12/06/2016

'...म्हणून जग टिकून आहे आज'

‘आई मला शाळेचं नवीन दप्तर आणायचं हाय‘, ती काही दिवसांपासून हट्ट करत होती. "घीऊ लवकर‘ असं म्हणत तिने रोजच्याप्रमाणे मुलीचे समाधान केले. तिचा नवरा भाड्याची रिक्षा चालवत होता. तर ती आजूबाजूच्या काही घरात धुणं-भांडे करत हातभार लावत होती. दोघांचे उत्पन्न मिळून कसाबसा संसार पुढे जात होता.

एका इमारतीतील सहाव्या मजल्यावरील घरातील कामवाली गेल्या काही दिवसांपासून येत नव्हती. कामवालीशी संपर्कही होत नव्हता. त्यामुळे तिच्याकडे विचारणा झाली. काम देणारे कुटुंब सधन होते. त्यामुळे मोबदलाही चांगला मिळणार होता. नवे काम मिळाल्याने चिमुकलीला भारीचे दप्तर घेता येणार होते. शिवाय काही बचतही शक्‍य होणार होती. त्यामुळे तिने अगदी आनंदाने काम करण्यास होकार दिला. दुसऱ्याच दिवसापासून व्यवहाराच्या गोष्टी झाल्यावर ती कामावर रूजू झाली. दोन दिवस छान काम चालले. दरम्यान तिने चिमुकलीला आश्‍वासन दिले "येणाऱ्या पगारात तुला नवं कोरं दप्तर घ्यायचं‘! नेमकेपणाने उत्तर मिळाल्याने चिमुकलीही महिना संपण्याच्या प्रतिक्षेत होती.

नेहमीप्रमाणे तिसऱ्या दिवशी ती कामाला निघाली. सहाव्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टमध्ये बसली. सोबत आणखी दोन महिला लिफ्टमध्ये आल्या. त्या दोन महिलांचा संवाद सुरू झाला. "अगं धीर सोडू नगं. मी सांगत्ये मॅडमला. त्या लई चांगल्या हायेत‘, एक महिला बोलली. त्यावर दुसरी महिला म्हणाली, "अगं खरंय! पर आता ह्या सहाव्या मजल्यावरील मॅडमनीबी नवी बाई ठेवली असल तर कामाला. कसं काय होईल काय माहित? इन-मीन चार घरात कामं करत होती. कसंबसं चाललं होतं. मध्येच ह्यो दवाखाना माझ्यामागं लागला अन समदी कामं गेली. अन कळवलंबी नाय गं म्या‘, असं म्हणत त्या महिलेला डोळ्यातील अश्रू अनावर झाले. तोपर्यंत सहावा मजला आला. तिघीजणी एकाच घरात आल्या.

घरातील मॅडमनी दार उघडले. समोर तिघी उभ्या. आधीच्या आणि नव्या कामवालीला एकत्र पाहून मॅडमला आश्‍चर्य वाटले. त्यांना काय करावे काहीच समजेना. त्यांनी सगळ्यांना आत घेतलं. पहिल्या कामवालीला मॅडम म्हणाल्या, ‘काय गं तुझा पत्ताच नाही. काही कळवायचं तरी किमान. तुझी वाट बघून शेवटी मी हिला ठेवलं कामावर‘, मॅडमनी खुलासा केला. त्यावर पहिल्या कामवालीला फारच वाईट वाटलं. तिला काय बोलावे तेच समजेना. तिच्या डोळ्यांच्या कडा पुन्हा ओल्या झाल्या. ही सारी अवस्था पाहून नव्याने कामाला रूजू झालेली ती बोलू लागली, "मॅडम ह्या पहिल्या बाईलाच ठेवा कामावर. तिला लय गरज हाय कामाची. मला काय माझ्याकडं हायेत कामं पोटापुरती...‘, असं म्हणत मॅडमचं काहीही न ऐकता किंवा मागच्या दोन दिवसांचा पगारही न मागता ती घराबाहेर पडली.

चिमुकलीच्या नव्या दप्तराचं स्वप्न सोबत घेऊन जात असलेल्या तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत पहिल्या कामवालीचे आपोआपच हात जुळले. हे सारं पाहून काम मॅडम म्हणाल्या, "काय बाई आहे बघ! एकीकडे कामं मिळवण्यासाठी सगळं जग धडपडतयं. एकमेकांचे पाय खेचतयं. आणि ही बाई चक्क काम सोडून गेली. ते पण तुझ्यासारख्या अनोळखी बाईसाठी. धन्य आहे ती! बघ ही अशी माणसं आहेत ना म्हणून जग टिकून आहे आज..‘

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...