ञान तेथें असे घरोघरी। 
धन्य त्या नरनारी चतुर्भुज।
नाही पापा रिझ काळाचे जीवन। 
हरिनामकीर्तन घरोघरीं।
तुका म्हणे तिहीं तारिलें सकळां। 
आपल्या कोटिकुळासहित जीव।

या अभंगातून नामसंकीर्तनाचा मार्ग अंगिकारणार्‍या गावाच्या उद्धाराविषयी तुकोबांनी भाष्य केले आहे. तुकोबांनी ‘उजाळाया आलो वाटा’ या शब्दांत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘जोडोनिया धन उत्तम वेव्हारे। उदार विचारे वेच करी।’ असा त्यांचा संदेश आहे. ‘जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले। तोचि साधु ओळखावा। देव तेथेचि जाणावा॥ असा उदात्त विचार त्यांनी मांडला. ‘सकळासि येथे आहे अधिकार।’ असे व्यापक आवाहन त्यांनी केले आहे. ‘विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ। असे सांगून तुकोबांनी आपण एक आहोत हा वैश्विक विचार मांडला आहे.

संत रामदास

सोळाव्या शतकातील संत रामदास यांनी मानवी जीवनाच्या व्यवस्थापनाविषयी मांडलेल्या विचारांवर देशातच नव्हे तर अवघ्या विश्वात अभ्यास सुरु असतो. मनाचे श्लोक, दासबोध यांसारख्या साहित्यातून त्यांनी आदर्श आचरणाचे नियम समजावून सांगितले. संत पदाला पोचलेले व्यक्ती सतत निरनिराळ्या गोष्टीतील सत्व शोधीत असतात. पुढे त्या सत्वाच्या मागचे तत्व आणि पुन्हा त्या तत्वाच्या मागील सत्वाचा शोध घेत असतात. एवढे करुनही या मंडळींकडे  हे सारं साध्या, सोप्या आणि स्पष्ट भाषेत मांडण्याचं सामर्थ्य असतं.

समर्थांच्या काळात परकीय आक्रमणांनी गोंधळ माजविल होता. गावेच्या गावे उध्वस्त केली जात होती. जनसामान्यांना अध्यात्मापासून जाणूनबुजून दूर ठेवण्यात येत होते. अशावेळी गावे पुन्हा नव्या उमेदीनं उभी रहावीत. गावांमध्ये एकता नांदावी, गावकर्‍यांनी संघटित होऊन परकीय आक्रमकांविरुध्द लढा द्यावा यासाठी समर्थांनी गावोगावी बलोपासनेचा दैवत, शक्तीचे प्रेरणास्थान म्हणून मारुतीच्या देवळांची स्थापना करण्यास सुरुवात केली. त्यातून संघटनशक्ती विकास करून त्यातून गावांना वैभव प्राप्त करून देण्यासाठी ते अखंड प्रयत्नशील राहिले.

समर्थांच्या अध्यात्मनिष्ठेला प्रयत्नवादाची जोड होती. ‘केल्याने होत आहे रे। आधि केलेचि पाहिजे।’ हरिकथा-निरूपणाच्या पाठोपाठ राजकारण, सावधपण व साक्षेप यांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केलं आहे. भगवंतांचे अधिष्ठान असेल, तर चळवळीचे सामर्थ्य फलदायी ठरते असा दिलासा समर्थांनी दिला आहे. आनंदवनभुवनाचे भव्य स्वप्न त्यांनी रेखाटले आहे. समर्थांचा दासबोध म्हणजे संघटनशास्त्र व अध्यात्मशास्त्र यांच्या अद्भूत रसायनातून सिद्ध झालेला अपूर्व ग्रंथराज आहे.

मना पापसंकल्प सोडूनि द्यावा।
मना सत्यसंकल्प जीवीं धरावा॥
मना कल्पना ते नको वीषयांची।
विकारे घडे हो जनी सर्व ची ची ॥

नको रे मना क्रोध हा खेदकारी।
नको रे मना काम नाना विकारी॥
नको रे मना सर्वदा अंगिकारू।
नको रे मना मत्सरु दंभ भारु ॥

अशा ‘मनाच्या श्लोका’ंमधून रामदासांनी अगदी सोप्या भाषेत आपल्या स्वत:च्या मनावर संस्करण करण्याचा मंत्र सांगितला आहे.

संत ज्ञानेश्वर

बाराव्या शतकात संत ज्ञानेश्वर होऊन गेले. संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव हे त्यांचे बंधु तर संत मुक्ताबाई या त्यांच्या भगिनी. या भावंडांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती वाट्याला आली असतांनाही अल्प वयात महान कार्य केलं. या भावंडांचं  अवघं आयुष्य समस्त मानवजातीला प्रेरणेचा झरा बनून राहिलं आहे. आपल्या ठायीच्या सामर्थ्यावर अचेतनाला चेतना देता येऊ शकते, परिस्थितीसमोर न झुकता परिस्थितीला आपल्यासमोर झुकवता येऊ शकतं, हे या भावंडांनी सिद्ध करून दाखविलं.

