अंजनीपूर नावाचे एक गाव होते. त्या गावात एक हुशार मुलगी राहत होती. ती अभ्यासात खूप हुशार होती. गाणंही छान म्हणायची. शाळेतील सगळ्या उपक्रमांत ती उत्साहाने सहभाग घ्यायची आणि हो, दररोज आई-बाबांचे आशीर्वाद घेऊन शाळेत जायची. शाळेतील सर्व शिक्षकांची ती लाडकी विद्यार्थिनी होती. ती आई-बाबांकडे कोणत्याही गोष्टीचा हट्ट करत नसे. तिला सगळ्या प्रकारच्या भाज्या आवडत होत्या. ती दररोज पोळी-भाजी, भात-आमटी, कोंशिबीर खात असे. ती आईला घर आवरण्यासाठी मदतही करायची.
शाळेतील विद्यार्थ्यांनाही ती मदत करत होती. गावकऱ्यांचीही ती लाडकी मुलगी होती. तिला गाण्यामध्ये खूप बक्षिसेही मिळाली होती. ती कायम हसतमुख असायची. बाबांकडून ती दररोजच्या वृत्तपत्रातील बातम्या माहिती करून घेत असे. शाळेतील गृहपाठही ती वेळेत पूर्ण करायची. ती लवकर झोपायची आणि लवकर उठायची. एके दिवशी तिने "आनंदाश्रू‘ हा शब्द ऐकला आणि आईला त्याचा अर्थ विचारला. त्यावर आई म्हणाली, "आनंदात असल्यावर डोळ्यातून येणाऱ्या पाण्याला "आनंदाश्रू‘ म्हणतात.‘ त्यावर तिचे समाधान झाले नाही. "आई, डोळ्यातून पाणी येणे म्हणजे रडणे. आनंदात असल्यावर रडू कशाला येईल.‘ त्यावर "तुला अनुभव आल्यावर समजेल‘ असे म्हणत आईने तिला समजावले.
अंजनीपूरमध्ये केवळ चौथ्या इयत्तेपर्यंतच शाळा होती. पुढील शिक्षणासाठी जवळच असलेल्या अर्धापूर गावाला जावे लागत. शाळेत जाण्यासाठी मुलींना बसचा मोफत पास मिळायचा. तसाच पास तिलाही मिळाला होता. दररोज गावातील सर्व मुली एकत्र बसमधून शाळेत जात. त्यांच्यासोबतच ती देखिल जात होती. एकदा तिला मामाच्या मुलाच्या वाढदिवसासाठी जायचे होते. मामाचे गाव अर्धापूरजवळच होते. अर्धापूरला मामा तिला घेण्यासाठी येणार होता. त्यादिवशी शाळा होती. तिने मैत्रिणीजवळ शिक्षकांसाठी शाळेत येणार नसल्याबाबतची चिठ्ठी दिली. ती शाळेच्या वेळेत असलेल्या बसनेच अर्धापूरला जाणार होती. आईने तिच्याकडे काही पैसेही दिले. तिला शाळा बुडवून मामाकडे जाणे बरे वाटले नाही; पण आई-बाबांनी सांगितल्यामुळे ती निघाली होती. बसमध्ये बसल्यावर पास दाखविण्याऐवजी कंडक्टर काकांना तिने तिकिटासाठी पैसे दिले. तिच्याकडे पास असल्याचे माहीत असल्याने कंडक्टरकाका म्हणाले, "तुझ्याकडे पास आहे ना. मग तिकीट का काढतेस?‘ त्यावर ती म्हणाली, "काका माझा पास केवळ शाळेत जाण्यासाठी आहे; मामाकडे जाण्यासाठी नाही. आज मी शाळेत जाणार नाही. त्यामुळे मी तिकिटासाठी पैसे आणले आहेत. हे पैसे घ्या आणि मला तिकीट द्या.‘‘ त्यावर कंडक्टर काकांनी "शाब्बास, शाब्बास!‘ म्हणत तिला तिकीट दिले. बसमधील मैत्रिणी हे सारे पाहत होत्या. त्यांनी शाळेत जाऊन शिक्षकांना ही गोष्ट सांगितली. शिक्षकांनाही तिचे कौतुक वाटले.
दुसरा दिवस उजाडला. मामानेही तिला शाळेत आणून सोडले. प्रार्थनेच्या वेळी मुख्याध्यापकांनी तिची बसमधील गोष्ट सर्व विद्यार्थ्यांना सांगितली आणि बोधकथेचे एक पुस्तक देऊन तिचा सत्कार केला. मुख्याध्यापक म्हणाले, ‘ही एक आदर्श मुलगी आहे. तिने बसचा पास फक्त शाळेसाठीच वापरला. मामाच्या गावी जाण्यासाठी वापरला नाही. मुलांनो, तुम्ही तिचा आदर्श घ्यायला हवा. तो तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडेल. उद्या तुम्ही मोठे व्हाल. अधिकारी व्हाल. कार्यालयाच्या कामासाठी तुम्हाला अनेक सोयीसुविधा मिळतील. त्या वेळी तुम्हीदेखील तिच्याप्रमाणेच आपल्या अधिकारातील गोष्टींचा खासगी कामासाठी वापर करू नका. आपल्या अधिकारातील कोणत्याही सार्वजनिक सुविधेचा स्वत:च्या खासगी कामासाठी वापर करणे स्वत:साठी आणि देशासाठीही अयोग्य आहे.‘
अंजनीपूरमधील गावकऱ्यांनाही आर्याची गोष्ट समजली. त्यांनीही ती गावात आल्यावर तिचे आणि आई बाबांचे कौतुक करून तिचा सत्कार केला. सत्कार कार्यक्रम झाल्यावर तिच्या डोळ्यांतून पाणी आले. त्या वेळी तिची आई तिला म्हणाली, "तुझ्या डोळ्यांतून जे पाणी येत आहे ना त्याला "आनंदाश्रू‘ म्हणतात.‘ हे ऐकल्यावर आनंदात ती आईच्या कुशीत शिरली.
व्यंकटेश कल्याणकर
(सौजन्य : esakal.com)
0 comments:
Post a Comment