3/24/2015

'तो' नसल्याची खंत...

त्यानं थोरलीला संसार थाटून दिला. कमीत कमी खर्चात कसंबसं लग्न पार पाडलं. माणसं चांगली शिकली सवरलेली होती. समजून घेणारी होती. तरीही लग्नात मुलाकडील मंडळींनी किरकोळ कुरबुरी चालू होत्याच. जगाची रित म्हणून त्याला काही वाटलं नाही. पण माणसं सांभाळून घेतील असे वाटले. उलट मनात कृतार्थतेचा आनंद पसरला. पण इतक्‍यात समाधानी होऊन चालणार नव्हतं. दुसरी मुलगीही लग्नाला आली होती. वर्षभरातच तिलाही संसार थाटून द्यायचा होता. शिवाय शिल्लक काहीच नव्हतं. पहिलीच्या लग्नाचं कर्ज फेडण्यातच आणखी काही वर्षे जाणार होती. तरीही काहीतरी तजवीज करून लग्न करणं आवश्‍यक होतं. त्यानंतर साऱ्या जबाबदाऱ्यातून तो मुक्त होणार होता. तरीही मुलगा नसल्याची त्यानं कधी खंत केली नाही.  
 
पाहता पाहता वर्ष लोटलं. अजून दुसरीच्या स्थळाचा शोध संपला नव्हता. एक-दोन वेळा योग आला होता. पण मागण्या पूर्ण करता येत नव्हत्या. शिवाय खर्चाचा अंदाज घेतल्यानंतर काहीतरी तजवीत करायची होती. दरम्यान पहिलीचे सणवार करताना आणखी कर्ज झालं होतं. उत्पन्न मात्र तेवढंच. खर्चाच्या आणि उत्पन्नाच्या आकड्याची दोन दोन महिने भेट होत नव्हती. त्यांच्या भेटीसाठी त्यानं आणखी एक अर्धवेळ नोकरी पत्करली होती. जास्तीचे श्रम शरीराला झेपत नव्हते. पण परिस्थितीच त्याला बळ देत होती. त्यामुळे संसाराची गाडी पुढे जात होती. दोन्ही मुलींचे हट्ट त्याला पुरविता आले नव्हते. पण बापाचे प्रेम त्याने भरभरून पुरविले होते. त्याने हट्टापेक्षा प्रेमाला अधिक उंच नेले होते. भावाची कमतरताही त्याने कधी जाणवू दिली नाही. त्यामुळे मुलीही संस्कारक्षम बनल्या होत्या. त्यांना बापाची आदरयुक्त भीती वाटत होती. 

एके दिवशी अचानक थोरलीच्या सासऱ्याचा फोन आला. भेटायला या म्हणाले. दोन्ही नोकरीला सुट्या, भाड्याला पैसे सारच अवघड होतं. पण त्यानं सारचं सोपं केलं अन्‌ भेटायला गेला. सासरकडील मंडळींनी चांगलं स्वागत केलं. जेवण वगैरे झालं. थोरलीचा संसार पाहून तो भारावून गेला. व्याही बोलू लागले, "अहो, तुम्ही आता आजोबा होणार आहात. आम्हाला नातू दिसणार आहे. चार महिन्यांनी न्या. हीच गोड बातमी सांगायला तुम्हाला बोलावलं. पण सुनबाईला काही आताच न्यायची गरज नाही.' बापाच्या मनाला आनंदाचं उधाण आलं. तो सगळं विसरून गेला. मात्र काही वेळातच त्याची समाधी भंग पावली. मुलीच्या सासरी येण्यासाठी केलेली उसनवारी, धाकटीचं लग्न, मासिक खर्च आणि उत्पन्नाची भेट, शिवाय थोरलीच्या बाळंतपणासाठी येणारा खर्च हे सगळं चित्र त्याच्यासमोर नाचू लागलं. तशातही त्यानं सावरत सर्वांना शुभेच्छा देत, शुभेच्छा स्वीकारत घराचा रस्ता धरला. जाताना प्रथमच त्याला दोन मुलीच असल्याची अन्‌ एकही "मुलगा' नसल्याची खंत जाणवू लागली...

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...