ज्ञानदेवांनी अल्प वयातच गीतेवर प्रख्यात टीका लिहिली. या ग्रंथास ‘ज्ञानेश्वरी’ अथवा ‘भावार्थदीपिका’ असे म्हणतात. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ज्ञान श्री संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले. त्यांचा दुसरा ग्रंथ ‘अमृतानुभव’ किंवा ‘अनुभवामृत’ होय. हा विशुद्ध तत्त्वज्ञानाचा जीव-ब्रह्म ऐक्याचा ग्रंथ आहे. त्यात एकूण 800 ओव्या आणि दहा प्रकरणे आहेत. चांगदेव पासष्टी या ग्रंथाद्वारे त्यांनी चांगदेव या महान योग्याचे गर्वहरण करून त्यांना उपदेश केला. हा ग्रंथ ‘चांगदेव पासष्टी’ या नावाने लोकप्रिय आहे.

‘अवघे विश्वचि माझे घर।’ अशा महान विचारातून त्यांनी सर्व विश्व हे माझं घर आहे असा ‘एकते’चा विचार मांडला. असा विचार रूढ झाला की त्यातून विकास होणारच.

ज्ञानदेवांनी धर्मातील क्लिष्ट अवडंबरे काढून धर्माला कर्तव्याचा वेगळा अर्थ दिला. वाङ्मय निर्मितीबरोबरच त्यांनी आध्यात्मिक लोकशाहीचे बीज रोवण्याचा यशस्वी प्रयत्न चंद्रभागेच्या वाळवंटात केला. भागवत धर्माचा तथा वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे अभूतपूर्व कार्य त्यांनी केले. संत नामदेव, संत गोरोबा कुंभार, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, संत चोखामेळा या समकालीन संत प्रभावळीचे अनौपचारीक नेतृत्व करत, संत ज्ञानेश्वरांनी अध्यात्माच्या क्षेत्रात समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्यातून स्वत:चा आणि पर्यायाने गावाचा विकास साधण्याचा उदात्त विचार त्यांनी मांडला.

संत नामदेव

भक्तशिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानदेवांच्या कालखंडात होऊन गेले. नामवेदाचे व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील हे एक थोर संत होत. आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारा असा त्यांचा बहिश्चर प्राण होता. पंढरीच्या भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले. संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी भावनिक एकात्मता साधली. त्यातून विकास साधण्याचा मार्ग त्यांनी दाखवून दिला.

टाळ मृदंगाचा आवाज, ‘ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम।’, ‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठल’ असा मोठ्या उत्साहात जयघोष वारकरी कीर्तनात आढळून येतो. रंजनाची साधने उपलब्ध नसताना रंजनातून प्रबोधन करण्याचा प्रभावी मार्ग वारकरी कीर्तनाने दाखवून दिला. या वारकरी कीर्तनाची आजतागायत चालत आलेली परंपरा संत नामदेवांनी सुरु केली असा उल्लेख आढळतो. यादवकाळात होऊन गेलेल्या नामदेवांनी यादवकालीन मराठी बोलीभाषेत त्यांनी लेखन केलं. ग्रामस्थांच्या विकासाचा मार्ग त्यांच्याच भाषेत रंजक पद्धतीने सादर केला.

अठराव्या शतकात ‘गोपाला गोपाला देव की नंदन गोपाला’ असे म्हणत संत गाडगेबाबांनी दशसूत्री सांगितली आहे. भुकेलेल्यांना = अन्न, तहानलेल्यांना = पाणी, उघड्यानागड्यांना = वस्त्र, गरीब मुलामुलींना = शिक्षणासाठी मदत, बेघरांना = आसरा, अंध,पंगु,रोग् यांना = औषधोपचार, बेकारांना = रोजगार, पशु,पक्षी,मुक्या प्राण्यांना = अभय, गरीब तरुण-तरुणींचे =लग्न, दु:खी व निराशांना = हिंमत अशी साधी सोपी आणि विकासाची सूत्री गाडगेबाबांनी सांगितली आहे.

भक्तिपंथाचा मार्गाचा स्वत:चा आणि पर्यायाने आपल्या गावाचा विकास साधण्याचा मार्ग पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांनीही दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. संत मुक्ताई, संत जनाबाई, संत सोयराबाई, संत बहिणाबाई व संत वेणाबाई यांचे अभंगकाव्य समतेची साक्ष देणारे आहेत. तेराव्या शतकात संत जनाबाईंनी ‘दळिता कांडिता तुज गाईन अनंता’ अशा स्त्रीच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित कामांचा धागा अभंगांशी जोडला. आणि त्यातून विकास साधण्याचा मार्ग दाखविला.

गावकरी मंडळींनो, संत एकनाथ, संत चोखामेळा, संत निळोबा, संत पुंडलिक, संत सावतामाळी, संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई, संत भगवानबाबा, संत बसवेश्वर, संत मोरया गोसावी, संत दासगणू महाराज यांसह सकलसंतांनी स्वत:साठी कधीही काहीही मागितले नाही. ‘जो जे वांछिल तो ते लाहो’  म्हणजेच जो जे मागील त्याला ते ते द्यावे असे म्हटले आहे.

मग प्रत्येकाने आपल्यातील सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून, ईश्वरावर विश्वास ठेऊन, अखंडपणाने आपले कार्य नैतिक मार्गाने करीत जावे असा थोर विचार मांडला आहे. तेव्हा चला, त्यांच्या विचारांचा अंगिकार करून आपला आणि पर्यायाने आपल्या गावाचा विकास साधूयात.

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...